पालघर : पालघर जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील मानधनावर असणारे ६१८ शिक्षक, मानधन तत्वावर असणारे ५४८ शिक्षक तसेच ३४ सेवानिवृत्त शिक्षक यांना जून महिन्यापासून जिल्हा परिषदे कडून त्यांचा पगार मिळाला नसून दिवाळीच्या तोंडावर जुलै महिन्याचे पगार देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यापैकी १०० पेक्षा अधिक शिक्षक इतर जिल्ह्यातील असून किमान ६०-७० हजार रुपयाचे थकीत वेतन असताना या सर्व शिक्षकांना अवघ्या १६ ते २० हजार रुपयांच्या रक्कमेवर दिवाळीच्या सण साजरा करावा लागणार आहे.
पालघर जिल्ह्यातील २११० शाळांमध्ये शिक्षकांच्या अनेक जागा रिक्त असल्याने गेल्या काही वर्षांपासून शिक्षकांच्या जिल्ह्याबाह्य बदल्या करण्यात आला नव्हता. मात्र जिल्हा परिषदेच्या निर्णयाविरुद्ध काही शिक्षकाने उच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेला आंतरजिल्हा बदली तसेच विकल्प वितरित शिक्षकांच्या बदल्या करणे भाग पडले. शिक्षकांची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने पेशा क्षेत्रातील १६ हजार रुपये महिना दराने मानधन शिक्षक, प्रत्येकी २० हजार रुपये महिना पगारावर मानधन तत्वावर कंत्राटी शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती केली. त्यानंतर देखील जिल्ह्यात शिक्षकांच्या सुमारे १८ टक्के जागा रिक्त राहिल्याचे दिसून आले होते.
नेमणूक झालेल्या कंत्राटी पद्धतीच्या शिक्षकांपैकी अनेक शिक्षक जून महिन्याच्या मध्यापासून कार्यरत झाले असून दिवाळी उजाडली तरीही त्यांना आजवर पगार मिळालेला नाही. अधिक शिक्षकांना नोकरी सांभाळताना आपले कुटुंब संसार देखील चालवावा लागत असल्याने आपल्या घरून अथवा मित्र परिवाराकडून उधारीवर पैसे मागून घर चालवावे लागते. अशा कंत्राटी शिक्षकांच्या मुलांच्या शिक्षण घरचा खर्च, विविध प्रकारची कर्ज फेडण्यासाठी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली असून जिल्हा प्रशासनाकडे त्यांच्यामार्फत पाठपुरावा केला असता राज्य सरकारकडून निधीची मागणी केल्याचे कारण सांगितले जात होते. त्यामुळे प्रथम गणपती सणाच्या सुमारास व नंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात थकित पगार मिळतील या आश्वासनावर ही मंडळी कार्यरत राहील.
जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रकारे कंत्राटी पद्धतीने कार्यरत असणाऱ्या १२०० शिक्षकांसाठी यापूर्वी आलेल्या एक कोटी ४४ लाखांसह आतापर्यंत तीन कोटी सात लाख ५५ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला असून त्यापैकी जिल्हा प्रशासनाने या आठवड्याच्या आरंभी तीन कोटी एक लाख ५२ हजार रुपये तालुका निहाय पंचायत समिती स्तरावर वितरित करण्यात आले आहे. जून महिन्यात सर्व शिक्षक कार्यरत झालेला नसल्याने या निधीमधून कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना जुलै महिन्याच्या पगार दिवाळीच्या पूर्वी अदा करण्याची व्यवस्था झाल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी लोकसत्ताला सांगितले. शिक्षकांच्या वेतनाच्या निधी साधी राज्य सरकारकडे अजूनही सात कोटी २६ लाख ३१ हजार रुपयांची मागणी प्रलंबित असून शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने त्याचे वितरण करण्यात येईल असे श्री रानडे यांनी पुढे सांगितले.
यामुळे कंत्राटी पद्धतीवरील शिक्षकांना दिवाळीच्या तोंडावर अवघे १६ ते २० हजार रुपयांचा निधी मिळणार अजून त्यामध्ये त्यांची थकीत देणे, कुटुंबासोबत दिवाळीच्या सण साजरा करण्यासाठी लागणारा खर्च तसेच घर खर्च चालवणे कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षकांकडून उच्च दर्जाच्या शिक्षणाची अपेक्षा करत असताना त्यांना उपासमारीची पाळी ओढविल्यानंतर जिल्हा परिषद त्यांच्याकडून कशाप्रकारे चांगली कामगिरी बजावून घेणार हा प्रश्न निरुत्तरित राहत आहे.
बदल्यामुळे तारांबळ
गेल्या काही महिन्यां पूर्वी जिल्ह्यातील १५७४ शिक्षकांच्या बदल्यांच्या अनुषंगाने त्यांना जुन्या शाळेच्या ठिकाणाहून कार्यमुक्त करणे व नवीन ठिकाणी रुजू होण्यासाठी आदेश देण्यात आले नव्हते. मात्र गेल्या आठवड्यात काही तालुक्यांनी बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त केले असून असून परीक्षेच्या तोंडावर अनेक तालुक्यांनी आपले बदली झालेल्या शिक्षकांना नवीन ठिकाणी रुजू होण्याचे आदेश मिळाले. त्यामुळे परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्यांची माहिती नसाने, मूलभूत चाचणी परीक्षेला सामोरे जाताना आवश्यक तांत्रिक व लॉगइन आयडी तयार करणे आव्हानात्मक ठरत आहे. तसेच निपुण पालघर मोहिमेतील दुसऱ्या चाचणीला सामोरे जाताना शिक्षण विभागाची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडायचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. या शिक्षक बदली प्रकरणाचा परिणाम या काळात घेण्यात आलेल्या परीक्षेच्या निकालावर होण्याची शक्यता देखील वक्त होत आहे.