पालघर : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामासाठी करण्यात येणाऱ्या स्फोटकांच्या वापरामुळे पालघर तालुक्यातील जलसार गावातील अनेक घरांना तडे पडले असून यामुळे ग्रामस्थांना प्रचंड आर्थिक व मानसिक फटका बसला आहे. नुकतीच जलसार गावाला भेट देऊन आमदार विलास तरे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि ग्रामस्थांच्या वेदना जाणून घेतल्या.
गेल्या काही महिन्यांपासून बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून या कामात वापरल्या जाणाऱ्या स्फोटकामुळे शेजारील गावांमधील घरे हादरत असून भिंतींना व पाया भागाला तडे पडत आहेत असे गावकर्यांनी निदर्शनास आणून घरांची, मालमत्तेची हानी होत नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. या पाहणीवेळी उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी श्याम मदनूकर तसेच प्रकल्पाची जबाबदारी सांभाळणाऱ्या एल अँड टी कंपनीचे अभियंता व व्यवस्थापक रिफन दास उपस्थित होते. ग्रामस्थांच्या समस्या ऐकल्यानंतर त्यांनीही प्रामाणिकपणे सगळा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.
ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच साक्षी गावड, उपसरपंच विक्रोश म्हात्रे, स्वप्नील केणी, तेजस पाटील, सूरज साळुंखे तसेच गावातील अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायतीनेही जिल्हा प्रशासनाकडे लवकरात लवकर नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
ग्रामस्थांनी आमदार तरे यांच्याकडे समस्या मांडल्यावर त्यांनी तत्काळ कारवाईसाठी जबाबदार अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. ग्रामस्थांवर अन्याय होऊ नये यासाठी आपण प्रयत्न करू, जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ग्रामस्थांना योग्यती नुकसानभरपाई, मदत आणि न्याय मिळवून देईपर्यंत आपण या विषयावर लक्ष ठेवणार असल्याचे आमदार विलास तरे यांनी सांगितले.
सर्वसामान्य शेतकरी, कामगार, आदिवासी यांच्या घरांना तडे पडणे, शेतीचे नुकसान होणे किंवा त्यांच्या जीवनावर परिणाम होणे हे कुठल्याही परिस्थितीत योग्य ठरणार नाही. मी स्वतः जिल्हाधिकारी व संबंधित यंत्रणेशी तातडीने बैठक घेऊन ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. – आमदार विलास तरे