पालघर : महाराष्ट्राची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लालपरीची सेवा आजही ग्रामीण भागासाठी महत्त्वाची आहे. पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचा अधिकतर प्रवास हा एसटीवर अवलंबून असतो. पालघर जिल्ह्यात पालघर, वसई, जव्हार, अर्नाळा, बोईसर, डहाणू, सफाळे व नालासोपारा असे आठ आगार आहेत. जिल्ह्यात जवळपास ४१० बस गाड्या असून त्यातून ८४ लांब पल्ल्याच्या मार्गावर बसेस सुटतात. जिल्ह्यात वातानुकूलित बसची संख्या ३५ आहे. एसटीतून प्रवास करणाऱ्या दैनंदिन प्रवासी संख्या सरासरी एक लाख असून यामधून एसटीला प्रवासी भाडे उत्पन्न सरासरी ३५ लाख व इतर वाणिज्य आस्थापनातुन २ लाख महिन्याला उत्पन्न येत आहे.
ठाणे जिल्ह्याचे विभाजन होवून आजमितीस पालघर जिल्ह्याला ११ वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असून देखील जिल्ह्यातील सर्वच बस आगारांची व त्यातील सोयी सुविधांची स्थिती दयनीय झाली आहे. अनेक ठिकाणी आजही मूलभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या हजारो प्रवाशांना रोज या समस्यांशी सामना करावा लागतो. प्रवाशांना अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. पालघर जिल्ह्यातील बस आगारांची स्थिती फारशी समाधानकारक नसल्याने प्रवाशांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पालघर
पालघर हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने या भागात नागरिकांची वर्दळ इतर तालुक्याच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात आहे.महिला आणि पुरुषांसाठी पुरेशी व स्वच्छ प्रसाधनगृहे उपलब्ध नाहीत. यामुळे विशेषतः महिला प्रवाशांची मोठी गैरसोय होते.उन्हाळ्यात आणि इतर वेळीही पिण्याच्या पाण्याची योग्य सोय उपलब्ध नाही. तर पालघर आगारातील पाणपोइची दुर्वस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना पाणी विकत घ्यावे लागते किंवा बाहेरून आणावे लागते. बसची वाट पाहण्यासाठी असलेले प्रतीक्षागृह अपुरे व मोडकळीस आलेले आहे. बसण्यासाठी पुरेशी जागा नसून पावसा दरम्यान गैरसोय होते. तसेच त्या ठिकाणी धोकादायक झाड देखील आहे.
बस कधी येणार, वेळेत बदल झाल्यास त्याची माहिती देणारे फलक किंवा उद्घोषणा प्रणालीचा अभाव असतो. यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडतो.रात्रीच्या वेळी बस स्थानकांवर पुरेशी प्रकाशयोजना नसल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची देखील आवश्यकता आहे.अनेकठिकाणी झाडाच्या फांद्या, कचरा पडला असून तो उचललं जात नाही आगारात काँक्रिटीकरण झाले असले तरी अनेक ठिकाणी चिखल साचतो
बोईसर
बसची देखभाल आणि दुरस्ती व कार्यालयीन कामांसाठी ५५ कर्मचारी आहेत. मात्र एकूण मंजूर पद संख्येच्या तुलनेत बोईसर आगारात जवळपास ३५ ते ४० टक्के कमी मनुष्यबळ कार्यरत असून अपुऱ्या मनुष्यबळामुळे इतर कर्मचाऱ्यावर कामाचा ताण वाढून त्यांना जास्तीचे काम करावे लागत आहे. आगारात नुकतेच कॉंक्रीटीकरण करण्यात आले असले तरी सभोवताली संरक्षण भिंत नसल्याने रात्रीच्या सुमारास चोर, गर्दुल्ले, मद्यपी यांचा बस स्थानक परिसरात वावर वाढला आहे.स्थानकाच्या पश्चिम बाजूला रहिवासी इमारतीमधील कचरा टाकण्यात येत असल्याने प्रवाशांना दुर्गंधी सहन करावी लागते.प्रवासी व कर्मचारी यांच्यासाठी आवश्यक प्रतीक्षा कक्ष, विश्रांती कक्ष, बैठक व्यवस्था सोयी सुविधांची वानवा आहे. महिला प्रवाशांसाठी असलेल्या स्वच्छतागृहाला टाळे असून यामुळे त्यांची मोठी कुचंबना होते काही दिवसांपूर्वी झालेल्या बस अपघातात हिरकणी कक्ष उध्वस्त झाला आहे. बोईसर बस स्थानक तारापुर रस्त्याला लागून असल्याने बाहेरील वाहने बस स्थानकात बेकायदा पार्किंग करून ठेवली जात असल्याने बस उभ्या करण्यास अडथळा येतो.
