पालघर : पालघर जिल्ह्यामध्ये ९ जुलै रोजी विविध मागण्यांसाठी अनेक संघटनांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली. सरकारी वीज कंपन्यांच्या खाजगीकरणाविरोधात विद्युत कर्मचारी संघटनांनी महावितरण कार्यालयासमोर निदर्शने केली, तर दुसरीकडे ईपीएस-९५ पेन्शनधारक ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या तुटपुंज्या पेन्शनमध्ये वाढ होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. याचबरोबर, महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशन (आयटक) च्या वतीनेही विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. एकंदरीत, आजचा दिवस पालघर जिल्ह्यासाठी आंदोलनवार ठरला, जिथे वेगवेगळ्या घटकांनी आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी एल्गार पुकारला.

ईपीएस-९५ पेन्शनधारकांचे पालघरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने, ज्येष्ठ नागरिकांची पेन्शनवाढीची मागणी

कमी पेन्शनमुळे दैनंदिन गरजा भागत नसून ईपीएस-९५ पेन्शनधारक ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शन वाढवण्याच्या मागणीवर शासन लक्ष देत नसल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय समोर ज्येष्ठ नागरिक ईपीएस ९५ पेन्शन धारकांनी निदर्शने केली आहेत. अनेक वर्षांपासून पेन्शनवाढीची मागणी प्रलंबित असून शासनाच्या उदासीन धोरणाविरोधात देशभरात आंदोलन सुरू असल्याचे पेन्शनधारकांनी सांगितले.

सध्या ईपीएस-९५ योजनेअंतर्गत पेन्शनधारकांना केवळ एक हजार ते साडेसात हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळते. या तुटपुंज्या रकमेत ज्येष्ठ नागरिकांच्या औषधोपचाराचा आणि इतर दैनंदिन गरजांचा खर्च भागत नाही. किमान ७५०० रुपये पेन्शन, भत्ता आणि मोफत वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी राष्ट्रीय संघर्ष समिती गेली आठ वर्षांपासून केंद्र सरकार आणि फंड कार्यालयाशी पाठपुरावा करत आहे. यात आंदोलने, उपोषणे, रास्ता रोको आणि निवेदने यांचा समावेश आहे.

ईपीएस-९५ पेन्शनधारक, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, गेली अनेक वर्षांपासून त्यांच्या हक्कांसाठी लढत आहेत. मात्र, शासन याकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्यामुळे देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर निदर्शने करण्यात येत आहेत. पालघर जिल्हा कार्यकारिणीचे अध्यक्ष अनिल ताहाराबादकर यांनी शासनाची असंवेदनशीलता कायम राहिल्यास मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. केंद्र सरकारने आमच्या भावनांची आणि दयनीय अवस्थेची दखल न घेतल्यास आंदोलनाची तीव्रता जिल्हा आणि राज्य पातळीवर वाढवून अंतिम लढा डिसेंबरमध्ये दिल्ली येथे केला जाईल.

आता सत्ताधाऱ्यांच्या दारात आंदोलन!

“गेली ११ वर्षे आश्वासनांची वाट पाहणाऱ्या पेन्शनधारकांचा संयम तुटण्याची वाट पाहू नका. अन्यथा यापुढील आंदोलन सत्ताधारी आणि घटक पक्षांच्या जिल्हाध्यक्ष, आमदार, खासदार यांच्या घरासमोर धरणे आणि थाळीनाद करून केले जाईल, असा इशारा पेन्शनधारकांनी यावेळी दिला. देशव्यापी बंदला पाठिंबा देण्यासाठी आणि निवृत्तांच्या पेन्शनवाढीबाबत पंतप्रधानांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यासाठी हा भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या आंदोलनाचे नेतृत्व प्रदीप पाटील, अशोक राऊत, रवींद्र कदम, भगवान सांबरे, हेमंत पाटील, अक्षदा पवार, टी के पाटील, जयप्रकाश जवेर, शांताराम पाटील, रवींद्र चाफेकर, रवींद्र आजगांवकर, बाळा पेडणेकर, दत्ता पाटील, विलास जाधव, हरेश ठाकूर, सुभाष मोरे, रमेश ठाकूर, आर डी पाटील, सुभाष घरत, शैलेश राणा, राजू घरत, अनंत कुडू, नरोत्तम म्हात्रे, एस टी पिंपळे यांसह विविध क्षेत्रांतील कार्यकर्त्यांनी केले.