पालघर : घरगुती पातळीवर निर्माण होणारा कचरा स्थानिक स्वराज्य संस्थेकडे एकत्रितपणे सुपूर्द करण्याची पद्धत बदलून वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचा सुका कचरा गोळा करण्याची पद्धत अवलंबणे आवश्यक आहे. नागरिक तसेच प्रशासनाच्या मानसिकतेमुळे कचऱ्याची समस्या सर्वत्र निर्माण झाली असून नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला तरच ही समस्या सुटू शकेल. सार्वजनिक ठिकाणी असणारा कचरा जोपर्यंत प्रत्येक नागरिकाला खूपत नाही तोपर्यंत स्वच्छ भारत मिशन चे स्वप्न साध्य करता येणार नाही असे प्रतिपादन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त व वेंगुर्ला, संगमनेर व माथेरान या शहरांना कचरा मुक्त करण्यास महत्त्वपूर्ण जबाबदारी बजावणारे रामदास कोकरे यांनी पालघर येथे प्रतिपादन केले.
पालघर जिल्ह्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांना भेडसावणाऱ्या कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी तसेच कचरा विषयक समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी जिल्हास्तरीय घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन केले होते. या चर्चासत्राला जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतचे सरपंच, ग्राम विकस अधिकारी तसेच नगरपंचायत व नगर परिषदेचे अधिकारी उपस्थित होते.
कचरा ही सार्वत्रिक समस्या असून त्यापासून कोणाला सुटका नसल्याचे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेने ओळखले पाहिजे. या समस्येला दुर्लक्षित न ठेवता सामोरे जाऊन अधिकारी कर्मचारी तसेच लोकसहभागातून एकत्रितपणे काम करणे आवश्यक असल्याचे रामदास कोकरे यांनी सांगितले. कचऱ्याच्या जुन्या साठ्यांची विल्हेवाट लावणे तसेच नव्याने कचऱ्याचे साठे निर्माण होऊ नये याबाबत त्यांनी त्यांच्या कारकीर्दीतील केलेल्या विविध उपाय योजनांची माहिती बाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
सर्वसाधारणपणे घरगुती कचरामध्ये २७ प्रकारचे घटक असून कचरा गोळा करून त्यांचे विलगीकरण करण्याऐवजी घरगुती पातळीवर त्यांची स्वतंत्रपणे साठवणूक करावी व नागरिकांना ठरलेल्या वारी अथवा कालांतराने ते स्वतंत्रपणे गोळा करावेत यासाठी प्रवृत्त करणे आवश्यक आहे. नागरिकांना कचरा मुक्तीच्या मोहिमेत जनजागृती द्वारे सहभागी करून घेणे, त्यांची व प्रशासकीय व्यवस्थेची क्षमता बांधणी करणे तसेच घंटागाडी मध्ये वेगवेगळ्या प्रकारचा कचरा वेगवेगळ्या वारी सुटसुटीत पणे गोळा करून गोळा होणाऱ्या कचऱ्याला विक्री मूल्य प्राप्त करून देणे आवश्यक असल्याचे रामदास कोकरे यांनी सांगितले. घरगुती पातळीवर कचऱ्याची एकत्रित साठवणूक करण्याची पद्धत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेला कचरा देण्याची पद्धत बदलण्यासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे तसेच कचरा स्वीकारण्याच्या पद्धतीत बदल करताना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काही दिवस सोबत राहून जनता व कर्मचाऱ्यांची प्रबोधन करणे आवश्यक असून तसे केल्यास वर्गीकृत पद्धतीने गोळा केलेल्या कचऱ्याची विक्री होऊन स्थानिक स्वराज्य संस्थेला उत्पन्नात वाढ होऊ शकते याकडे उपस्थितांचे लक्ष वेधले.
ओला कचऱ्यापासून कंपोस्ट, पाला-पाचोळा पासून ब्रिगेड, तसेच बायोगास उत्पादनातून वीज निर्मिती व खत करणे शक्य असून प्लास्टिक चे लहान तुकडे करून प्लास्टिक तुकड्यांचा डांबरीकरणात प्रमाणित वापर करण्याबाबत त्यांनी उदाहरण दिली. प्रत्येक शालेय विद्यार्थ्याला या विषयी जागृत करून त्यांच्या मार्फत किमान १० नागरिकांचे प्रबोधन करणे व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाज सुधारित करणे शक्य असल्याचे त्यांनी केलेल्या प्रयोगातून साध्य झाल्याचे उदाहरण त्यांनी दिले. वस्तूंचा वापर, त्यांची साठवणूक, निर्माण होणाऱ्या कचरा संकलित करणे व हस्तांतरित करण्यासाठी कुशल पद्धत विकसित करणे व त्याची आपल्या परिसरातील कुटुंबाला सवय लावणे महत्त्वपूर्ण असल्याचे श्री कोकरे म्हणाले. जुन्या ठिकाणी असणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण विलगीकरण करणे, विल्हेवाट लावणे तसेच नव्याने कचरा डेपो व साठे तयार होणार नाहीत यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थानी उपाय योजना आखणे आवश्यक असलच्या सूचना त्यांनी दिल्या.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी या जिल्हास्तरीय घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळेची प्रस्तावना करताना जिल्ह्यातील अनेक मोठ्या ग्रामपंचायती मध्ये कचरा व्यवस्थापन दुर्लक्षित राहिल्याचे सांगत त्याबाबत शाश्वत उपाय योजना आखणे गरजेचे असल्याकडे लक्ष वेधले. स्थानिक स्वराज्य संस्थांकडे मर्यादित संसाधन असल्या तरी शून्य कचरा निर्मितीकडे वाटचाल करण्यासाठी अधिकारी कर्मचारी तसेच नागरिकांची मानसिकता बदलणे आवश्यक असल्याचे सांगितले. कचऱ्याची घरगुती पातळीवर विलगीकरण करून परिसरात जनजागृती करण्यासाठी आगामी काळात विशेष प्रयत्न केले जातील असे देखील मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगून पालघर जिल्हा अधिक स्वच्छ व सुंदर करण्यासाठी वाटचाल करीत असल्याची संकेत दिले. याप्रसंगी रामदास कोकरे यांनी विविध शहरांमध्ये कचरा मुक्ती अभियान राबवल्याची माहिती उपस्थितांना देण्यात आली. या कार्यशाळेला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, वेगवेगळे विभाग प्रमुख उपस्थित होते.
एकल वापर प्लास्टिक वापरावर बंदी आणि आवश्यक
कचरा विलगीकरण प्रक्रियेत प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात अडथळा यत असून एकल वापर प्लास्टिक वर पूर्णपणे बंदी आणणे आवश्यक असल्याचे रामदास कोकरे यांनी सांगितले. प्लास्टिक वापर करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करणे तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासोबत प्लास्टिक पिशव्यांना पर्यायी पिशव्यांची उपलब्धता करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. गोळा होणाऱ्या प्लास्टिकचे मशीन द्वारे एकत्रीकरण (बेलिंग) व लहान तुकडे करणे (श्रेडिंग) करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी यंत्रसामुग्री घेऊन प्लास्टिकचा पुनर्वापर होण्यासाठी व्यवस्था उभारायला हवी अशी माहिती त्यांनी दिली.