पालघर : पालघर शहरातील मुख्य रस्त्यांवर हातगाड्या व अन्य हॉकर, विक्रेत्यांकडून झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी तसेच अपघात होण्याची शक्यता वर्तविणारे वृत्त लोकसत्ता मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची दखल घेऊन पालघर नगर परिषदेने प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमण दूर करण्यासाठी धडक कारवाई केली.
पालघर रेल्वे स्थानकापासून माहीम व मनोर रोडवर सुमारे एक किलोमीटर परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले होते. या ठिकाणी दिवसभर खाद्यपदार्थांचे विक्रेते तर सकाळी व सायंकाळी भाजीपाला, कटलरी वस्तूंची विक्री राजरोसपणे सुरू होती. तर सायंकाळी ओळीने या मुख्य रस्त्यांवर १५- २० हातगाड्या भाजी विक्री करण्यासाठी उभ्या केल्या जात असल्याने रेल्वे स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते.
फेब्रुवारी महिन्यात तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी या संदर्भात नगरपरिषदेला सूचित केल्यानंतर काही काळ अतिक्रमण धारकांविरुद्ध कारवाई करण्यात आली होती. मात्र मनुष्यबळाच्या मर्यादेचे कारण सांगून नंतर कारवाई थांबवण्यात आली होती. त्यामुळे काही दिवसातच पालघर रेल्वे स्टेशन परिसर पूर्ववत झाला होता.
पालघर रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या अतिक्रमणाविरुद्ध आज लोकसत्ता मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली. जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्यानंतर आज सकाळी १० वाजल्यापासून रेल्वे स्टेशन परिसरात नगर परिषदेचे कर्मचारी दाखल होऊन अतिक्रमण करणाऱ्या विरुद्ध कारवाई सुरू केले. या कारवाई मध्ये अनेक हातगाड्या व हंगामी दुकान उभारल्याचे साहित्य हस्तगत केल्याची माहिती नगरपरिषदेचे वरिष्ठ अधिकारी भाग्योदय परदेशी यांनी लोकसत्ता ला दिली. पालघर शहरातील प्रमुख रस्त्यांसह जिल्हा मुख्यालयाला जोडणारा पालघर बायपास मार्ग यावरील देखील अतिक्रमण दूर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नगरपरिषदेच्या कारवाईमुळे जिल्हा मुख्यालय असणाऱ्या शहरातील प्रमुख रस्त्याने पुन्हा मोकळा श्वास घेतल्याचे दिसून आले आहे.
कायमस्वरूपी पथक आवश्यक
नगरपरिषदेकडे मनुष्य बळाची मर्यादा असताना कार्यालयीन कामासाठी घेण्यात येणाऱ्या कंत्राटी पद्धतीच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे अतिक्रमण हटवण्यासाठी देखील हंगामी कर्मचाऱ्यांचे पथक उभारणे आवश्यक झाले आहे. यासाठी तत्कालीन मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी तात्विक मंजुरी दिली होती. मात्र त्यांची बदली झाल्यानंतर पालघरला पूर्णवेळ मुख्याधिकारी लाभला नसल्याने या बाबतचा निर्णय प्रलंबित राहिला आहे.
हातगाडीवाल्यांचा मोबदला कुणाला
आपल्या दुकानासमोर हातगाड्या उभ्या केल्यास संबंधित दुकानदार त्यांच्याकडून दर महिन्याला मोबदला घेत असतात. नगर परिषदेचे काही नगरसेवक व काही अधिकारी देखील हातगाडीवाल्यांकडून मोबदला मिळवण्यासाठी प्रयत्नशील असायचे. इतकेच नव्हे तर नगरपरिषदेने कारवाई केल्यानंतर हस्तगत केलेल्या हातगाड्या सोडवण्यासाठी तत्कालीन नगरसेवक दबाव टाकत असायचे असे अधिकारी वर्गाकडून सांगण्यात येते. सध्या नगर परिषदेत कौन्सिल कार्यरत असले तरी आश्रय देण्याच्या नावाखाली काही नगरसेवक हातगाडीवाल्यांकडून तसेच हॉकर कडून मोबदला घेत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.