पालघर : दिल्ली पासून जेएनपीटी पर्यंत उभारण्यात येणाऱ्या समर्पित मालवाहू रेल्वे मार्गीकेचा (डीएफसीसी) राज्यातील ७५ किलोमीटरचा पट्टा कार्यान्वित झाल्याची घोषणा डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर व्यवस्थापनाने केली आहे. संजाण (न्यू उंबरगाव) ते सफाळे दरम्यानच्या मार्गाची चाचणी व तपासणी भारतीय रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाल्यानंतर राज्यातील ही मार्गीका कार्यान्वित झाल्याची घोषणा करण्यात आली.

मार्च २०२४ पासून समर्पित मालवाहू मार्गातील महाराष्ट्र राज्यातील मार्गीका तयार झाल्या होत्या. मात्र त्याचे उद्घाटन लांबणीवर पडले होते. फेब्रुवारी २०२५ पासून ही मार्गिका लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले होते. ३१ मार्चच्या मध्यरात्री सफाळे येथील तर १० एप्रिलच्या मध्यरात्री नवली येथील रेल्वे फाटक कायमस्वरूपी बंद करण्यात आल्यानंतर ११ एप्रिल च्या मध्यरात्री नवली (पालघर) येथील उड्डाणपुलाचा गर्डर बसविणे तसेच सफाळे रेल्वे स्टेशनच्या दक्षिणेच्या बाजूला पश्चिम रेल्वेच्या मार्गीकेशी जोडणी करण्याचे काम पूर्ण करण्यात आले. त्याचवेळी या मार्गिकेवर इंजिन धावून प्राथमिक चाचणी घेण्यात आली होती. तसेच जोडणीच्या ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने कामे हाती घेण्यात आली.

जलद गती चाचणी संपन्न

२६ एप्रिल रोजी भारतीय रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समवेत महाराष्ट्रातील ७५ किलोमीटर मार्गिकेचे परीक्षण करण्यात आले. या परीक्षण इंजिन व एक डबा असणाऱ्या चाचणी गाडीने ताशी ११० किलोमीटर वेगाने धावून आवश्यक तांत्रिक बाबींची तपासणी केल्याची माहिती देण्यात आली. राज्यातील मालवाहू मार्गिकेवरील दोन्ही दिशेने चाचणी यशस्वी झाल्याने महाराष्ट्रातील न्यू उंबरगाव ते न्यू सफाळे दरम्यानच्या समर्पित मालवाहू रेल्वे मार्ग कार्यान्वित झाल्याचे डीएफसीसी एक्स वरून जाहीर केले आहे. यामुळे या मालवाहू मार्गीके वरून मालगाड्या नियमितपणे धावणे शक्य होणार असून पहिल्या टप्प्यात दोन्ही बाजूंनी प्रत्येकी २० मालगाड्या धावणे अपेक्षित आहे.

नवली उड्डाण पुलाचे काम जून पूर्वी होणार पूर्ण

नवली रेल्वे पुलाच्या ठिकाणी गर्डर बसवण्याचे काम पूर्ण झाले असल्याने उर्वरित रेल्वे व्यवस्थापनाशी संलग्न असणारे काम जून महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानंतर या उड्डाणपुलाच्या पोहच मार्गावर एक नव्याने गर्डर उभारणे व इतर डांबरीकरणाची काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. नवली येथील उड्डाणपूल नागरिकांसाठी लवकरात लवकर उपलब्ध करण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशील राहील असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

बोईसर व उमरोळी येथे फाटक राहणार सुरू

बोईसर (फाटक क्रमांक ५२) येथे उड्डाणपूल तसेच भुयारी मार्ग उभारण्याबाबत अजून पर्यंत निर्णय झाला नसल्याने तसेच उमरोळी (फाटक क्रमांक ४९) येथील उड्डाणपुलाचे काम प्रलंबित असल्याने या दोन्ही ठिकाणी रेल्वे फाटक कार्यान्वित ठेवण्यासाठी सिग्नल यंत्रणा बसवण्यात येत आहे. त्यामुळे मालगाडी वाहतुलीला या दोन फटाक्यांचा अडथळा काही काळ राहणार आहे.