पालघर : २०२५ मध्ये होणाऱ्या पालघर जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या आठ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचना अधिसूचना आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. भौगोलिक सलगता राखण्याच्या दृष्टीने रचनेमधील विविध निर्वाचक गणांमध्ये किरकोळ बदल सुचविण्यात आली असून याविषयी २१ जुलै पर्यंत हरकती व सूचना नोंदविण्याची संधी नागरिकांना देण्यात आली आहे.

ग्राम विकास विभाग यांच्या १२ जून रोजीच्या शासन आदेशानुसार हा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. या अधिसूचनेनुसार पालघर जिल्हा परिषदेसाठी एकूण ५७ निवडणूक विभाग आणि आठ पंचायत समित्यांसाठी ११४ निर्वाचक गण निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार सदस्य संख्या देखील नेमून देण्यात आली आहे.

ही प्रारूप प्रभाग रचना अधिसूचना आजपासून शासकीय राजपत्रामध्ये तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, तहसील कार्यालये आणि पंचायत समिती कार्यालयांच्या नोटीस फलकांवर आणि संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिक या प्रारूप रचनेवर २१ जुलै पर्यंत हरकती आणि सूचना दाखल करू शकतात. या हरकती व सूचना संबंधित तहसील कार्यालये किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीकारल्या जातील.

पुढील प्रक्रिया

प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर ११ ऑगस्ट पर्यंत कोकण विभागाचे विभागीय आयुक्त यांच्यामार्फत सुनावणी घेऊन निर्णय दिला जाईल. त्यानंतर, पालघर जिल्हाधिकारी पालघर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूक विभाग व निर्वाचक गणाची अंतिम रचना करतील. ही अंतिम अधिसूचना १८ ऑगस्ट पर्यंत शासकीय राजपत्रामध्ये प्रसिद्ध केली जाणार आहे. या अधिसूचनेला जिल्हाधिकारी कार्यालय पालघर, तहसीलदार, पंचायत समिती कार्यालयातील सूचना फलक, संकेतस्थळे आणि स्थानिक वृत्तपत्रांमध्ये व्यापक प्रसिद्धी दिली जाणार असून या प्रभाग रचनेमुळे जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. इच्छूक उमेदवारांनी आणि राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे.

प्रारूप गट, गण रचनेत विशेष बदल नाही

या निर्वाचक गण व निवडणूक विभागाचे (गट) रचनेला सन २०११ ची जनगणना विचाराधीन घेण्यात आली असून सन २०१९ मध्ये गट व गणांची आखणी करताना हस्त नकाशांचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे काही ठिकाणी गावांची सलगता राखणे कठीण झाले होते. यंदाच्या वर्षी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट व गणाच्या रचना करताना नागपूर येथील महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग एप्लीकेशन या शासकीय संस्थेची नकाशे अभ्यासून गावांची भौगोलिक व सलगता राखण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असे करताना १०-१२ निर्वाचक गणांमध्ये किरकोळ बदल करण्यात आले असून जिल्हा परिषद विभागांमध्ये (गट) कोणताही विशेष बदल झाला नसल्याचे सांगण्यात आले. जिल्हा परिषदेचे विभाग अथवा पंचायत समितीचे निर्वाचक गण यांची नाव करताना पूर्वीच्या प्रभागाचे सर्वात मोठ्या ग्रामपंचायतचे नाव दिले जायचे. मात्र यंदा शासनाने दिलेल्या नव्या निकषानुसार या निर्वाचक गट व निवडणूक विभागाचे नाव त्या प्रभागातील सर्वात अधिक लोकसंख्येच्या गावाच्या आधारे नमूद करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासन कडून प्राप्त झाली आहे