पालघर; परराज्यातील व इतर देशातील नागरिकांकडून जिल्ह्यात होणाऱ्या चोरी व दरोड्याची वाढती प्रकरण पाहता पालघर पोलिसांकडून भाडोत्री व सुरक्षारक्षकांच्या पडताळणीसाठी विशेष मोहीम राबवण्यास आरंभ केला आहे. यामुळे आगामी काळात चोरी व दरोडा प्रकरणावर नियंत्रण येईल असे पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी पालघर येथील ज्वेलर्सवर सुरक्षा रक्षकाने केलेल्या चोरीच्या घटनेच्या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
पालघर शहरातील नाकोडा ज्वेलर्स या दुकानात ९ नोव्हेंबर रोजी चोरट्यांनी तीन कोटी ७२ लाख रुपयांचे सोने, चांदी व रोख रक्कम लंपास केली होती. ज्वेलर्सच्या शेजारी असलेल्या दुकानाचे कुलूप तोडून, ज्वेलर्सच्या दुकानाच्या सामाईक भिंतीला मोठे भगदाड पाडून त्यांनी ज्वेलर्सच्या दुकानात प्रवेश केला होता. ज्वेलर्सच्या दुकानातील लोखंडी तिजोरी त्यांनी गॅस कटरने कापून त्यातून ३,७२,३५,४६० किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता.
या चोरीबाबत पालघर पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर चोरीत मॉलच्या सुरक्षारक्षक दीपक सिंग व त्याच्या अन्य साथीदारांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या अधिक तपासाकरिता पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभा राऊळ यांनी सूचना देऊन पालघर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने वेगवेगळी पथके तयार केली. पथकाद्वारे तांत्रिक तपासामधून आरोपी हे नेपाळचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी गुजरात बाजूकडून नेपाळकडे पलायन केल्याचे दिसून आल्यानंतर त्यानुसार नेपाळ बॉर्डरची माहिती घेऊन तत्काळ त्या दिशेने पोलीस पथके रवाना झाली.
सुरत गुजरात राज्य येथे आरोपींचा तांत्रिकदृष्ट्या तपास करून उत्तरप्रदेश राज्यातील नेपाळ बॉर्डरवर जाऊन तेथील सुरक्षा कर्मचारी यांच्या मदतीने दीपक सिंग (२५), भुवनसिंग चेलाऊणे (३७), जीवनकुमार थारु (४३), खेमराज देवकोटा (३९) हे चारही मूळचे राहणारे नेपाळ येथील आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच त्यांचा अन्य एक साथीदार अर्जुन सोनी (४४) याला सुरत गुजरात येथून अटक करण्यात आले. या आरोपींकडून ५१० ग्रॅम वजनाचे सोने, दोन किलो चांदी व तीन लाख रुपये जप्त करण्यात आले.
पालघर जिल्ह्याच्या तारापूर अणुशक्ती केंद्र परिसर, एमआयडीसी, बोईसर, सरावली, सालवड, कोलवडे, खैरापाडा आणि पालघर, वाडा, डहाणू, तलासरी या तालुक्यांतील कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात राज्यांतर्गत आणि परराज्यांतून कामगार वास्तव्यासाठी आलेले आहेत. या वाढत्या वास्तव्यामुळे काही घरमालक भाडेकरूंच्या ओळखीची कोणतीही शहानिशा न करता, कागदपत्रे पुरावा म्हणून न घेता घरे भाड्याने देत आहेत. यामुळे काही परप्रांतीय इसम अवैध व्यवसाय, गुन्हेगारी आणि समाजविरोधी कृत्यांमध्ये सामील असल्याचे आढळले आहे. या पार्श्वभूमीवर, पालघर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील घरमालक, भाडेकरू इसम, सोसायटी चेअरमन, इस्टेट एजंट व नागरिकांनी सदनिका, फ्लॅट, घर, दुकाने, हॉटेल्स, जागा भाड्याने देताना भाडेकरूंची माहिती संबंधित पोलीस ठाण्याकडे देणे अनिवार्य केले आहे.
वाढत्या घटनांना आळा बसण्यासाठी पालघर पोलिसांकडून सुरक्षा रक्षक एजन्सी मध्ये गेल्या दोन महिन्यांपासून अचानकपणे भेट देण्यात येत असून यामध्ये कागदपत्रांची व इतर पडताळणी करण्यात येत आहे. तसेच घरमालक व इतर एजन्सीने पडताळणी न केल्यास त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक यांनी यावेळी सांगितले.
ही कागदपत्रे जमा करावी…
घरमालक, एजंट यांनी भाडेकरूंसंदर्भात संबंधित पोलीस ठाण्याच्या ईमेलद्वारे किंवा टपालाद्वारे मूळ वास्तव्याचा पुरावा, ओळखपत्राचा पुरावा (आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र), मोबाईल क्रमांक, परकीय नागरिक असल्यास पासपोर्टची, व्हिसाची झेरॉक्स, भाडेकरूचे नजीकच्या काळातील छायाचित्र व नोकरीचे, व्यवसायाचे ठिकाण, भाडेकरूंच्या माहितीशी संबंधित पोलीस ठाण्याचे नाव ही माहिती पुरवायची आहे.
