पालघर : पालघर जिल्ह्यातील सरासरी आठवडा रुग्ण वाढीचा दर दहा टक्क्यांपेक्षा कमी राहिल्याने पालघर जिल्हा करोना निर्बंधाच्या तिसऱ्या श्रेणीतच कायम राहिला आहे. असे असताना जिल्ह्यातील औद्योगिक आस्थापने तसेच पालघर तालुक्यातील व्यापारी बाजारपेठांमधून होणाऱ्या संक्रमणावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक काही नवीन निर्बंध लादण्यात आले आहेत.
१ जुलै रोजी पालघर जिल्ह्याचा सरासरी आठवडा रुग्ण दर ८.१ टक्के इतका नोंदवण्यात आला होता. हा दर ८ जुलै रोजी ५.३ टक्के इतका झाला असल्याने निर्बंधाचा स्तर कायम राहिला आहे. शुक्रवार व शनिवारी रुग्ण वाढ दर पाच पेक्षा खाली गेला असला तरीही आठवड्यात रुग्ण वाढीची संख्या आठशे ते हजारच्या दरम्यान कायम राहिली आहे. औद्योगिक आस्थापनातील कामगारांचे खासगी संस्थांमार्फत प्राधान्याने लसीकरण करून घ्यावे तसेच लसीकरण न झालेल्या कामगारांचे दर पंधरा दिवसांनी आरटीपीसीआर तपासणी करावी,असे जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
त्याचबरोबर पालघर तालुक्यातील पालघर शहर तसेच बोईसर, सरावली, खैरेपाडा, कुंभवली, पाम सालवड, पास्थळ, बेटेगाव, नवापूर, कोलवडे व मान या ग्रामपंचायत हद्दीमधील सर्व दुकाने व व्यापारी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचारी, व्यवस्थापक व मालकांची करोना प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाली असल्याचे प्रमाणपत्रे स्वत: सोबत ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. ज्यांचे लसीकरण झाले नाही अशा व्यक्तींचे दर पंधरा दिवसांनी करोना आरटीपीसीआर चाचणीच्या नकारात्मक (निगेटिव्ह)अहवालाची प्रत सोबत ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
पालघर तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र परिसरातील रुग्ण वाढीचा दर गेल्या पंधरा दिवसांपासून अधिक राहिल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने निर्बंध वाढविल्याचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितले. औद्योगिक परिसरातील कामगारांच्या आस्थापनाने स्वतंत्ररीत्या लस उपलब्ध करून घ्यावी, असे जिल्हाधिकारी यांनी सुचवले आहे. लघु व मध्यम स्वरूपाच्या उद्योगांमध्ये कामगारांची संख्या कमी असल्याने अशा उद्योगांनी त्यांच्या सहकारी संस्थेमार्फत किंवा रुग्णालयांमार्फत लस उपलब्ध करून घ्यावी, असे सूचित करण्यात आले आहे.
सध्या बोईसर व इतर औद्योगिक क्षेत्र परिसरातील लसीकरण केंद्रांमध्ये कामगार वर्गाची अधिक प्रमाणात गर्दी होत आहे. असे निदर्शनास आल्याने जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबरीने अनेक दुकानांमधील कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली असताना दुकाने उघडी ठेवली जात असल्याने करोना संक्रमण वाढत असल्याचे दिसून आले आहे. दुकानांमधील कामगार वर्गाकडे लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र व लसीकरण झाले नसल्यास आरटीपीसीआरचा अहवाल तपासला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी पुढे म्हणाले. यामुळे आगामी काळात पालघर, डहाणू, वाडा या तालुक्यांमध्ये सातत्याने होणारी रुग्ण वाढ नियंत्रणात येण्यास मदत होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.