बोईसर : ठाणे शहर आणि घोडबंदर मार्गावर सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक वैतागले असून दिवसा अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. नागरीकांच्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्याची बैठक घेऊन नागरिकांना त्रास होऊ नये यादृष्टीने ठाणे शहर, घोडबंदर रोड आणि मुंबई अहमदाबाद महामार्ग या ठिकाणी वाहतुकीचे योग्य नियमन करून आवश्यक उपाययोजना आखण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाने मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर १८ सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या कालवधीत सकाळी ६.०० वाजेपासून ते रात्री ९.०० वाजेपर्यंत गुजरात बाजूकडून ठाणे दिशेला जाणारी १० चाकी व त्यापेक्षा अधिक चाके असलेल्या अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याची अधिसूचना जारी केली आहे.

दहा आणि त्यापेक्षा अधिक चाकांच्या अवजड वाहनांना चिंचोटी नाका येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. या दरम्यान गुजरात बाजूकडून ठाणे आणि जेएनपीटीच्ग्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांची गैरसोय होऊ नये या करीता महामार्गावरील तलासरी, चारोटी, मनोर या ठिकाणी धाबे, हॉटेल आणि सुरक्षित वाहनतळाच्या जागी ही वाहने उभी करून ठेवण्यात येणार असून रात्री ९.०० वाजेनंतर इच्छितस्थळी जाण्यास या अवजड वाहनांना परवानगी असणार आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना ही अधिसूचना लागू होणार नसल्याची माहिती प्रशासनाने दिली. वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे याकरिता महामार्गावर वाहतूक पोलिसांसोबतच खाजगी वॉर्डनची नेमणूक केली जाणार आहे.

पर्यायी रस्त्यांची देखील अत्यंत दुरवस्था :

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, जेएनपीटी, भिवंडी,कल्याण दिशेला जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य मार्गांची पावसामुळे अत्यंत दुरवस्था झाली आहे. घोडबंदर रस्त्याला पर्यायी मार्ग म्हणून असलेले मनोर वाडा भिवंडी , चिंचोटी ते भिवंडी रस्ता, वाडा ते शहापूर, शिरसाड ते अंबाडी, कंचाड ते कुडूस या प्रमुख पर्यायी रस्ते खड्ड्यात गेले असून या मार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातून ठाणे, मुंबई, पनवेल, कल्याण परिसरात रस्ते मार्गाने जाण्यासाठी चार ते पाच तासांचा वेळ लागत आहे.

महामार्गावर अवजड वाहनांसाठी पर्यायी वाहनतळ :

मुंबई अहमदाबाद महामार्ग ४८ ते ठाणे शहराला जोडणाऱ्या घोडबंदर रस्त्याची पावसामुळे अत्यंत दुरवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे पडल्यामुळे खाजगी आणि प्रवासी वाहने यांचा वेग मंदावला असून अवजड वाहनांमुळे नागरिकांना आणि तास वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडावे लागत आहे. घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी विरोधात परिसरातील नागरिक संतप्त झाले असून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन नागरिकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता व्हावी याकरिता ठोस उपाययोजना आखण्याची मागणी केली होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन घोडबंदर मार्गावर रात्री अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले होते. गुजरात बाजूकडून येणारी १० चाकी आणि त्यापेक्षा अधिक चाके असलेल्या वाहनांच्या पार्किंगसाठी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अछाड ते चिंचोटी दरम्यान हंगामी वाहनतळ तयार करण्यात येणार आहेत. रात्री ९.०० वाजेनंतर या वाहनांना वाहतूक करण्यास परवानगी असणार आहे.