पालघर: महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे पर्यावरणीय शाश्वत सुविधासह पालघर तालुक्यातील मुरबे येथे ग्रीनफील्ड बंदर विकसित करण्यात येत असून या प्रक्रियेत मुरबे बंदर प्रकल्पाचा मसुदा पर्यावरण मूल्यांकन अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सादर करण्यात आला असून बहूहंगामी मल्टी-कार्गो ग्रीनफील्ड डीपवॉटर पोर्ट प्रकल्पाचा एक मोठा टप्पा पार पाडला आहे. या बंदरामुळे पालघर जिल्ह्यात व राज्याकरिता वाढवण पाठोपाठ आर्थिक विकासाचे नवीन केंद्र बनवण्यासाठीची वाटचाल सुरू झाली आहे.

जेएसडब्ल्यू मुरबे पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने २१ जुलै रोजी या प्रकल्पाचा मसुदा पर्यावरण मूल्यांकन अहवाल (ईआयए) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (एमपीसीबी) सादर केला आहे. या अहवालामुळे पर्यावरणीय मुद्द्यांवर सार्वजनिक सुनावणीच्या पुढील टप्प्याचा मार्ग खुला झाला आहे. जेएसडब्ल्यू मुरबे पोर्टने हा अहवाल केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या (MoEF&CC) मार्गदर्शक तत्त्वांनुसार तयार केला असून या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या आणि मंजुरी मिळवण्यासाठी कंपनी प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले. या बंदरासाठी आवश्यक परवानगी प्राप्त झाल्यास मुरबे बंदर प्रकल्पाचे बांधकाम एप्रिल २०२६ मध्ये सुरू करण्याचे नियोजित असून हा बंदर मार्च २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कंपनी महाराष्ट्र सागरी मंडळाचे (मेरिटाइम बोर्ड) सहकार्य लाभणार असून या प्रकल्पामुळे कोणत्याही कुटुंबाचे विस्थापन होणार नाही असे कंपनी सूत्रांनी स्पष्ट केले आहे. हा प्रकल्प कार्यरत झाल्यावर स्थानिक रहिवासी व उद्योगांना एक महत्त्वाचे लॉजिस्टिक्स केंद्र उपलब्ध होणार असून यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल अशी आशा आहे.

पालघर जिल्ह्यात वाढवण पाठोपाठ मोरबे येथे मोठ्या क्षमतेचे बारा माही बंदराची उभारणी होऊ पाहत असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्याची शक्यता आहे. यामुळे पालघर जिल्हा आगामी काळात राज्यातील आर्थिक विकासाचे केंद्र बदलण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

हा प्रकल्प पालघर जिल्ह्यातील मुरबे गावाजवळ उभारला जात आहे. या बंदराची एकूण क्षमता सुमारे १३४.०७ दशलक्ष टन प्रति वर्ष (MTPA) राहणार असून त्याठिकाणी विविध प्रकारच्या मालाची वाहतूक केला जाण्याचा समावेश आहे. या बंदरात १८ धक्के (berths) प्रस्तावित असून बहुउद्देशीय माल हाताळण्याची क्षमता असेल. या बंदराची वार्षिक कार्गो हाताळणी क्षमता १३४.०७ दशलक्ष टन इतकी आहे. यात १० किमी लांबीचे साऊदर्न ब्रेकवॉटर (Southern Breakwater) आणि १.३० किमी लांबीचे नॉर्दर्न ब्रेकवॉटर (Northern Breakwater) व १०३५ एकर जागा समाविष्ट आहे.

कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधा

प्रकल्पासाठी आवश्यक पाणी सिंचन विभागाच्या सूर्य प्रकल्पातून घेतले जाणार असून विजेचा पुरवठा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडकडून (MSDCL) होईल. या बंदराला राष्ट्रीय महामार्ग (एनएच-४८), मुंबई-वडोदरा द्रुतगती मार्गाद्वारे रस्त्यांची जोडणी दिली जाणार आहे. वाहतूक व्यवस्था सुलभ करण्यासाठी समर्पित मालवाहू रेल्वे मार्गाशी (डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर) जोडण्यासाठी १३ किमी लांबीचा रेल्वे मार्ग विकसित करण्यात येणार आहे.

प्रकल्पाची सद्यस्थिती

मसुदा पर्यावरण मूल्यांकन अहवाल (EIA) प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सादर झाल्यामुळे आता सार्वजनिक सुनावणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. खाजगी भूमी संपादनासाठी जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. प्रकल्पा च्या नियोजनानुसार एप्रिल २०२६ मध्ये बांधकाम सुरू होणे अपेक्षित आहे आणि मार्च २०२९ पर्यंत ते पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पामुळे कोणत्याही घरांचे विस्थापन होणार नाही असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

बंदर प्रकल्पाचे प्रमुख वैशिष्ट्ये

  • बहू-हंगामी कार्यान्वयन : हे बंदर कोणत्याही हवामानात २४/७ कार्यरत राहणार असल्यामुळे व्यापारात सातत्य राखले जाईल.
  • अखंड कनेक्टिव्हिटी : राष्ट्रीय महामार्ग आणि डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉरशी थेट जोडणीमुळे वाहतूक जलद आणि सुलभ होईल.
  • मल्टी-कार्गो हाताळणी : कंटेनर सह इतर विविध प्रकारच्या मालाची हाताळणी करण्याची क्षमता.
  • पर्यावरणाची काळजी : विकासक पर्यावरण संरक्षणासाठी कटिबद्ध असून किनारी भागातील पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाऊन विकासासोबत पर्यावरणाचा समतोल साधला जाईल.
  • भविष्यासाठी सज्ज : अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रभावी नियोजन वापरून, मुरबे पोर्ट केवळ आजच्याच नव्हे तर भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी तयार होत आहे.

जिल्ह्यात दोन बंदर विकसित होणार

पालघर जिल्ह्यात वाढवण बंदराला पर्यावरणीय परवानगी प्राप्त झाली असून सुमारे २९८ दशलक्ष मॅट्रिक टन प्रति वर्ष इतके विविध प्रकारचे कंटेनर सह कार्गो हाताळणी करण्यासाठी पहिल्या टप्प्यात १३ तर दुसऱ्या टप्प्यात सहा असे १९ बर्थ कार्यरत राहणार आहेत. वाढवण बंदराचा पहिला टप्पा २०२९ पर्यंत कार्यरत होणे अपेक्षित असून या बंदर क्षेत्रात नांगरलेल्या जहाजांना स्थैर्य देण्यासाठी १०.१४ किलोमीटर लांबीचा ब्रेक वॉटर बंधारा बांधणे अपेक्षित आहे.

या बंदरापासून सुमारे ३५- ४० किलोमीटर अंतरावर प्रस्तावित असणाऱ्या जेएसडब्ल्य मुरबे बंदरात १३४ दशलक्ष मॅट्रिक टन प्रतिवर्ष हाताने क्षमता असून मार्च २०२९ मध्ये कार्यरत करण्याचे उद्दिष्ट असणाऱ्या या बंदरामध्ये १६ बर्थ प्रास्तावित आहेत. या बंदरातील नौकांना समुद्री लाटांपासून स्थैर्य देण्यासाठी दक्षिणेला १० किलोमीटर तर उत्तरेच्या दिशेला १.३० किलोमीटर लांबीचा ब्रेक वॉटर बंधारा उभारण्याचे प्रस्तावित आहे. वाढवण बंदरा लगत १४११ एकर तर मुरबे बंद्रालगत १०३५ एकर जमीन संलग्न कामासाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त आहे.