निसर्गसंपन्न व आदिवासी संस्कृतीने समृद्ध असलेला पालघर जिल्हा एका नव्या संकटाने ग्रासला आहे. येथे अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत आहे. यात मेफेड्रोन, कोकेन व गांजा या अमली पदार्थांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. या जोडीलाच गुटखा या तंबाखूजन्य पदार्थाचा साठा, वाहतूक आणि विक्रीदेखील उघडकीस आली आहे.

पालघर व ठाणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थविरोधी कारवाया करण्यात आल्या. यात वाडा पोलिसांनी चार किलो गांजा (६६ हजार), तलासरी पोलिसांनी दोन किलो गांजा (२९ हजार) तर मोखाडा पोलिसांनी १११ किलो अफू (सात लाख) अशा कारवाया केल्या आहेत. यात वाडा पोलिसांनी कुडूस येथे जप्त केलेला गुटखाही आहे. दरम्यान गुटखा तस्काराकडून मोठी आर्थिक तडजोड करत २० लाखांचा गुटखा ४० हजारांचा दाखवून दिखाव्यापुरती कारवाई केली असल्याचा आरोप सध्या नागरिकांकडून होत आहे.

काही दिवसांपूर्वी ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुंब्रा येथे मेफेड्रोनची तस्करीसंदर्भात कारवाई केली होती. यात वाडा तालुक्यातील कुडूस येथे औषधाचे दुकान चालविणाऱ्या मोहनलाल जोशी या आरोपीला अटक केली. यावरूनच वाडा तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी व विक्री होत असल्याचे उघड झाले. मात्र असे असतानाही वाडा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या कुडूस दूरक्षेत्रातील कार्यरत पोलिसांना याचा थांगपत्ता लागत नाही, हे मात्र न पटण्यासारखे आहे. कुडूस परिसरात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची विक्री, काळे धंदे सुरू आहेत. याकडे गांभीर्याने पाहून पोलिसांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.

वाडा तालुक्यात मोठी औद्योगिक वसाहत आहे. त्यातच पालघर व ठाणे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आणि राजकीय केंद्रबिंदू म्हणून वाडा शहर ओळखले जाते. येथे मुंबई- अहमदाबाद, वाडा – भिवंडी, मुंबई – नाशिक, वाडा – खोडाळा – नाशिक हे महत्त्वाचे मार्ग जोडलेले आहेत. या मार्गावरून नेहमीच अमली पदार्थांची वाहतूक होत असल्याचे पोलिसांच्या कारवायांमधून दिसून आले आहे.

वाडा परिसरात औद्योगिकीकरण मोठ्या प्रमाणावर वाढल्याने परराज्यांतील नागरिक मोठ्या संख्येने येथे राहत आहेत. या नागरिकांना या परिसरात राहण्यासाठी स्थानिकांनी चाळी, इमारतीमध्ये राहण्यासाठी खोल्या, जागा दिल्या आहेत. मात्र यांच्याबाबत स्थानिक पोलीस व प्रशासनाकडे कुठलीही माहिती नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी, अमली पदार्थांची तस्करी, विक्री वाढताना दिसून येत आहे. याचा परिमाण हा स्थानिक नागरिकांवर विशेष करून तरुणांवर झाला आहे. वाडा, कुडूस शहरातील अनेक अल्पवयीन मुले, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी नशेच्या आहारी गेले आहेत. पान टपऱ्यांवर गुटखा, तंबाखू सोबतच अमली पदार्थांची छुप्या पद्धतीने विक्री ही विशेष कोड वापरून केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

तस्करीत स्थानिकांचा सहभाग

अमली पदार्थांच्या विक्रीतून मोठा आर्थिक फायदा होत असल्याने परराज्यातील कामगारांसह स्थानिकांनी भागीदारी केली असल्याचे बोलले जाते. काही स्थानिकांनी या परिसरात अमली पदार्थांची तस्करी व विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. पोलिसांनाही या व्यावसायिकांकडून आर्थिक फायदा होत असल्याने कारवाई केली जात नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

घरांमध्ये उत्पादन केंद्र

पालघरमधील वाडा, मोखाडा, बोईसर, तलासरी, वसई व नालासोपारा या परिसरात पोलिसांनी केलेल्या कारवायांमध्ये मेफेड्रोनसारख्या रासायनिक अमली पदार्थांचे उत्पादन अगदी फार्म हाऊसमध्ये व राहत्या घरामध्ये सुरू असल्याचे उघड झाले आहे. काही प्रकरणांमध्ये आरोपी तरुण होते. जे आपली शैक्षणिक गुणवत्ता अवैध मार्गाने वापरत होते. काही महिन्यांपूर्वीच बोईसर येथील एका घरातून २.४२ कोटींचे मेफेड्रोन जप्त झाले होते. त्याआधी २०२३ मध्ये मोखाड्याच्या एका फार्महाऊसमधून ३६.९ कोटींचा साठा सापडला होता.

परदेशी नागरिकांचा सहभाग

अमली पदार्थांच्या या तस्करीत केवळ स्थानिकच नव्हे तर परदेशी नागरिकांचाही सहभाग आहे. अलीकडे काही परदेशी नागरिकांना नालासोपारा येथून अटक करण्यात आली. या प्रकरणांमध्ये कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त झाले. यामुळे हे स्पष्ट होते की, पालघर हा जिल्हा आता अमली पदार्थांच्या तस्करीत आंतरराष्ट्रीय पातळीवर एक भाग बनत आहे.
युवकांचे भवितव्य धोक्यात

अमली पदार्थांच्या तस्करीचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील तरुण पिढीला बसत आहे. वसई, विरार या भागांत महाविद्यालय व रेल्वे स्थानक परिसरात अमली पदार्थांची विक्री वाढली आहे. काही ठिकाणी विद्यार्थ्यांना अर्थिक लाभ दाखवत यामध्ये विक्रेते बनवले जात आहे. तर काहीजण व्यसनाधीन होत आहेत. ही परिस्थिती पालक, शिक्षक व समाजासाठी गंभीर इशारा आहे.

समाजाचा सहभाग आवश्यक

पोलिसांनी आतापर्यंत अनेक ठिकाणी छापेमारी केली. कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. मात्र आजही अनेक ठिकाणी विक्री सुरू आहे. अमली पदार्थांची वाहतूक रेल्वे आणि खासगी वाहनांद्वारे केली जात आहे. ही तस्करी रोखण्यासाठी अधिक बळकट तपास, गुप्तचर माहिती आणि समाजाचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. पालघर जिल्हा केवळ एक पर्यटनस्थळ किंवा औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखले जाणे पुरेसे नाही. येथे समाजाचे आरोग्य सुरक्षित राहणे अधिक गरजेचे आहे. अमली पदार्थांविरोधात पोलीस, शिक्षण संस्था, सामाजिक संघटना आणि स्थानिक नागरिक यांचे एकत्रित प्रयत्न गरजेचे आहेत. अमली पदार्थांच्या आहारी जाण्यापासून पिढी वाचवायची असल्यास सर्वांनी सजग व्हायला हवं.