बोईसर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अनेक हॉटेल्सच्या नामफलकांवरून मराठी देवनागिरी लिपी गायब आहे. मराठी भाषेला सापत्नपणाची वागणूक देताना  हॉटेल्सच्या नामफलकांवर इंग्रजी, गुजराती आणि हिंदी या  भाषांना मात्र अग्रक्रमाने स्थान देण्यात आले आहे. या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून महामार्गावरील हालोली गावच्या हद्दीत असलेल्या हॉटेल्स वरील गुजराती नामाफलकांची मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड करून आपला रोष व्यक्त केला.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पालघर जिल्ह्यातील ढेकाळे ते अच्छाड या ७० किमी लांबीच्या टप्प्यातील अनेक हॉटेल्स आणि ढाबे यांच्या दर्शनी भागात मराठी देवनागरी लिपीतील नामफलक लावण्यात आलेले नाहीत. काही हॉटेल्सच्या नामफलकांमध्ये इंग्रजी,  हिंदी आणि गुजराती लिपी ठळक अक्षरात लिहिली असून मराठी लिपी मात्र अगदी बारीक अक्षरात लिहल्याचे दिसून येते. महामार्गावरील सातिवली,कुडे हालोली, दुर्वेस, मस्तान नाका, टाकव्हाळ, नांदगाव, आवढाणी, चिल्हार फाटा, वाडा खड्कोना, चारोटी नाका, आंबोली, तलासरी, सावरोली, अच्छाड या गावांच्या हद्दीत असणाऱ्या हॉटेल्सच्या नामफलकांवर इंग्रजी,हिंदी सोबतच गुजराती भाषेला प्राधान्यक्रम दिला गेल्याचे दिसून येत असून मराठी देवनागिरी लिपीचे स्थान नगण्य आहे. 

तक्रारीनंतर पालघरयेथील कामगार विभागाने भेटी दिलेल्या २३३ आस्थापनापैंकी ८६ आस्थापनामध्ये मराठी लिपीतील नामफलक नसल्याचे आढळून आले असून ११२ आस्थापनामध्ये मराठी नामफलक असल्याचे आढळून आले होते. या प्रकरणी १७ आस्थापनांवर कामगार विभागाने दंडात्मक कारवाई केली आहे. 

महाराष्ट्रातील दुकाने आणि आस्थापना यांच्या नामफलकावर प्रथमदर्शनी मराठी भाषेत देवनागरी लिपीत नाव लिहिणे आवश्यक आहे. तसेच इतर भाषेत नाव लिहिले जाणार असेल, तर त्या भाषेच्या तुलनेत मराठीतील नाव हे मोठ्या अक्षरातच असले पाहिजे असा नियम आहे. या नियमाचे उल्‍लंघन केल्यास संबंधित दुकाने व आस्थापना मालकांवर महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम २०१७ च्या तरतुदीनुसार कारवाई करण्याचे प्रावधान आहे.  या आधी १० पेक्षा कमी कामगार असलेल्या दुकानांना मराठी पाट्यांची सक्ती नव्हती. त्यामुळे ही पळवाट वापरून अनेक दुकानदार, हॉटेल्स आणि इतर आस्तापानाचे मालक हव्या त्या भाषेत पाट्या लावत होते. काही राजकीय पक्ष आणि संघटनांच्या खळ खट्याक आंदोलनाच्या इशार्‍यानंतर सरकारने जानेवारी २०२२ मधील अध्यादेशात ही पळवाट बंद केली. तरीही अनेक ठिकाणी मराठी नामफलक दिसत नाहीत. कारवाईचे अधिकार असणार्‍या सरकारी यंत्रणा या विषयाबाबत उदासीन असल्याने अनेक जण  मराठी भाषेतील नामफलक लावणे गांभीर्याने घेत नाहीत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई आमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अनेक हॉटेल्सचे नामफलक हे गुजराती आणि इतर लिपीमध्ये असल्याचे समजताच या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी महामार्गावरील हालोली गावच्या हद्दीत असलेल्या हॉटेल्सवरील गुजराती भाषेतील नामफलकांची तोडफोड करीत आपला संताप व्यक्त केला.