विक्रमगड
बस स्थानक नसल्याने विद्यार्थ्यांना भर रस्त्यावर उघड्यावर उभे राहूनच बसची वाट पहावी लागते यामुळे विद्यार्थ्यांना नेहमी असुरक्षितता वाटते बस स्थानक नसल्यामुळे येथे प्रसाधनगृहाची सोय नसल्याने महिलांची कुचंबना होत आहे.विक्रमगड तालुक्यातील आजूबाजूचे गाव पाड्यातील रहिवासी बँक, पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, ग्रामीण रुग्णालय याकरीत तालुक्याच्या ठिकाणी येत असल्यामुळे बस स्थानक असणे गरजेचे आहे.
जव्हार
जव्हार या ठिकाणी डहाणू वरून नाशिक, शिर्डी, अहिल्यानगर, संभाजीनगर अशा लांब पडल्याच्या बस या बस डेपोत येतात परंतु बस डेपोला अपुरी जागा असल्यामुळे बस डेपो मध्ये उभा करण्यास त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पावसाळा तसेच उन्हाळ्यामध्ये प्रवाशांसाठी जागा पुरेशी नाही. स्वच्छालयाची अपुरी व्यवस्था तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या उशिरा येत असल्यामुळे प्रवाशांना मिळेल त्या वाहनाने प्रवास करायची वेळ या ठिकाणी येते.
जव्हार मध्ये उपजिल्हा, महाविद्यालय कॉलेज, आयटीआय कॉलेज असल्याने मोठ्या संख्येने या ठिकाणी रहदारी असते. उन्हाळ्यात तर या ठिकाणी स्वच्छतागृहांमध्ये काही वेळा पाण्याची देखील सोय नसल्याने नाईलाज असतो प्रवाशांना उघड्यावरती जायची वेळ येते.
मोखाडा
मोखाड्यात बस स्थानक आहे परंतु या ठिकाणी खाजगी वाहन लावली जातात त्यामुळे चालकांना बस लावण्यास त्रास होतो.मोखाडा हा आदिवासी तालुका असून मोठ्या प्रमाणात नागरिकांना बस गाड्यांवर अवलंबून राहावे लागत असून गाड्या वेळेवर न आल्यामुळे नागरिकांना काही वेळा मिळेल त्या वाहनाने किंवा पायी चालत प्रवास करावा लागतो या ठिकाणी प्रवाशांना बसण्याची सोय नाही शौचालय आहे परंतु तेही अस्वच्छ असते.
उन्हाळ्यात तर या ठिकाणी पिण्यासाठी पाणी नसते त्यामुळे पाणी अभावी शौचालयाचा उपयोग केला जात नाही. रात्री आठ नंतर नाशिक किंवा पालघर मुख्यालयाकडे येण्यासाठी एसटी बस सुविधा उपलब्ध नाही. एखादा गंभीर रुग्ण असल्यास त्याला रुग्णवाहिका किंवा मिळल त्या वाहनाने नाशिक किंवा पालघर या ठिकाणी न्यावे लागते.
वाडा
ठाणे जिल्ह्याचे विभाजन होवून देखील वाडा एसटी बस आगाराचा कारभार हा पालघर विभागाकडे हस्तांतरित न झाल्याने आजही ठाणे विभागामार्फत सुरू आहे. वाडा आगारातून पंढरपूर, यावल, जामनेर, अक्कलकुवा, शिर्डी, पुणे ह्या लांब पल्ल्यांच्या तर ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, जव्हार या जिल्हांतर्गत बस सुटल्या जातात. चालक, वाहक व कर्मचाऱ्याची संख्या कमी असल्याने आगारात मनुष्यबळाचा अभाव दिसून येतो.
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बस स्थानकांवर शौचालय, मार्गफलक, फेऱ्यांचे वेळापत्रक या गोष्टींचा देखील अभाव आहे.नगरपंचायतीकडून पाणी उपलब्ध होत नसल्याने पिण्याचे पाणी व शौचालयासाठी टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा होत आहे.पार्सल सुविधा, वाहनतळ नाही. सुसज्ज शौचालय होणे अपेक्षित स्थानकावर महिलांसाठी विशेष आसन, शौचालय, हिरकणी कक्ष अशी व्यवस्था नाही.
बसने प्रवास करणे ही आमची गरज आहे, पण बस स्थानकावर उतरल्यावर किंवा बसची वाट पाहताना अनेक अडचणी येतात, त्यामुळे प्रवासाचा अनुभव खूप वाईट होतो. विशेषतः वृद्ध, लहान मुले आणि महिलांना याचा सर्वाधिक त्रास होतो. अनेकदा चालक वाहकांची मुजोरी सहन करावी लागते.उज्वला पाटील, दैनंदिन प्रवासी
पालघर एसटी विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता आणि जुन्या बसेसचा प्रश्न आहे, पण तो लवकरच सुटणार आहे. २२०० कर्मचारी असूनही संख्या अपुरी आहे. ५५ नवीन बसेस मिळाल्या आहेत आणि सर्व बसचे फिटनेस पूर्ण आहेत. कर्मचाऱ्यांची वागणूक चांगली असून आगारात सर्व सुविधा उपलब्ध आहेत. पालघर एसटी विभाग प्रवासी सेवा सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहे. कैलास पाटील, विभाग नियंत्रक