पालघर : पालघर जिल्ह्यातील भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी एसटी प्रशासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूर करिता ५५ जादा बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाच जादा गाड्या सोडण्यात आल्यामुळे पंढरपूरला जाणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मागील वर्षी २० हजार नागरिकांनी प्रवास केला होता.

आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरला श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पालघर जिल्ह्यातील नागरिकांना भाविकांना सुलभतेने पंढरपूरला जाता यावे याकरिता पालघर विभागाच्या आठही आगारातून विशेष ५५ बसेस पंढरपूरला सोडण्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. समूह बुकिंग असेल तर थेट गावातूनच पंढरपूरला बस सोडण्यात येणार असल्याचेही पालघर विभागाकडून सांगण्यात आले

६ जुलैला सर्वत्र साजऱ्या होणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त भाविक मोठ्या संख्येने पंढरपूर येथे दर्शनाकरिता जात असतात. पंढरपूरला जाण्याकरिता एसटी प्रशासनाकडून दरवर्षी जादा बसेसची सोय उपलब्ध करण्यात येत असून यंदा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जादा बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

एसटी प्रशासन कमी उत्पन्न येणाऱ्या बस फेऱ्या काही कालावधीसाठी रद्द करून त्या पंढरपूरला भाविकांना जाण्यासाठी सवलतीच्या दरात सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. भाविकांच्या वाढत्या मागणीनुसार एसटी प्रशासनाकडून आणखी बसेस वाढवण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. यासाठी पालघर जिल्ह्यातील पालघर, सफाळा, वसई, अर्नाळा, डहाणू, जव्हार, बोईसर व नालासोपारा या आगारांमध्ये बसचे नियोजन करण्यात येत आहे.

पंढरपूर आषाढी एकादशी निमित्ताने जाणाऱ्या एसटी बस मध्ये महिला, वयोवृद्ध व अपंग यांना सवलतीच्या दरात तिकीट आकारण्यात येणार आहे. जशी मागणी येते तश्या बसेस दिल्या जातात. काल बोईसर येथून मागणी नुसार दोन बसेस देण्यात आल्या आहेत. तसेच ग्रुप बुकिंग सुरू असून काही ग्रुप बुक झाले आहे. – कैलास पाटील, विभाग नियंत्रक परिवहन

पंढरपूर करिता आगारातून गाड्या

१) पालघर ते पंढरपूर- ८ बस, ८०५ रुपये भाडे

२) सफाळे ते पंढरपूर – २ बस, ८५१ रुपये भाडे

३) वसई ते पंढरपूर – ६ बस, ७०५ रुपये भाडे

४) अर्नाळा ते पंढरपूर – ९ बस, ७४० रुपये भाडे

५) डहाणू ते पंढरपूर- ७ बस, ८५५ रुपये भाडे

६) जव्हार ते पंढरपूर- ७ बस, ८१५ रुपये भाडे

७) बोईसर ते पंढरपूर- ६ बस, ७९५ रुपये भाडे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

८) नालासोपारा ते पंढरपूर- ८ बस, ७०५ रुपये भाडे