पालघर : तारापूर अणुऊर्जा प्रकल्पात किरणोत्सर्ग गळती झाल्याचे गृहीत धरून तारापूर परिसरात राष्ट्रीय अणू व किरणोत्सर्ग आपत्कालीन अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अभ्यासवर्गात ५०० पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. सकाळी सात वाजता तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या कक्षेबाहेर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्याचे भासवून हा उपक्रम सायंकाळ उशिरापर्यंत सुरू राहिला.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आज तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या संदर्भात राष्ट्रीय अणू व किरणोत्सर्ग आपत्कालीन अभ्यासाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद प्राधिकरण, राज्य आपत्ती प्रतिसाद प्राधिकरण नौदल, तटरक्षक दल, नागरी सुरक्षा दल, होमगार्ड, पोलीस, आपदा मित्र (नाशिक व ठाणे) तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सर्व घटक विभाग सहभागी झाले होते.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या नेतृत्वाखाली आयोजित या रंगीत तालीम संदर्भात निरीक्षण करण्यासाठी १० निरीक्षक नेमण्यात आले होते. नागरिकाला स्थलांतरित करण्यासाठी होमगार्ड व नागरी संरक्षण दलाच्या स्वयं सेवकांची मदत घेण्यात आली.

रंगीत तालीम कशाप्रकारे झाली आयोजित

सकाळी सात वाजल्याच्या सुमारास तारापूर अणुऊर्जा केंद्रात किरणोत्सर्ग गळती झाल्या संदर्भात माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात संरक्षण कृती शिफारसीद्वारे करण्यात आली. त्यानंतर डहाणू उपविभागीय अधिकारी यांनी या आपत्कालीन घटनेची कमांडर म्हणून भूमिका बजावताना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या २९ टीमला सक्रिय करून किरणोत्सर्ग पासून नागरिकांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने आवश्यक असणारा कृती आराखडा राबविला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या परिसरात या किरणोत्सर्गची बाधा होऊन पाहणाऱ्या १९ गावांमधील ३१ हजार ३८१ नागरिकांना प्रतिकात्मक आयोडीन गोळ्या वाटण्यात आल्या तर कच्च्या घरात राहणाऱ्या ९४० नागरिकांना ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी व शाळांमधील पक्क्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. घिवली येथील रहिवाशांना माकुणसार येथे तर तारापूर (कांबोडा) येथील नागरिकांना पालघरच्या स.तू. कदम विद्यालयात स्थलांतरित करण्यात आले. स्थलांतर करण्यापूर्वी या नागरिकांना घेऊन जाणारे एसटी बस व नंतर स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांचे निर्जंतुकीकरण (डीकंटाॅमिनेशन) करण्यात आले. तसेच आवश्यक प्रथम उपचार देण्यात आला. या सर्व उपक्रमात लागणारा प्रतिसाद वेळ व उपक्रमा दरम्यान आलेल्या अडचणींची माहिती सायंकाळ नंतर मान्यवरांच्या उपस्थितीत नोंद करण्यात आली.