पालघर : पालघर येथील सर्वाधिक वाहतुकीचा व मुख्यालयाच्या रस्ता म्हणून ओळख असलेल्या पालघर बोईसर मार्गावर मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या जवळ दोन गतिरोधक लावण्यात आल्यामुळे काही प्रमाणात वेग मर्यादेवर नियंत्रण येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून बोईसर कडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य होते. मात्र गेल्या काही दिवसापासून सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपरिषदेकडून पालघर शहरातील खड्डे दुरुस्ती हाती घेण्याiत आली असून अधिकतर महत्त्वाचे खड्डे बुजविण्यात आले आहेत.

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळपासून संध्याकाळी उशिरापर्यंत नागरिकांची व अधिकारी वर्गांची येजा सुरू असते. यासह या मार्गावर असलेल्या औद्योगिक वसाहत शाळा महाविद्यालय यामुळे रहदारी अधिक असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर निघताना छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून व बोईसर कडून भरधाव येणाऱ्या वाहनांना वेग नियंत्रणात ठेवणे कठीण जाते. तर अनेकदा प्रवेशद्वारातून बाहेर निघणाऱ्या वाहनाला अथवा व्यक्तीला समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज न आल्यामुळे अपघात होण्याचे प्रकार देखील या मार्गावर घडले आहेत.

त्यामुळे या प्रवेशद्वाराच्या समोर लावण्यात आलेल्या गतिरोधकामुळे अपघाताला काही प्रमाणात आळा बसणार असून भरधाव येणारी वाहने या भागात वेग नियंत्रित ठेवत असल्याचे दिसून आले आहे.