पालघर: पालघर जिल्हा पोलीस दलात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ‘मोजमाप संकलन युनिट’चा शुभारंभ करण्यात आला आहे. यामुळे एखाद्या घटनेतील आरोपीने पोशाख अथवा चेहरा याचे वेशांतर करून दुसरा गुन्हा केल्यास त्या गुन्ह्यातील तांत्रिक, फोटो, व्हिडिओ यावरून मोजमाप संकलन युनिट द्वारे नमूद गुन्हेगारांची तात्काळ ओळख पटविण्यास ७५ वर्षापर्यंत मदत होणार आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालय पालघर येथे विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, संजय दराडे यांच्या हस्ते २४ जून रोजी मोजमाप संकलन युनिटचे उदघाटन करण्यात आले आहे. या उदघाटन कार्यक्रमास पालघर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, पोलीस उप अधीक्षक (गृह) संगिता शिंदे अल्फोन्सो, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा प्रदिप पाटील तसेच पोलीस अधिकारी व अमंलदार हजर होते.
फौजदारी प्रक्रिया (ओळख) कायदा २०२२ या कायदयाअंतर्गत राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सर्व जिल्हा स्तरावर मोजमाप संकलन युनिट स्थापित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. या प्रणालीद्वारे भारतातील राज्यांमधील सर्व जिल्हे, सर्व कारागृह प्रशासन एकमेकांना जोडण्यात आलेली आहेत. मोजमाप संकलन युनिट मध्ये गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या अटक आरोपींचे भौतिक आणि जैविक माहिती (डेटा) चे संकलन, साठवणूक आणि विश्लेषण करण्यास अधिकृत करण्यात आलेले आहे.
कायद्यांची ओळख पटविण्याबाबत अधिनियम १९२० या जुन्या कायदया अंतर्गत न्यायालयाने एक वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा ठोठावलेले दोषी तसेच अंतर्गत चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या आणि नंतर सोडुन दिलेल्या व्यक्तींच्या हातापायाचे ठसे आणि फोटो जमा करण्यात येत होते. त्यात आधुनिकीकरण करुन, फौजदारी प्रक्रिया ओळख कायदा २०२२ या कायदयाचा नुसार स्थापित करण्यात आलेल्या मोजमाप संकलन युनिटमध्ये जिल्हयातील अटक आरोपींचे रेटीना, हातापायांचे ठसे, शरीराचे मोजमाप, शरीरावरील ओळखीच्या खुणा, व्रण, सर्व दिशेमधील फोटो व त्याची वैयक्तीक माहिती संकलीत करुन ती माहिती गुन्हे तपासीक अधिकारी, अमंलदार यांना त्यांच्या ई मेल आयडीवर तात्काळ पाठविली जाईल. तसेच इतर माहिती सुमारे ७५ वर्षे संकलीत राहणार असल्याने त्यामुळे प्रथम गुन्हा करणारे आरोपीने त्याचा पोषाख अथवा चेहरा यांचे वेषांतर करुन दुसरा गुन्हा केल्यास त्या गुन्हयातील तांत्रीक, फोटो, व्हिडीओ यावरुन मोजमाप संकलन युनिट द्वारे नमुद गुन्हेगारांची तात्काळ ओळख पटविण्यास मदत होईल.
मोजमाप संकलन युनिटमुळे गुन्हे घडलेल्या ठिकाणांचे (क्राईम सीन) डिजिटल पद्धतीने मोजमाप करणे, घटनास्थळाचे थ्रीडी स्कॅनिंग करणे तसेच महत्त्वाच्या खुणा आणि पुराव्यांची नोंद घेणे सोपे होणार आहे. या अत्याधुनिक प्रणालीमुळे घटनास्थळावरील कोणताही महत्त्वाचा पुरावा दुर्लक्षित राहणार नाही आणि तपास अधिक प्रभावी होईल, अशी अपेक्षा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
या युनिटमध्ये समाविष्ट असलेल्या उपकरणांमुळे, घटनास्थळावरील बारकावे अत्यंत अचूकपणे टिपता येतील, जेणेकरून न्यायालयातील सुनावणीदरम्यान मजबूत पुरावे सादर करणे शक्य होईल. यामुळे गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढण्यास मदत होईल असेही सांगण्यात आले आहे. पालघर पोलीस दलाचे हे पाऊल आधुनिक पोलीसिंगच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
मोजमाप संकलन युनिट मुळे गुन्हे तपासाला अधिक गती मिळणार असून गुन्हेगारीच्या तपासात पोलिसांना मोठा फायदा होणार आहे. तसेच गुन्ह्यांशी संबंधित पुराव्यांचे संकलन अधिक अचूक आणि वैज्ञानिक पद्धतीने करता येणार आहे. – यतीश देशमुख, पोलीस अधीक्षक पालघर