Preparation For Ganeshotsav 2025 पालघर: गणरायाच्या आगमनासाठी अवघे तीन दिवस उरल्याने पालघर शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने काहीशी उसंत घेतल्याने खरेदीचा उत्साह अधिकच वाढला आहे. आठवडी बाजार आणि इतर प्रमुख बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी वाढल्याचे चित्र दिसून आले.
गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, घराघरांत लगबग सुरू झाली आहे. पालघर शहरात आज शुक्रवारचा आठवडी बाजार असल्याने पूजेचे साहित्य, हार, फुले, सजावटीचे सामान आणि मोदकांसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाली आहे. सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झालेली ही गर्दी रात्री उशिरापर्यंत कायम होती. ग्राहकांना वस्तू देताना आणि पैसे घेताना दुकानदारांची चांगलीच दमछाक होत होती. विशेष म्हणजे, यंदा वस्तूंच्या किमतीत फारशी वाढ झाली नसून, नागरिक मिळेल त्या दरात उत्साहाने खरेदी करताना दिसत आहेत.
गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी मखर आणि इतर साहित्याला विशेष मागणी आहे. पारंपरिक केळीचे खांब आणि झेंडूच्या फुल खरेदीसाठी अद्याप वेळ असला तरी, प्लास्टिकची आणि विजेवर चालणारी रंगीबेरंगी तोरणे आणि माळा मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहेत. यासोबतच नवीन कपडे आणि मिठाई खरेदीसाठीही दुकानांमध्ये मोठी गर्दी आहे.
खरेदीसाठी आलेल्या नागरिकांच्या गर्दीमुळे पालघरमधील प्रमुख चौकांमध्ये वाहतूक कोंडी झाली होती. छत्रपती शिवाजी महाराज चौक, हुतात्मा चौक आणि रेल्वे स्थानक परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पंधरा-पंधरा मिनिटे एकाच ठिकाणी थांबावे लागत असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर नियंत्रण
गणेशोत्सवाच्या खरेदीच्या निमित्ताने एक सकारात्मक बदल पाहायला मिळत आहे. पालघर नगर परिषदेच्या प्लास्टिकबंदी मोहिमेनंतरही अनेक दुकानदार लपूनछपून प्लास्टिक पिशव्या देत होते. मात्र आज आठवडी बाजारात भाजीपाला आणि इतर वस्तू घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला दुकानदार ‘कापडी पिशवी आहे का?’ असे विचारताना दिसत होते. दुकानदार स्वतःहून प्लास्टिक पिशव्या देण्याचे टाळत असल्याने गणेशोत्सवाच्या निमित्ताने का होईना, प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी प्रभावीपणे होताना दिसत आहे.