पालघर: ऑगस्ट महिन्यात झालेल्या समाधानकार व सातत्यपूर्ण पावसामुळे यंदाच्या हंगामात जिल्ह्यात सरासरीच्या १०५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्याच्या डोंगराळ भागात किनारपट्टीकडील भागापेक्षा अधिक प्रमाणात पाऊस झाल्याचे दिसून आले आहे.
जिल्ह्यात आजवर सरासरी २१०१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून ऑगस्ट महिन्यात ५४८ मिलिमीटर सरासरी पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्ट महिन्यात जव्हारमध्ये ७३० मिलीमीटर, तलासरीमध्ये ६५१ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली असून इतर ठिकाणी ५०० ते ६०० मिलिमीटर दरम्यान पाऊस झाल्याचे दिसून आले आहे. वसई तालुक्यात सर्वात कमी म्हणजे ९२ टक्के पावसाची नोंद झाली असून पालघर तालुक्यातील पावसाच्या सरासरीचे प्रमाण ९४ टक्के इतके आहे. याखेरीज जव्हार तालुक्यात ९७ टक्के, वाडा ९९ टक्के, विक्रमगड १०५ टक्के, मोखाडा १०६ , तलासरी ११० तर डहाणू तालुक्यात तब्बल १३१ टक्के इतकी पावसाची नोंद झाली आहे.
यंदाच्या पावसाळय़ात जुलै महिन्यातील काही अतिवृष्टीचे दिवस वगळता सातत्यपूर्ण व नियमित पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. मात्र यंदाच्या पावसाळय़ात करोना, स्वाइन फ्लू, डेंग्यू, मलेरिया व चिकनगुनियासारख्या आजाराने डोके वर काढले असून अनेकांना विषाणूजन्य आजाराची देखील लागण झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या आठवडय़ापासून पावसाने उघडीप घेतल्याने भातपिकाच्या वाढीवर परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे अजूनही भात पिकला किमान १५ दिवस पाण्याची गरज असताना राजस्थानमधून पावसाची परती सुरू होण्याचे संकेत दिले गेल्याने शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
गडगडाटासह पाऊस
पालघर जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये बुधवारी मध्यरात्री तसेच आज पहाटे गडगडाटासह पाऊस झाला. त्यामुळे भात पिकाला तूर्त दिलासा मिळाला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पहाटे व सकाळी धुके पडत असून एकंदरीत परतीच्या पावसाचे चिन्हे दिसून येऊ लागली आहेत.