पालघर : नेपाळ येथील एका महिलेची प्रेम संबंधातून हत्या करून मृतदेह गोणीमध्ये भरून जव्हार नाशिक मार्गावरील वाघ नदीमध्ये फेकल्याची घटना रोजी घडली होती. मृतदेह भरलेल्या गोणीवर असलेल्या SM २८ या अक्षरावरून महिलेच्या प्रियकरासह इतर दोन साथीदारांना अटक करण्यात मोखाडा पोलिसांना यश आले आहे.
नेपाळ येथील राहणारे काजोल गुप्ता व राजकुमार वरही (२४) यांचे गेल्या काही वर्षापासून प्रेमसंबंध होते. काजोल ही राजूकुमार यांच्यासोबत लग्नासाठी हट्ट करत असल्याने तिच्यापासून सुटका मिळवण्यासाठी तिची हत्या करण्याचा विचार केला. याकरिता राजूकुमार वरही यांच्या वडिलांचे सेलवास येथे राहणारे मित्र सुरेश सिंग (५०) यांची व वाहनचालक बालाजी वाघमारे (३४) यांची मदत घेण्याचे ठरवले. याकरिता राजूकुमार यांनी काजोल यांना नेपाळ येथून सिल्वासा येथे घेऊन आले. त्यानंतर सिल्वासा येथून बालाजी वाघमारे यांच्या गाडीतून डहाणू येथील महालक्ष्मी मंदिरात व त्र्यंबकेश्वर नाशिक परिसरात फिरवून आणले.
नाशिक येथून परत येत असताना मोखाडा येथील जंगलात तिचा ओढणीने गळा आवळून तिला सुरेश सिंग यांनी आणलेल्या गोणीत भरले व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिला १ एप्रिल रोजी पहाटे नाशिक जव्हार मार्गावरील घाटकरपाडा गावाच्या हद्दीतील वाघ नदीच्या पाण्यात टाकून दिले.
याबाबत काही तासातच पोलिसांना गोणीतील मृतदेह आढळून आल्यानंतर मोखाडे पोलीसांनी अनोळखी महिलेचा खुनाचा तपास सुरू केला. हा मृतदेह भरलेल्या गोणीवर SM २८ अशी अक्षरे असल्याचे व गोणीमध्ये मटर (वाटाणे) चे दाणे असल्याचे दिसून आले. घटनास्थळ परिसरात नाशिक येथून रात्री अपरात्री भाजीपाला वाहतूक होत असल्याने नाशिक परिसरात तपास सुरू केला. यावेळी एसएम२८ मटार हे मध्यप्रदेश व सिमला (हिमाचल प्रदेश) येथून महाराष्ट्रात येत असल्याचे व ही ती गोणी सिमला येथील व्यापाऱ्यांकडून पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली.
सिमला येथे अधिक चौकशी केली असता मटार मालाच्या २८ गोण्या या वापी येथील भाजीपाल्याचे होलसेल व्यापाऱ्यांकडे पाठविण्याचे निष्पन्न झाले. वापी येथील होलसेल व्यापाराकडे चौकशी करून सहा ते सात व्यापाऱ्यांना मटारच्या गोण्या गेल्याचे समजले. या व्यापाऱ्यांना विचारपूस व तांत्रिक माहितीच्या आधारे शोधपत्रिका वापी परिसरात प्रसिद्ध केली.
वापी व सेलवास परिसरात लावण्यात आलेल्या शोध पत्रिकेवरून गुप्त बातमीदाराकडून मयत महिला ही गुन्हा घडण्याच्या तीन दिवसांपूर्वी महालक्ष्मी मंदिर कासा येथे आल्याचे कळले. याद्वारे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत प्रियकर राजुकुमार वरही, सुरेश सिंग व वाहनचालक बालाजी वाघमारे यांना अटक केली असून पुढील तपास मोखाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले व स्थानिक गुन्हे शाखा करत आहे. या आरोपींना ११ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
जव्हार नाशिक मार्गावर सीसीटीव्हीची नजर
जव्हार नाशिक मार्गाच्या परिसरात अनेक ठिकाणी वनपट्ट्यांचा भाग असल्याने या भागात यापूर्वी देखील अनेक वेळा गुन्हे घडले आहेत. आरोपी मृतदेह लपवण्यासाठी अशा ठिकाणांचा अनेक वेळा वापर करतात. मात्र या मार्गांवर अनेक ठिकाणी छुपे सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असून या भागात घडलेल्या गुन्ह्यांपैकी सर्व गुन्हे निष्पन्न झाल्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच या भागात नाकाबंदी, चेकिंग, पेट्रोलिंग देखील होत असल्याचे त्यांनी सांगितले.