पालघर : पालघर शहरात सफाई करणाऱ्या कंत्राटी कामगारांनी पगारवाढ संदर्भात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याने संप पुकारला असून त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. नव्याने नेमणूक केलेल्या ठेकेदाराकडून आरोग्य कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात पगारवाढ होईल असे नवीन कचरा ठेक्या संदर्भात तत्कालीन नगराध्यक्ष यांनी केलेले वक्तव्य फोल ठरले आहे. यामुळे शहरातील १९ कचरा उचलणाऱ्या घंटागाड्या बंद ठेवण्यात आल्या असून त्यामुळे रस्ते व गटार सफाईची कामे देखील थांबली होती. मात्र कंत्राटी आरोग्य कर्मचारी यांच्या मागण्या संदर्भात दोन दिवसात चर्चा करून पगार वाढ देण्याचे आश्वासन दिल्यानंतर संप दुपारी स्थगित करण्यात आला.

मे २०२३ मध्ये पालघर नगरपरिषदेने कचरा ठेक्याचे नूतनीकरण करून त्यामध्ये अमुलाग्रह बदल केले. यामुळे शहरात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना २२ ते २५ हजार रुपये पगार मिळेल असे वक्तव्य तत्कालीन नगराध्यक्ष यांनी या नवीन वाढीव रकमेच्या ठेक्याच्या प्रसंगी केले होते. त्यामुळे पालघर नगर परिषदेला दर महिन्याला १७-२० लाख रुपयांचा कचरा उचलल्यावर होणारा खर्च ४५ ते ५० लाख रुपयांवर पोहोचला होता.

पालघर शहरातील सर्व आस्थापना ठिकाणाहून दैनंदिन घनकचरा स्रोतांच्या ठिकाणी ओला व सुका स्वरूपात स्वत्रंत रित्या संकलित करून नागरपरिषदेने निश्चित केलेल्या ठिकाणी वाहतूक करणे, झाडझूड करणे,दैनंदिन रस्ते सफाई करून निर्माण झालेला घनकचरा व मृत पशु इत्यादी विहित ठिकाणी वाहतूक करण्याकामी असलेल्या ठेक्यात अकुशल कामगारांना २४ हजार ४०२ रुपये, अर्धकुशल कामगारांना २५ हजार ९१२ रुपये तर कुशल कामगारांना २७ हजार ४२२ रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले होते.

प्रत्यक्षात जुन्या ठेकेदाराकडे काम करताना आरोग्य कर्मचाऱ्यांना हातामध्ये सुमारे साडेबारा हजार रुपये मिळत होते. मात्र नवीन ठेकेदाराकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला इतर करांची कपात करून १४,७०० रुपये मिळत असल्याने आपल्याला २० हजार ५०० रुपये इतका पगार वाढीव मिळावा अशी मागणी गेल्या महिन्यात केली होती. गेल्या महिन्यात देखील एक दिवसाचा लाक्षणिक संप या कंत्राटी आरोग्य कर्मचारी यांनी केला असता पुढील महिन्यापासून वाढीव पगार मिळेल असे त्यांना आश्वासन त्यावेळी देण्यात आले होते. मात्र सोमवारी देण्यात आलेल्या पगारामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ न झाल्याने पालघर शहरात काम करणाऱ्या १७५ ते २०० कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून संप पुकारला.

सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड या नगर परिषदेला भेट देणार असल्याने रस्त्याकडेला उभ्या ठेवण्यात येणाऱ्या घंटागाड्या आज ढवळे रुग्णालयाच्या परिसरात ठेवण्यात आल्या होत्या. आज सकाळपासून शहरामध्ये सफाई व कचरा उचलण्याचे कार्य बंद पडल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले होता. या संदर्भात माजी नगरसेवक कैलास म्हात्रे यांनी कामगारांची बाजू मांडून या विषयी नगरपरिषद व ठेकेदार यांच्या प्रतिनिधी यांच्याशी चर्चा केली. या संदर्भात पुढील दोन दिवसात चर्चा करून पगार वाढ देण्याचे आश्वासन दिल्यानंतर दुपारी दीड वाजल्याचा सुमारास संप स्थगित करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या संदर्भात संबंधित कचरा ठेकेदारांच्या प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधला असता यापूर्वी कर्मचारी युनियनच्या प्रतिनिधी सोबत झालेल्या चर्चेनुसार पगार नियमितपणे दिला जात असल्याचे व आवश्यक शासकीय नियमांचे पालन केले जात असल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात पुढील दोन दिवसात चर्चा होऊन अंतिम निर्णय होईल असत त्यांनी लोकसत्ता ला सांगितले.