भातपिकावरील बगळ्या रोगाच्या नियंत्रणासाठी उपाययोजनांचे आवाहन

पालघर: पालघर जिल्ह्य़ातील काही तालुक्यांमध्ये भातपिकांवर बगळ्यासदृश रोग पसरला आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन हा रोग इतरत्र पिकांवर पसरू नये यासाठी कृषई विभागामार्फत विविध कृषई मंडळांमध्ये भातपिकांवरील कईड नियंत्रण कार्यक्रम राबविला जात आहे.

भातपिकावरील प्रमुख किडीचे नियंत्रण करण्यासाठी प्रत्येक गावागावात जाऊन कृषी साहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी यांच्यामार्फत शेतकऱ्यांना खोड कीड नियंत्रणाबाबतच्या उपयुक्त सूचना व उपाययोजना समजावून सांगण्यात येत आहेत. पावसाच्या लहरीपणामुळे तसेच उघडिपीमुळे मोठय़ा प्रमाणात कीड रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. म्हणूनच शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाय योजना करावी व कीड रोगापासून आपल्या पिकाचं नुकसान टाळावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

पालघर जिल्ह्य़ातील कृषी विभागामार्फत सर्वत्र खोडकिडा आणि नियंत्रणाबाबतच्या सभा आयोजित करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. या प्रशिक्षण व कार्यशाळेदरम्यान जिल्ह्य़ातील काही शेतकऱ्यांच्या शेत जमिनीत काही भागात पाणी साचत असलेल्या ठिकाणी भाताची रोपे पांढरी झालेली आढळली आहेत. या रोपांवर बगळ्या हा रोग आढळून आला म्हणजेच स्थानिक भाषेत त्यास बग्या असे म्हणतात.

या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतातील पाणी बांधून त्यावर दोरी फिरवावी जेणेकरून सर्व सुरळीतील अळी (बग्या) पाण्यात पडून मरतील. काही ठिकाणी खोड किडीचा प्रादुर्भाव थोडय़ा प्रमाणात आढळत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी दाणेदार कीटकनाशकाचा वापर करून शेतामध्ये वापरावा (फोरेट १०जी किंवा फुरोडोन कीटकनाशक वापरावे) तसेच शेताचे बांध स्वच्छ करून घ्यावेत.

पक्ष्यांच्या माध्यमातून किडीचे नियंत्रण

कामगंध सापळे वापरून त्याद्वारे कीटक व पतंग यापासून भाताचे रक्षण करता येते. पक्ष्यांच्या माध्यमातून किडीचे नियंत्रण करण्यासाठी एका एकर क्षेत्रात किमान दहा पक्षी थांबे उभे केल्यास किडीचे नियंत्रण होणे सोपे आहे. खोडकिडीचे जैविक नियंत्रण करण्यासाठी ट्रायकोग्रामा जपोनिकम या प्रजातीचा आठवडय़ाच्या अंतराने व लागवडीनंतर एक महिन्यात चार वेळा अवलंब करावा. किडीचे प्रमाण वाढू लागल्यास क्विनॉलफॉस २५ टक्के, प्रवाही २५ मिली किंवा ट्रायझोफॉस १२.५० मिली, क्लोरोपायरीफॉस २५ मिली हे दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून आलटून पालटून फवारावे.