पालघर नगर परिषदेची करबुडव्या मालमत्ताधारकांवर कारवाई, आठवडाभराची मुदत

पालघर : पालघर शहरामध्ये मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर (घरपट्टी) थकवल्याने त्यांच्या मालमत्तेवर पालघर नगर परिषदेमार्फत जप्तीची कारवाई केली जात आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात नगर परिषदेच्या घरपट्टी विभागाकडून ५० हजार रुपयांहून अधिकचा कर थकवणाऱ्या ७६ मालमत्ताधारकांना मालमत्ता जप्तीची नोटीस पाठवण्यात आली आहे. येत्या आठवडय़ाभरात हा कर न भरल्यास नगर परिषद त्यांची मालमत्ता जप्त करणार आहे. नगर परिषदेने ही मोहीम महिनाभरापासून सुरू केली आहे.

मालमत्ता कर थकबाकी ठेवलेल्या मालमत्ताधारकांकडे जाऊन तो कर भरून घेण्यासाठी नगर परिषदेमार्फत कर भरणा मोहीम सुरू आहे. या मोहिमेत दररोज सुमारे दोन लाखांची वसुली केली जात आहे. यासाठी पालघर नगर परिषदेमार्फत चार पथके स्थापन केली आहेत. पाच ते सहा जणांचा समावेश असलेली ही फिरती पथके थकबाकीदारांपर्यंत पोहोचून त्यांच्याकडून करवसुली करून घेत आहेत.

पालघर नगर परिषद हद्दीमध्ये ३३ हजारांहून जास्त मालमत्ताधारक आहे. या मालमत्तांपोटी नगर परिषदेला दर वर्षांला बारा कोटींच्या जवळपास मालमत्ता कर मिळतो. सद्य:स्थितीत पालघर नगर परिषदेमध्ये पाच कोटींचा कर जमा झाला आहे. उर्वरित मालमत्ता कर जमा करण्यासाठी नगर परिषदेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. आर्थिक वर्ष संपत आले असताना मालमत्ताधारक स्वत:हून मालमत्ता कर भरणा करत नसल्यामुळे पथके स्थापन करून त्यांच्याद्वारे हा कर वसूल केला जात आहे.

पन्नास हजारांपेक्षा जास्त मालमत्ता कर थकीत असलेल्या ७६ थकबाकीदारांना एक कोटी ५० लाखांचा मालमत्ता कर येणे आवश्यक होते. मात्र तो आला नसल्याने जप्तीच्या नोटिसा नगर परिषदेमार्फत पाठवण्यात आल्या आहेत. मालमत्ता कर थकबाकी ठेवलेल्या या थकबाकीदारांची नावेही वृत्तपत्र व इतर माध्यमांतून जाहीर करण्यात येणार आहेत,  असे घरपट्टी विभागाने म्हटले आहे. याचबरोबर रहिवास, वाणिज्य व इतर सामान्य मालमत्ताधारकांनाही नोटिसा व फिरत्या पथकाद्वारे दारोदारी जाऊन घरपट्टी वसुलीची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

ऑनलाइन सुविधा

ज्या थकबाकीदारांची थकबाकी असेल त्यांनी ३१ मार्चच्या आधी तहसीलदार कार्यालयाजवळील हुतात्मा स्मारक येथील कर भरणा व वसुली केंद्र येथे जाऊन कर भरणा करावा तसेच ऑनलाइन भरणा करण्यासाठी  palgharmc.org या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन पालघर नगर परिषदेतर्फे घरपट्टी विभागाचे प्रमुख निशांत पाटील यांनी केले आहे.