कासा : शिक्षणमंत्री आणि शिक्षणाधिकारी यांच्या सतत बदलणाऱ्या धोरणांमुळे आणि नियमामुळे गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थी, पालक त्रस्त झाले आहेत. आता १ एप्रिलपासून पूर्णवेळ शाळा भरवण्यात येणार असल्याबाबतचे पत्र शिक्षणमंत्री यांनी काढले आहे. त्यानुसार पालघर जिल्ह्याच्या शिक्षण अधिकाऱ्यांनीसुद्धा तसे पत्र काढले आहे; परंतु त्यामध्ये शाळेच्या वेळेचा उल्लेख न केल्याने विद्यार्थ्यांसह पालकही संभ्रमात आहेत.
दरवर्षी उन्हाळा सुरू झाल्यानंतर वाढत्या उष्णतेचा शाळेतील विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी साधारणपणे १५ मार्चपासून सकाळी ७.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत शाळा भरवण्यात येतात, तर १ एप्रिलपासून ७.३० ते ११.३० या वेळेत शाळा भरवण्यात येतात. आता या वर्षी एप्रिल महिना सुरू होण्यापूर्वी शालेय शिक्षणमंत्री यांनी १ एप्रिलपासून पूर्णवेळ शाळा भरवण्याची परवानगी शासन देत असल्याचे पत्र काढले आहे. पत्रानुसार शंभर टक्के उपस्थिती ठेवण्याचीसुद्धा परवानगी देण्यात आलेली आहे. त्यानुसार जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी लता सानप यांनीसुद्धा पूर्णवेळ शाळा भरवण्याचे आदेश देणारे पत्र काढले आहे; परंतु या आदेशांमध्ये शाळेच्या वेळेचा उल्लेख केलेला नाही. सद्य:स्थितीत दुपारी १२.३० वाजता शाळा सोडण्यात येते. बरेचसे विद्यार्थी सकाळच्या शाळेला येताना उपाशीपोटी शाळेत येतात. बहुतांश गरीब आदिवासी मुलांकडे पायामध्ये घालण्यासाठी चपलासुद्धा नसतात. दुपारी शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना रणरणत्या उन्हात अनवाणी व उपाशीपोटी घरी जावे लागते. दुर्दैवाने एखाद्या विद्यार्थ्यांस उष्माघाताचा त्रास होऊन दुर्दैवी घटना घडल्यास यास जबाबदार कोण, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत पालघर जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी यांच्याशी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद देण्यात आला नाही.
अद्याप पोषण आहार सुरू नाही
शाळेमध्ये १५ मार्चपासून शालेय पोषण आहार देण्यात येणार असल्याचे पत्र शासनाने काढले होते; परंतु अद्यापही शाळांमध्ये शालेय पोषण आहार सुरू झालेला नाही. शासनाने पूर्णवेळ शाळा भरवाव्यात; परंतु वाढते ऊन आणि मुलांचा शालेय पोषण आहार याही बाबीकडे लक्ष द्यावे, असे पालकांचे म्हणणे आहे.
संग्रहित लेख, दिनांक 31st Mar 2022 रोजी प्रकाशित
बदलत्या शैक्षणिक धोरणांमुळे विद्यार्थ्यांसह पालक त्रस्त; एप्रिलपासून पूर्णवेळ शाळा मात्र वेळेचा उल्लेख नाही
शिक्षणमंत्री आणि शिक्षणाधिकारी यांच्या सतत बदलणाऱ्या धोरणांमुळे आणि नियमामुळे गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थी, पालक त्रस्त झाले आहेत.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 31-03-2022 at 02:07 IST
Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parents students suffer changing educational policies full time school april not mention time amy