पालघर : पालघर जिल्ह्यातील मोखाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोरेगाव वैतरणा पुलाखाली १२ जुलै रोजी एका अनोळखी पुरुषाचा बेवारस मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मोखाडा पोलिसांच्या हाती हा मृतदेह लागला असून, त्याची ओळख पटवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि मोखाडा पोलीस ठाण्याकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.
मोखाडा तालुक्यातील पोलिस ठाण्याच्या हद्दीत काल आढळून आलेल्या मृत व्यक्तीने तपकिरी रंगाचा पूर्ण बाह्यांचा स्वेटर आणि चॉकलेटी रंगाची थ्री-फोर्थ पॅन्ट परिधान केलेली आहे. त्याच्या उजव्या हातावर इंग्रजी अक्षरात MOM DAD आणि डाव्या हातावर मराठीमध्ये सरिता असे गोंदवले आहे. या वर्णनावरून मृतदेहाची ओळख पटू शकते अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
या अनोळखी मृत व्यक्तीबद्दल कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी तात्काळ पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील (७७७६०००५२४), पोलीस उपनिरीक्षक रोहित खोत (९९२२०८९४८८), पोलीस उपनिरीक्षक सुनील नलावडे (९८६०५१३५६६) किंवा पोलीस उपनिरीक्षक रवींद्र वानखेडे (८३०८३१५१००) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मोखाडा पोलीस ठाणे आणि पालघर स्थानिक गुन्हे शाखा यांनी केले आहे.
दीड वर्षापूर्वी देखील असेच प्रकरण
मोखाडा पोलीस ठाणे हद्दीतील वैतरणा नदीखाली ३ फेब्रुवारी २०२४ रोजी एक अनोळखी व्यक्तीचे प्रेत सापडले होते. याबाबत मोखाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर पालघर स्थानिक गुन्हे शाखा व मोखाडा पोलीस ठाणे यांनी या गुन्ह्यातील आरोपींना हैदराबाद येथून ताब्यात घेतले होते. रेल्वेमध्ये पाणी विकताना पैशाच्या झालेल्या वादातून मारहाण व नंतर खून करून वैतरणा नदीत फेकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्याच ठिकाणी पुन्हा असा अनोळखी मृतदेह सापडल्याने आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.