पालघर : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील मेडले फार्मास्युटिकल या कंपनीत २१ ऑगस्ट रोजी झालेल्या विषारी वायुगळतीमध्ये चार कामगारांचा मृत्यू झाला. या विषारी वाळूच्या गळतीवर नियंत्रण मिळवण्यास किमान दीड ते दोन तासांचा अवधी लागला. मात्र विषारी वायुची मात्रा व प्रमाण मर्यादित असल्याने भोपाळ वायु गळतीची पुनरावृत्ती टळली.
या उद्योगात दुपारी तीन वाजल्याच्या सुमारास प्रत्यक्षात वायू गळती सुरू झाल्यानंतर दोन तासांपर्यंत याची माहिती कंपनीत असणाऱ्या इतर ३० कर्मचारी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलीच नाही. या वायुगळतीचे गांभीर्य व्यवस्थापन अधिकाऱ्यांना न समजल्याने विषारी वायूमुळे बाधित कामगारांना कोणत्याही प्रकारचे उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या कंपनीच्या व्यवस्थापन कर्मचाऱ्यांमध्ये प्रशिक्षणाच अभाव, अपरिपक्वता व हलगर्जीपणा यामुळे विषारी वायूची बाधा झाल्यानंतर प्रथमोपचार देखील मिळू शकले नाहीत. संबंधित कंपनी व्यवस्थापनाविरुद्ध सदोष मनुष्य वधचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोषी असलेल्या कंपनी व्यवस्थापकीय कर्मचाऱ्याला अटक होण्याचे प्रलंबित आहे.
तारापूर औद्योगिक वसाहतीच्या प्लॉट क्रमांक एफ- १३ मध्ये स्थित मेडले फार्मासिटिकल या कंपनीत एलबेंडाझोल या जंतुनाशक औषध रसायनाचे उत्पादन सुरू होते. पाच टन क्षमतेच्या ग्लास लाईन रिऍक्टर मध्ये सुमारे ३०० ते ४०० किलो मिथेनॉल मिसळल्यानंतर ५० डिग्री तापमानाला रासायनिक प्रक्रिया सुरू असताना रासायनिक बाष्प मार्गस्थ होण्यासाठी असलेल्या मार्गावरील (व्हेंट लाइन) वॉल अपूर्णरित्या उघडा असल्याने या रिऍक्टर मधून मिथाईल मरकॅप्टन या विषारी व शरीराला घातक रसायनाची गळती झाली.
मिथाईल मरकॅप्टन वायूची घनता हवेपेक्षा अधिक असल्याने हा गळती झालेला वायू हा प्लांटच्या तळमजल्यावर साचू लागला. प्रथम या वायूची बाधा कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांला झाली व त्याच्या बचावासाठी आलेले इतर कंत्राटी कामगार देखील या विषारी वायूमुळे बाधित झाले.
दुपारी तीन ते साडेतीन वाजल्याच्या दरम्यान वायू गळतीची घटना व त्याची कामगारांना बाधा झाल्याचा अंदाज औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनाच्या अधिकाऱ्याकडून व्यक्त करण्यात येत असून या रासायनिक प्रक्रियेवर देखरेख ठेवणारे प्लांट उत्पादन व्यवस्थापक देखील या वायूमुळे बाधित झाले. प्लांट उत्पादन व्यवस्थापक यांना या कंपनीच्या मुख्य व्यवस्थापकांनी स्वतःच्या गाडीत बोईसर येथील एका खाजगी रुग्णालय सायंकाळी सव्वा पाच वाजल्याच्या सुमारास दाखल केले. मात्र दरम्यानच्या काळात वायुगळतीने बाधित झालेले चार कंत्राटी कर्मचारी हे बेशुद्ध असल्याचे गृहीत धरून व ते नैसर्गिक वातावरणात बरे होतील या समाजामुळे कंपनीच्या आवारात बाहेर उघड्यावर ठेवण्यात आले होते. या चारी कामगारांना कोणत्याही प्रकारचे प्रथमोपचार मिळाले नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली असून या चौघांना मृत अवस्थेत बोईसर येथील एका खाजगी रुग्णालयात नेताना खाजगी वाहनांचा वापर करण्यात आला.
अपघात घडला त्या समयी त्या कंपनीत ३६ कामगार कामावर असताना उर्वरित कामगार अथवा व्यवस्थापकीय अधिकारी यांनी प्रथमोपचार देणे, रुग्णवाहिका बोलून रुग्णालयात दाखल करणे, औद्योगिक सुरक्षा विभागाला माहिती देणे, पोलिसाला सुचित करणे असे कोणतेही कृत्य न केल्याने वायुगळतीचा हा प्रकार दडपण्यासाठी जाणीवपूर्वक केलेली कृती असल्याचे आरोप होऊ लागले आहेत. वायुगळती दडपण्याच्या प्रयत्नामुळे या चार कामगारांचा मृत्यू झाला असून बोईसर एमआयडीसी या प्रकरणात सदोष मनुष्यवध व इतर कलमे लावली आहेत. या प्रकरणाची चौकशी बोईसरचे उपविभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्फत केली जात असून औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय विभागाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असे त्यांनी लोकसत्ता ला सांगितले.
