पालघर : पालघर नगरपरिषद हद्दीतील रस्त्याच्या दुरावस्थेकडे प्रशासन लक्ष देत नसल्याने पालघर शहरातील तरुण पिढी समाज माध्यमांवर एआयद्वारे हे रस्ते दुरुस्त करून प्रसारित करत आहे. अशा पोस्टमुळे समाज माध्यमांवर नगरपरिषद न करत असलेल्या कामांवर नागरिकांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. नगरपरिषद रस्त्याची दुरुस्ती करत नसल्याने ही आता स्थानिक नागरिकांसाठी केवळ एक समस्या राहिलेली नाही, तर तो एक उपहासाचा आणि गोंधळाचा विषय बनला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून विशेषतः पावसाळ्याच्या सुरुवातीपासून जिल्हासह पालघर शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्तेही खड्डेमय झाले आहेत. यामुळे वाहनचालक आणि पादचारी दोघांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे होणारे अपघात, वाहतूक कोंडी व अडचणीन बाबत नगर परिषदेकडे वारंवार तक्रार करून देखील यावर योग्य उपाययोजना बांधकाम विभाग करताना दिसून येत नाही. यापूर्वी अनेकदा रिक्षा चालक, प्रवासी, सामाजिक संस्था व तरुण मंडळींकडून खड्डे बुजवण्याचे कामे करण्यात आले आहे. मात्र असे करून देखील नगरपरिषदेला जाग येत नसल्याने ही तरुण मंडळी आता वेगळ्या प्रकारे समाधान व्यक्त करून घेत आहेत.
एका बाजूला शहरातील तरुण मंडळी खड्डेमय रस्त्यांचे वास्तव फोटो समाज माध्यमांवर टाकून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) वापरून स्वच्छ आणि चकचकीत रस्त्यांचे फोटो तयार करून ते “नगरपरिषदेने काम केले” अशा थाटात फिरवले जात आहेत. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजीचा सूर उमटत आहे. तर पालघरकरांची ही व्यथा कधी थांबणार आणि नगरपरिषद कधी प्रत्यक्षात रस्त्यांची दुरुस्ती करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
एआय मुळे वाढतोय गोड गैरसमज
पालघर नगरपरिषदेने रस्त्यांची कामे केलीच नाहीत, अशा परिस्थितीत एआय द्वारे तयार केलेले सुस्थितीतील रस्त्यांचे फोटो प्रसारित केल्यामुळे नागरिकांच्या मनात मोठा गैरसमज निर्माण होत आहे. “खरंच नगरपरिषदेने रस्ते दुरुस्त केले आहेत का?” असा प्रश्न अनेक पालघरकरांना पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या एआय जनरेटेड फोटोंमुळे वस्तुस्थिती आणि आभासी चित्र यात फरक करणे नागरिकांना कठीण झाले आहे. वास्तविक काम न करताच, केवळ एआय च्या माध्यमातून काम झाल्याचे भासवून काही नागरिक स्वतःची समजूत घालून घेत असल्याचे चित्र आहे.
नगरपरिषद आता मस्करीचा विषय
रस्त्यांच्या या दुर्दशेमुळे आणि त्यावर सुरू असलेल्या एआय च्या ‘उपचारा’मुळे पालघर नगरपरिषद आता नागरिकांसाठी मस्करीचा विषय बनली आहे. नागरिकांचा नगरपरिषदेच्या कारभारावरील विश्वास कमी होत असून त्यांच्या कामावर नागरिक पूर्णपणे कंटाळले आहेत. अनेकजण आता “एआय वरच समाधान मानण्याची वेळ आली आहे,” अशा प्रतिक्रिया देत आहेत, हे प्रशासनासाठी निश्चितच चिंताजनक आहे. नगरपरिषदेने तातडीने या समस्येकडे लक्ष देऊन रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
उपरोधिक ‘आभार’ आणि वास्तव
दरम्यान एका उपहासात्मक पोस्टमध्ये, “पालघर नगरपरिषदेने नागरिकांच्या जीवाची काळजी करत आर्यन ग्राउंड ते बिडको रस्ता पूर्ण दुरुस्त केल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. (टीप – भर पावसात कोणीही घाईगडबडीत नवीन बनवलेला रस्ता पाहिला जाऊ नये)” असा मजकूर व्हायरल होत आहे. हा मेसेज मागील काही आठवड्यांपासून मोठ्या प्रमाणात फिरत असून नगरपरिषदेच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा वाढता संताप आणि उपहास दर्शवतो.
गेले अनेक वर्ष पालघर नगरपरिषदेच्या ढसाळ कारभार पाहतोय व त्याविरुद्ध आवाज उठवतोय, पण नगरपरिषदेचे निष्काळजी आणि भ्रष्टाचारी अधिकारी व प्रतिनिधी यांना नागरिकांच्या समस्याबद्दल काही देणं घेणं नाही. म्हणून आता एआय वर बनवलेले फोटो पाहूनच नागरिकांना समाधान मानावे लागत आहे. आळशी नगरपरिषदेने आपले कामकाज नागरिकांना सुपूर्द करावे. म्हणजे नागरिक कामे तरी करतील आणि आम्ही भरत असलेल्या निधीचा सदुपयोग होईल. – हिमांशू राऊत, मनसे (समाज माध्यमांवर फोटो प्रसारित करणारा)