Palghar Police Big action Against Matrimonial Fraud : देशभरात तब्बल २० महिलांशी लग्न करून त्यांची मोठी आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका भामट्याला पालघर पोलिसांनी अटक केली आहे. नालासोपारा येथील एका महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या भामट्याचा शोध घेतला, अनेक पुरावे आणि मोठ्या शोधमोहिमेनंतर पालघर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या आरोपीचं नाव फिरोज नियाज शेख असं असून तो प्रामुख्याने विधवा महिलांना लक्ष्य करायचा. तो आधी या महिलांशी ऑनलाईन मैत्री करायचा, त्यानंतर त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी लग्न करायचा आणि त्यांची आर्थिक फसवणूक करायचा. पालघर पोलिसांनी त्याला २३ जुलै रोजी अटक केली आहे.

नालासोपारा येथील एका महिलेने फिरोज शेखविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तिने पोलीस तक्रारीत म्हटलं होतं, एका मेट्रिमोनियल साइटद्वारे तिची आणि फिरोजची ओळख झाली होती. त्यानंतर त्या दोघांनी लग्न केलं. महिलेने तिच्या तक्रारीत म्हटलं आहे की ऑक्टोबर व नोव्हेंबर २०२३ दरम्यान तिने त्याला तब्बल ६.५ लाख रुपये व अनेक मौल्यवान वस्तू दिल्या होत्या. हे सगळं घेऊन तो फरार झाला आहे. मात्र पालघर पोलिसांनी आता त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

फिरोजकडील मुद्देमाल जप्त

मिड डे च्या वृत्तानुसार, याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह भागल म्हणाले, आम्ही फिरोज शेखविरोधात याप्रकरणी भारतीय दंड विधानाच्या अनेक कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. तसेच त्याच्याकडील लॅपटॉप, मोबाईल फोन, डेबिट व क्रेडिट कार्ड, चेकबूक, दागिन्यांसह अनेक वस्तू जप्त केल्या आहेत. तसेच त्याने अनेक महिलांची फसवणूक करून मिळवलेला ऐवजही जप्त केला आहे.

महाराष्ट्र, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व गुजरातसह अनेक राज्यांमध्ये २० हून अधिक लग्नं

पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीनंतर तपास सुरू केला तेव्हा तपासादरम्यान त्यांना समजलं की फिरोज शेखने एक-दोन नव्हे तर तब्बल २० लग्नं केली आहेत. पोलीस या प्रकरणातील अनेक पीडित महिलांपर्यंत पोहोचले. फिरोजने महाराष्ट्र, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व गुजरातसह अनेक राज्यांमध्ये वेगवेगळं नाव व ओळख वापरून लग्नं केली आहेत. ही लग्नं करून त्या महिलांकडून रोख रक्कम, दागिने व मौल्यवान वस्तू घेऊन अथवा चोरून तो पळून जायचा.

हे ही वाचा >> High Court : तीन मुलांच्या पित्याबरोबर पळून गेली, उच्च न्यायालयाकडून सुरक्षा प्रदान, आंतरधर्मीय जोडप्याच्या याचिकेवर न्यायमूर्ती म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नऊ वर्षांत २० लग्नं

पोलिसांनी सांगितलं की, फिरोज प्रामुख्याने विधवा महिलांना लक्ष्य करायचा. वधू-वर सूचक संकेतस्थळांवरून त्यांच्याशी मैत्री करायचा, त्यानंतर त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याशी लग्न करायचा. लग्न झाल्यानंतर वेगवेगळी कारणं सांगून त्यांच्याकडून पैसे घ्यायचा, तर काही वेळा चोरायचा. पैशांसह दागिने व इतर मौल्यवान वस्तू घेऊन तो पसार व्हायचा. तो २०१५ पासून असे प्रकार करत आहे. गेल्या नऊ वर्षांमध्ये त्याने २० लग्नं केली आहेत.