पालघर : पावसाळा सुरू झाल्यापासून पालघर जिल्ह्यातील नागरिकांना खड्डेमय रस्त्याचा त्रास सतत सहन करावा लागत आहे. पालघर तालुक्यातील बोईसर, मनोर, माहीम कडे जाणारे रस्ते, डहाणू तालुक्यातील जव्हार कासा चारोटी कडे जाणारे रस्ते, दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाला जोडणारा जिल्ह्यातील धुंदलवाडी-उधवा राज्यमार्ग, विक्रमगड तालुक्यातून चारोटी व तलवाडा कडे जाणाऱ्या रस्त्याची दुर्वस्था, बोईसर शहरातील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग ते तारापूर औद्योगिक क्षेत्र यासह राष्ट्रीय राज्य महामार्ग, मुख्य चौक या भागात खड्डे पडल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच रस्त्यावरून प्रवास करणे आता जिकिरीचे झाले आहे. त्याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत असून प्रशासन मात्र तात्पुरते खड्डे बुजवून वाहतूक पूर्ववत ठेवत आहे.
पालघर रेल्वे स्टेशन परिसर तसेच माहीम, मनोर, बोईसर, टेंभोडे कडे जाणारे मुख्य रस्ते, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सावरकर चौक, हुतात्मा चौक यासह डुंगीपाडा व सेंट जॉन महाविद्यालयाच्या वळणावर यासह अनेक अंतर्गत रस्ते खड्डेमय झाले आहेत. शहरातील रस्त्यांची बकाल अवस्था झाली असून किरकोळ अपघात हे आता नित्याचे झाले असल्याने प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
मुख्यालयाचा रस्ता म्हणून ओळख असलेल्या पालघर बोईसर रस्त्याच्या सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ वळणावर जवळपास एक फूट खोल तर चार ते पाच फूट रुंद खड्डे पडले आहेत. या मार्गावर तीन शाळा, दोन महाविद्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारती, जिल्हा परिषद, पोलीस अधीक्षक कार्यालय व पालघर औद्योगिक वसाहत असल्याने या रस्त्यावरून सतत अवजड वाहतूक सुरू असते. तसेच या मार्गावर गोठणपूर नाक्याजवळ ५० ते १०० मीटरच्या रस्त्याची दरवर्षी चाळण होते. पावसाळ्यापूर्वी बुजवण्यात आलेले खड्डे पहिल्या पावसातच उघडे पडले आहे. या मार्गावरून प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी सतत प्रवास करत असून प्रशासनाला मात्र या रस्त्याचा विसर पडला आहे.
जिल्ह्यातील डहाणू ते जव्हार हा सुमारे ७० किलोमीटर लांबीचा महत्त्वाचा राज्यमार्ग सध्या दुरवस्थेमुळे वाहनचालक आणि प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरला आहे. गंजाड ते कासा दरम्यान गंजाड, सारणी, चारोटी, कासा, वरोती, वेती, तलवाडा ते सोलशेत या भागांमध्ये रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत, ज्यामुळे वाहतूक अत्यंत धोकादायक बनली आहे. या मार्गावरून दररोज शाळकरी विद्यार्थी, रुग्ण, भाजीपाला वाहतूक करणारी वाहने, शासकीय बसेस आणि इतर लहान वाहने मोठ्या संख्येने ये-जा करतात. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावतो, परिणामी वेळेचा अपव्यय होत असून वाहतूक कोंडी होते. अनेकदा खड्डे चुकवताना किंवा त्यात आदळून अपघाताची शक्यता निर्माण होते. दुचाकीस्वरांना तर खड्ड्यांमुळे गंभीर अपघातांना सामोरे जावे लागत आहे.
दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाला जोडणारा पालघर जिल्ह्यातील धुंदलवाडी-उधवा राज्यमार्ग खड्ड्यांनी भरलेला असून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या खड्ड्यांचा निषेध नोंदविण्यासाठी पालघर परिसरातील पारंपरिक भातलागवडीच्या हंगामात शेतकऱ्यांकडून केली जाणारी ‘पिकांची पूजा’ ही देखील ग्रामस्थांनी रस्त्यावरच केली. धुंदलवाडी, हळदपाडा, मोडगाव आणि उधवा या परिसरातील सुमारे सहा किलोमीटरच्या रस्त्यावर संपूर्ण राज्यमार्ग खड्डेमय झाला आहे. धुंदलवाडी-उधवा मार्ग हा महाराष्ट्र आणि दादरा नगर हवेली यांना जोडणारा एक अत्यंत महत्त्वाचा दळणवळण मार्ग आहे. काही वर्षांपूर्वी या रस्त्यावर कोट्यवधी रुपये खर्चून डांबरीकरणाचे काम करण्यात आले होते. मात्र केवळ चार ते पाच वर्षांतच हा मार्ग पुन्हा उखडला असून, त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग सातत्याने दुर्लक्ष करत आहे.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग ते तारापूर औद्योगिक क्षेत्र व बोईसर शहराला जोडणाऱ्या १६ किमी लांबीच्या बोईसर ते चिल्हार या राज्यमार्गाची वाट बिकट बनली आहे. दिवसभरात या राज्यमार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ सुरु असते. रोज ५० ते ६० हजार मालवाहू अवजड आणि खाजगी हलक्या वाहनांची वाहतूक होणाऱ्या या मार्गाचे तीन वर्षांपूर्वी १०० कोटींपेक्षा अधिक निधी खर्च करून एमआयडीसीमार्फत चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र बिटकॉंन या ठेकेदार कंपनीने निकृष्ठ दर्जाचे काम केल्यामुळे अवघ्या तीन वर्षातच जागोजागी रस्त्याची दुरवस्था होऊन रस्ता वाहतुकीकरीता धोकादायक बनला आहे. या वर्षीच्या पावसात बिरसा मुंडा चौक, मुकुट पेट्रोल पंप, टाटा हाउसिंग, वाघोबा खिंड, नागझरी नाका, वेळगाव, खुटल, चिल्हार फाटा या ठिकाणी रस्त्याची चाळण होऊन मोठ्या आकारांचे खड्डे पडल्याने वाहतूकीचा वेग मंदावला आहे.
विक्रमगड शहरापासुन चारोटीकडे जाणाऱ्या विक्रमगड – तलवाडा य रस्त्यावर पडलेल्या मोठ- मोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालक आणि प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. त्यामुळे विक्रमगड – चारोटी हे १८ किमी अंतर पार करण्यासाठी अर्धा तासाच्या प्रवासासाठी दिड तास लागत आहे. या मार्गावरून चारोटी येथील महालक्ष्मी मंदिर, डहाणु समुद्र किनारा येथे जाण्यासाठी नागरिकांची मोठी वर्दळ, तसेच हा मार्ग मुंबई- अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गाला जोडत असल्याने या रस्त्यावर दररोज हलक्या व अवजड अशा आठ ते १० हजार वाहनांची रेलचेल होत आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष आणि नागरिकांचा मनस्ताप
राष्ट्रीय महामार्ग राज्य महामार्ग यासह अंतर्गत रस्त्यावरून लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी अनेकदा प्रवास करत असले तरी प्रशासन या गंभीर समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचं चित्र आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही यावर अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार विचारणा करून खड्डे लवकरच बुजविण्यात येतील इतकेच उत्तर देण्यात येत असल्याने नागरिकांची सहनशीलता आता संपली आहे. आता श्रावण महिना सुरू झाला असून गौरी- गणपती सण देखील जवळ आले आहेत. त्याआधी या रस्त्याची चांगल्या प्रकारे दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे.