पालघर: पालघर जिल्ह्याच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवेदनशीलता रुजवणे आणि भविष्यासाठी हिरवळ तयार करणे हे उद्दिष्ट ठेवून पाच लाख सीड बॉल ची निर्मिती करून केवळ बीज नव्हे, तर हरित क्रांती घडवण्यासाठी आशा रुजविण्याचे काम हाती घेतले आहे. महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या स्थापना दिनानिमित्त ‘पर्यावरण वाचवा, वसुंधरा सजवा’ या उपक्रमांतर्गत पालघर जिल्ह्यात एक आगळीवेगळी हिरवी क्रांती सुरू झाली आहे. या दिवसाचे औचित्य साधून जिल्ह्यातील विविध स्पर्धांतील विजेत्यांचा सन्मान महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री व पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या शुभहस्ते, खासदार डॉ. हेमंत सवरा, जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखर, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे तसेच इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. विजेत्यांना प्रशस्तीपत्रासह ‘सीड बॉलचा डबा’ देऊन गौरवण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी सोनाली मातेकर, संगीता भागवत तसेच इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
या उपक्रमामध्ये चर्चेत असणारे जिल्हा परिषद शाळा लिलकपाडा, कोसबाड (ता. डहाणू) येथे कार्यरत असलेले ‘सीडबॉल मॅन’ दीपक देसले या पर्यावरणप्रेमी शिक्षक मागील चार वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने बीज गोळ्यांची क्रांती घडवत आहेत. यंदा त्यांनी तब्बल पाच लाख सीड बॉल निर्मितीचा संकल्प केला आहे. त्यांच्या पुढाकाराने सीड बॉल महोत्सव ४.० अंतर्गत यंदा राज्यभरातील १३ जिल्ह्यांत – लातूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर, रायगड, नवी मुंबई, अमरावती, अकोला, नांदेड, कोपरगाव आदी ठिकाणी बियांची पाठवणी करण्यात आली आहे.
या बिया विद्यार्थ्यांच्या हातून शेकडो शाळांमध्ये सीड बॉलमध्ये रूपांतरित होणार आहेत. या उपक्रमाची सुरुवात टोकेपाडा, घोलवड येथे झाली होती. पहिल्या वर्षी १०,०००, दुसऱ्या वर्षी २३,०००, तर तिसऱ्या वर्षी डहाणू, तलासरी, पालघर तालुक्यातील १७ पर्यावरणप्रेमी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली १८०० विद्यार्थ्यांनी १,१७,००० सीड बॉल तयार केले होते.
लिलकपाडा कोसबाड शाळेतील ४६ विद्यार्थ्यांनी केवळ चार दिवसांत ४४,००० सीड बॉल तयार करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. या उपक्रमात ‘आनंददायी शनिवार’ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक शुभेच्छा दिल्या. बियांचे संकलन हे अत्यंत सूक्ष्मपणे आणि प्रेमाने केले गेले.
लिलकपाडा शाळेतील मुलांनी बेहडा, आपटा, बहावा, चिंच, लाजरा, रिठा, बेल आदी स्थानिक बिया गोळा केल्या. शिवण, रक्तचंदन, ढोरगुंज, गुंज, खैर, बांबू, चिलार, सीताफळ, कोसुंब, करंज, अभय, बिबवा, विलायती चिंच, कांडोळ, आकेशा इ. बिया वडेश्वर महादेव ट्रस्ट बडोदा येथील अवधूत नगरकर आणि वैशाली रा. पाटील यांच्याकडून देणगीस्वरूपात मिळाल्या. परिणामी, ३०-३२ प्रकारांच्या बियांचा समावेश असलेली एक भव्य ‘सीड बँक’ उभी राहिली. या कामात यामिनी करबट, ग्रामस्थ, पालक व शाळेतील विद्यार्थी यांनी मन:पूर्वक सहभाग घेतला.
या हरित मोहिमेत अनेक शाळांनी योगदान दिले आहे. सूर्यनगर हायस्कूलचे श्री. अंभिरे, वाघाडी हायस्कूलचे श्री सोनवणे व संतोष अंकारम, बोर्डी येथील स्मिता ठाकूर, चिंबवे ब्राह्मण येथील छाया पाटील, पंकज नरवडे, शशिकांत ईशी, उल्हास देसले, अमोल तिजारे, ज्ञानेश्वर सरक, श्री. बिर्जे, पंकज पाटील (भिनारी), अर्चना चौधरी, श्री धुमाळ, साधना भानुशाली (वाडा) यांचा सहभाग विशेष उल्लेखनीय आहे.