आवश्यक परवानगी नाही
एलबेंडाझोल या जंतुनाशक औषध रसायनाचे उत्पादनाची आवश्यक परवानगी औद्योगिक सुरक्षा विभागाकडून घेण्यात आली नसल्याची माहिती पुढे आली असून त्यामुळे या उत्पादनाद्वारे निर्मित होणाऱ्या विषारी वायू हाताळण्याबाबत आवश्यक पूर्वतयारी या कंपनीत नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. रासायनिक प्रक्रिये दरम्यान निघणारा वायू स्क्रबर या उपकरणात शोषून घेण्यासाठी असणारी क्षमता पुरेशी नसल्याचे तसेच प्रक्रिये दरम्यान निर्मित होणाऱ्या वायूला मार्गस्थ होण्यासारखी असणाऱ्या पाईप दरम्यान असणारा व्हॉल्व कमी प्रमाणात उघडल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे व्यवस्थापनाने नवीन उत्पादन सुरू करताना आवश्यक खबरदारी घेतली नसल्यामुळेच चार कामगारांचा मृत्यू झाल्याचे आरोप होत आहेत.
प्रथमोपचार देणे, आपतकालीन परिस्थिती हाताळण्यात अयशस्वी
औद्योगिक सुरक्षा विभागाने या उद्योगाला विविध उत्पादने तयार करण्यासाठी दिलेल्या परवानगी मध्ये कर्मचाऱ्यांना प्रथमोपचार व आपत्कालीन हाताळण्यासाठी नियमित प्रशिक्षण देणे बंधनकारक केले असले तरी त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचे दिसून आले आहे. किंबहुना अपघात झाल्यानंतर रुग्णांना तातडीने उपचार मिळाले नाहीत अथवा रुग्णवाहिका अखेरपर्यंत उपलब्ध झाली नसल्याची माहिती पुढे आली असून अपरिपक्व, अकुशल व जबाबदार अधिकाऱ्यांची संख्या कंपनीत आवश्यक प्रमाणात नसल्याने हा प्रकार घडल्याचे कारण पुढे आले आहे.
मदतीमध्ये भेदभाव
मृत कामगारांच्या नातेवाईकांना प्राथमिक सानुग्रह मदत देताना (एक्स ग्रेषिया) कायमस्वरूपी व कंत्राटी कामगारांमध्ये भेदभाव करण्यात आला. मृत पावलेल्या एका कायमस्वरूपी कामगाराला २० लाख रुपयांची मदत देण्याची कंपनी व्यवस्थापनाने कबुली दिली असताना मृत पावलेल्या कंत्राटी कामगारांच्या कुटुंबीयांना फक्त पाच लाख रुपये देण्यात आल्याने या झालेल्या भेदभावाबाबत स्थानिक परिसरात रोष पुढे येत आहे. मृत कामगारांच्या कुटुंबीयांना देण्यात येणारी भरपाई रक्कमचा हिशोब करून नंतर कंपनी व्यवस्थापनाला ही रक्कम कामगार न्यायालयात जमा करण्याचे निर्देश देण्यात येतील असे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे सहसंचालक माधव तोटेवाड यांनी सांगितले.
दोन तास नेमके काय झाले ?
अपघात घडल्यानंतर मृतदेह रुग्णालयात पोहोचेपर्यंतच्या सुमारे दोन – अडीच तासाच्या कालावधीत सुरक्षा विभाग, प्रदूषण नियंत्रण विभाग व पोलिसांना याबाबत माहिती देण्यापासून टाळण्यात आले. या विषारी वायूची गळती अधिक काळ सुरू राहिली असती तर भोपाळ वायू दुर्घटनेप्रमाणे प्रकार घडला असता. विशेष म्हणजे अपघातानंतर विषारी वायूच्या गळती ऐवजी नायट्रोजनच्या गळतीमुळे कामगारांचा मृत्यू झाल्याची व अपघाताच्या तीव्रतेबाबत दिशाभूल करणारी माहिती देण्यात आली होती. यासंदर्भात सुरक्षा विभाग व पोलिसांकडून गांभीर्याने दखल घेऊन कंपनी व्यवस्थापन विरुद्ध कडक कारवाई करण्याची अपेक्षा तारापूर येथील कामगार संघटनेच्या नेते मंडळींकडून केली जात आहे.