पालघर : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या ८०० पेक्षा अधिक कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांच्या एप्रिल व मे महिन्याच्या मानधनापोटीचा निधी प्राप्त न झाल्याने या सर्व कर्मचाऱ्यांना दोन महिन्याच्या वेतनाची प्रतीक्षा आहे. सुट्टीचा काळ व सध्या सुरू होणाऱ्या शाळेच्या पार्श्वभूमीवर वेतन उपलब्ध झाले नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागत आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषदेत कंत्राटी पद्धतीने अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात येत आहे. यामध्ये आरोग्य सेविका, परिचारिका, आरोग्य सहाय्यक (स्त्री), वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी व औषध निर्माण अधिकारी यांचा प्रामुख्याने समावेश आहे. एप्रिल महिन्यात आरोग्य विभागात ७६६ तर मे महिन्यात ९२९ कर्मचारी कार्यरत असल्याची माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे.
या कर्मचाऱ्यां च्या मानधनापोटी एप्रिल महिन्यात दोन कोटी २८ लक्ष रुपये तर मे महिन्यात दोन कोटी ६२ लक्ष रुपये असे एकंदर चार कोटी ९० लाख रुपयांचा निधी मानधन रूपाने देण्यासाठी प्रलंबित राहिला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मार्च महिन्याची मानधन ३० मार्च रोजी देण्यात आले होते. मात्र सध्याच्या आर्थिक वर्षात निधी नियमितपणे प्राप्त होत नसल्याने या कर्मचाऱ्यांना आपल्या वेतनापासून वंचित राहावे लागले आहे.
जून महिन्याच्या मध्यावर मानधन देण्यासाठी निधी प्राप्त होईल अशी आशा आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात आली होती, मात्र महिन्याची २० तारीख उजाडली तरीही मानधन रक्कम प्राप्त न झाल्याने कर्मचारी हवालदिल झाले आहेत. राज्य सरकारकडून राज्य घरातील सर्व जिल्ह्यांन एकत्रितपणे निधी वितरण केल्यानंतर त्याचे संबंधित कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना वितरण केले जाईल असे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.
जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध
जिल्ह्यातील 46 आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये आवश्यकतेनुसार पूर्ण समतेने मनुष्यबळ उपलब्ध असून वैद्यकीय अधिकारी अ प्रवर्ग ५४ वैद्यकीय अधिकारी, २४ ब प्रवर्ग मधील वैद्यकीय अधिकारी पद भरण्यात आली आहेत. याखेरीज २३५ समुदाय आरोग्य अधिकारी, १३५ पुरुष आरोग्य सेवक, ४६४ महिला आरोग्य सेविका, २११ बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, २२३८ अशा सेविका व २४७० पाडा सेवक कार्यरत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली. सद्यस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील सर्व प्रमुख पद भरण्यात आली असून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात २४ तास वैद्यकीय अधिकारी उपलब्ध राहील असे जिल्हा आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.