पालघर : पालघर जिल्ह्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची ७ एप्रिल २०२५ रोजी काढण्यात आलेली आरक्षण सोडत रद्द करण्यात आली आहे. नव्याने पालघर तालुक्यातील ४७ व वसई तालुक्यातील १२ अशा ५९ पदांकरिता ही आरक्षण सोडत ३० जुलै रोजी सकाळी ११ वाजता तालुक्यातील तहसीलदार कार्यालय सभागृहात नव्याने काढण्यात येणार आहे.
सन २०२५ ते सन २०३० या कालावधीसाठीची पालघर जिल्ह्याच्या आरक्षण सोडतीबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी २२ जुलै २०२५ रोजी काढलेल्या आदेशानुसार ७ एप्रिल २०२५ रोजी झालेली पालघर तालुक्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींपुरती सरपंच पद आरक्षण सोडतीची संपूर्ण प्रक्रिया आणि तिचे इतिवृत्त रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे सन २०२५ ते सन २०३० या कालावधीत मुदत संपणाऱ्या बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण नव्याने निश्चित करण्याचे अधिकार पालघर तहसीलदार कार्यालयास प्रदान करण्यात आले आहेत.
मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ मधील तरतुदींनुसार ही नवीन आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्याचे तहसीलदार रमेश शेंडगे यांनी या संदर्भात पंचायत समिती पालघरच्या गट विकास अधिकारी व प्रत्येक ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींनी ३० जुलै रोजी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. या अनपेक्षित बदलामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या तयारीवर परिणाम होणार असून सरपंचपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये पुन्हा एकदा उत्कंठा वाढली आहे. सोडत रद्द होण्याचे कारण प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.