पालघर: पालघर जिल्ह्याच्या विविध भागात मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे विद्युत खांबांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे विद्युत खांबे पूर्ववत करण्यात अधिक वेळ गेल्याने महावितरणच्या मान्सूनपूर्व कामांना विलंब झाला आहे. ही कामे ३१ मे पर्यंत पूर्ण होणार असल्याचे महावितरण विभागाकडून सांगण्यात येत आहे.

पावसाळ्या दरम्यान वीजपुरवठा सुरळीत राहावा तसेच विजेच्या तारा व खांब पडून कोणताही अपघात होऊ नये यादृष्टीने महावितरण विभागाकडून मान्सूनपूर्वी देखभाल दुरुस्ती केली जात आहे. ३१ मे पूर्वीच सर्व कामे पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्याने अनेक भागात विद्युत खांब, विद्युत तारा, विद्युत रोहित्र नादुरुस्त झाले होते. त्यामुळे त्या खांबांना व विद्युत तारांना पूर्ववत करण्याच्या कामांमध्ये अधिक वेळ गेल्याने मान्सूनपूर्व कामांना उशीर झाला आहे.

महावितरण विभागाकडून वाकलेल्या तसेच वीज वाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या धोकादायक झाडांच्या फांद्या छाटणी करणे, विद्युत खांबांवरील वेलींचा अडथळा दूर करणे, विद्युत रोहित्रांचे, खांबांचे, उपकेंद्रातील उपकरणांचे पूर्ण अर्थिंग तपासणे व तुटलेल्या अर्थवायर पूर्ववत करणे, जीर्ण व खराब पोल बदलण्याचे काम महावितरण कडून हाती घेण्यात आले आहे.

विद्युत तारांच्या जवळील वेली कापणे, वृक्षांच्या फांद्यांची छाटणी करणे, तारा तपासणे या कामांकरिता विद्युत पुरवठा खंडित करावा लागत आहे. मात्र याकरिता पूर्ण दिवसाचे भारनियमन न करता पाच ते सहा तास संबंधित भागातील विद्युत पुरवठा खंडित करून घेऊन ती कामे केली जात आहेत. तसेच अवकाळी पावसादरम्यान जवळपास 200 विद्युत खांब बदलल्यामुळे खांबांची जास्त कामे आता उरलेली नाहीत.

अवकाळी पावसामुळे खोळंबा

जिल्ह्यात ६ व ७ मे दरम्यान झालेल्या सुसाट्याचा वारा आणि पावसामुळे अनेक ठिकाणी विजेच्या तारा व विद्युत खांब उन्मळुन पडले होते. जिल्ह्यात जवळपास उच्च विद्युत दाबाचे ४४ व कमी विद्युत दाबाचे ६७ असे जवळपास ११० विद्युत खांब कोसळले होते. तसेच 17 सबस्टेशन बंद पडले होते. अवकाळी मुळे महावितरण कडून अधिक काम करण्यात आल्यामुळे मान्सूनपूर्व काम काही अंशी खोळंबली. तसेच अद्याप देखील काही भागात अवकाळीचे संकट सुरू असून विद्युत कामामध्ये अडथळा येत आहे.

महावितरण विभाग अंतर्गत देखभाल दुरूस्तीची अधिकतर कामे पार पडलेली असून उर्वरीत कामे ही येत्या १५ दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहेत. या कामाकरिता जवळपास १५० ते २०० कर्मचारी कार्यरत असून यासह सर्व शाखा अभियंते व उपविभागीय अभियंता कामावर देखरेख ठेवत आहेत – सुनील भारंबे, महावितरण अभियंता

कामादरम्यान भारनियमाचा त्रास

महावितरण विभागाकडून विजेच्या दुरुस्तीची कामे करताना त्या भागातील विद्युत पुरवठा कामादरम्यान खंडित करावा लागत असतो. त्यामुळे त्या भागातील औद्योगीकरणावर परिणाम होतो. त्यामुळे शुक्रवार हा सुट्टीचा दिवस बघून भारनियमन करावे लागत असून त्यानुसार पोल दुरुस्तीची कामे करावी लागतात. तर काही वेळेला वादळवाऱ्यात दक्षता म्हणून वीज बंद केली जाते.