पोटनिवडणुकीत बहुरंगी लढतींमुळे समीकरणांत बदल

नीरज राऊत, लोकसत्ता

पालघर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी पालघर तालुक्यात झालेल्या ११ जागांच्या निवडणुकीत शिवसेना व भाजपला संमिश्र यश लाभले आहे. यापैकी तब्बल सात ठिकाणी यापूर्वी विजयी झालेल्या पक्षाच्या उमेदवाराला पराभवाचा झटका बसला आहे. बहुरंगी निवडणुकीमुळे बदललेली परिस्थिती तसेच गतवेळच्या विजयी सदस्यांविषयाची नाराजी मतदारांनी आपल्या मताद्वारे व्यक्त केली आहे.

जिल्हा परिषदेच्या दोन जागांसाठी पालघर तालुक्यात झालेल्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या मावळत्या सदस्य विनया पाटील (शिवसेना) यांनी सावरे एम्बूर गटामध्ये आपले सदस्यत्व कायम राखले आहे. या जागेवर त्यांनी बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारावर ३६३५ मताधिक्य घेतले असून भाजपचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. भाजपच्या ताब्यात असणाऱ्या नंडोरे-देवखोप गटामध्ये गेल्या वेळच्या सदस्या व भाजपाच्या उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या

असून जानेवारी २०१९ च्या निवडणुकीत पराभूत झालेल्या नीता समीर पाटील या शिवसेनेच्या उमेदवार ८६७ मतांनी विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पराभूत केले. ओबीसी आरक्षणामुळे बाद झालेल्या पंचायत समितीच्या नऊ  जागांपैकी शिवसेनेच्या सहा जागा तसेच बहुजन विकास आघाडी, मनसे व अपक्ष यांच्याकडे प्रत्येकी एक जागा रिक्त झाली होती. शिवसेनेत यापैकी बऱ्हाणपूर व अवधनगर तर मनसेने मान गणाची जागा राखली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेकडे असलेली नवापूर जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हिसकावून घेतली असून शिगाव खुताड ही सेनेच्या ताब्यातील जागा बहुजन विकास आघाडी पटकावली आहे. बहुजन विकास आघाडीकडे असलेले नवघर घाटीम व अपक्ष विजयी झालेल्या कोंढाणच्या जागेवर शिवसेनेने विजयश्री पटकावली आहे. तर शिवसेनेकडे असलेल्या सालवड व सरावली या दोन्ही जागांवर भाजप उमेदवार विजयी झाले आहेत. नवापूर पंचायत समितीच्या गणासाठी पंचायत समितीच्या माजी सभापती मनीषा पिंपळे यांच्या पतीचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिलिंद वडे यांच्याकडून ८६ मतांनी पराभव झाला. तर शिगाव-खुताड या मतदारसंघात बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराने शिवसेनेचे उमेदवार ९२ मताने पराभूत केले. मान गटांमध्ये झालेल्या बहुरंगी लढतीमध्ये मनसे उमेदवाराने आपला दबदबा कायम ठेवत १०५८ मताधिक्य घेऊन प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांना पराभूत केले. या निवडणुकीमध्ये शिवसेनेला पालघर तालुक्यात दोन जागांचे नुकसान झाले असून भाजपाने दोन जागा तर राष्ट्रवादीने एका जागेचा लाभ केला आहे. पालघर पंचायत समितीमध्ये शिवसेनेकडे २२, बहुजन विकास आघाडी व भाजपकडे प्रत्येकी चार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे तीन तर मनसेकडे एक असे पक्षीय बलाबल असून या पोटनिवडणुकीच्या निकालामुळे पालघर पंचायत समितीमधील शिवसेनेच्या सत्ता स्थैर्याला कोणतीही बाधा पोहोचणार नाही.