पालघर जिल्ह्यातील मच्छीमारांमध्ये असंतोष

पालघर : पालघर जिल्ह्याच्या पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या मासेमारी क्षेत्रात अवैध पर्ससीन व ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बोटींनी घुसखोरी करून उच्छाद मांडला आहे. त्यामुळे येथील स्थानिक मच्छीमारांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. मच्छीमार संघटनांनी या अवैध पर्ससीन व ट्रॉलरविरुद्ध तातडीने कारवाई करण्याची मागणी मत्स्य व्यवसाय विभागाकडे केली आहे.

जिल्ह्याच्या समुद्र हद्दीत मोठ्या प्रमाणात मत्स्यसंपदा आहे. मासेमारी करणाऱ्या स्थानिक  समुद्रात सुरमई, घोळ, दाढा, रावस तर काही प्रमाणात सरंगे, बोंबील, समुद्री कोळंबी, मांदेली आदी मत्स्यसाठे मुबलक प्रमाणात उपलब्ध  होतात.  किनाऱ्यापासून बारा नॉटिकल क्षेत्रांतर्गत वसई ते झाई येथील स्थानिक मच्छीमार पारंपरिक पद्धतीने मासेमारी करत असतात. अलीकडील काळात मत्स्य हंगाम नसल्याने मासेमारीचे प्रमाण आधीच कमी आहे. त्यात उपलब्ध  मत्स्यसंपदेवर रायगड, रत्नागिरी येथील पर्ससीन नौका डल्ला मारत आहेत. पर्ससीन बोटींनी केलेली मासेमारी ही सरसकट लहान-मोठे मासे मारण्याची पद्धत असल्याने येथील मत्स्यसंपदा नाहीशी होत आहे. त्यामुळे मच्छीमारांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा असा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. शासनाने एलईडी व पर्ससीन बोटींवर राज्य हद्दीतील मासेमारी क्षेत्रात बंदी घातली असली तरी त्यांनी धुमाकूळ घातला असून शेकडो नौका येऊन मासेमारी क्षेत्रातील मासे काढून नेण्याचे प्रकार राजरोस घडत आहेत. त्यांना रोखण्यासाठी स्थानिक मच्छीमार जातात तेव्हा ते पळून गेल्याच्या घटना  आहेत. काही वेळा त्यांच्याकडून मच्छीमारांना धमकावून मासेमारीही केली जाते असे येथे सांगितले जाते. मत्स्यव्यवसाय विभागाकडे गस्ती नौका नसल्याने त्यांच्या ही बाब लक्षात येत नाही तसेच या विभागाचे समुद्री क्षेत्रात लक्ष नसल्याने त्याचा फायदा पर्ससीनधारक घेत असून येथील मत्स्य संपदा नष्ट करण्याचे कारस्थान सुरू आहे.

काय आहे पर्ससीन?

एका मोठ्या बोटीतून सरसकट मासे मारणारे एक जाळे मासेमारी क्षेत्रात दूरवर रोवले जाते त्यानंतर या जाळ्याचे एक टोक यंत्राच्या साह्याने बोटीवर खेचले जाते या प्रकारच्या मासेमारीमुळे लहानापासून मोठे व नको असलेले मासेही पर्ससीन पद्धतीच्या जाळ्यात अडकून मत्स्य संपत्तीची मोठी हानी होत आहे

पर्ससीन व ट्रोलर्स नौका समुद्री क्षेत्रात असल्याच्या चित्रफिती उपलब्ध झाल्या आहेत. त्यानुसार मत्स्यव्यवसाय विभाग समुद्री क्षेत्रात गस्ती घालून पाळत ठेवत आहे. बेकायदा नौका आढळल्यास कारवाई करीत आहोत.

-आनंद पालव,  सहमत्स्यव्यवसाय आयुक्त, ठाणे व पालघर

पर्ससीन नौकाधारक घुसखोरी करून या क्षेत्रातील मत्स्य संपदा नष्ट करण्याचा घाट घालत आहे. यामुळे येथील मच्छीमार नेस्तनाबूत होणार आहे, अनेकांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. -जयकुमार भाय, अध्यक्ष, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी संघ