पालघर : पालघर पोलिसांनी मोरेकुरण रोडवरील एका घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून ६ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ४ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पालघर जिल्ह्याला अवैध धंद्यांपासून मुक्त करण्याच्या पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या सूचनेनुसार कारवाई करण्यात येत आहे. ३१ जुलै रोजी रात्री १२:१५ वाजता पालघर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अनंत पराड यांना मोरेकुरण रोड येथील अरुण संखे यांच्या राहत्या घरात काही इसम जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक पराड यांनी तात्काळ एक पोलीस पथक तयार करून कारवाईच्या सूचना दिल्या.
या पथकाने नमूद ठिकाणी छापा टाकला असता, तिथे पराग पाटील ( ४७), शानू अन्सारी ( ३०), अमोल संखे (४५), धर्मशील जाधव (३६), राहुल वडे (३१) आणि अक्षय पाटील (३३) हे सहा जण जुगार खेळताना रंगेहाथ सापडले. पोलिसांनी या आरोपींकडून एकूण ४,४५,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्याविरुद्ध पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश वळवी करत आहेत.