पालघर : समर्पित मालवाहू मार्गाच्या उभारणी दरम्यान पश्चिम रेल्वेच्या मार्गीके वरील विविध रेल्वे फाटक बंद करताना काही ठिकाणी भुयारी मार्गांची उभारणी करण्यात आली असून अशा भुयारी मार्गांमध्ये पावसाचे पाणी जमण्याची समस्या कायम राहिली आहे. पाणी उपसण्यासाठी बसविण्यात आलेल्या डिझेल पंपांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत आहेत. डिझेल पंपांच्या जोडीला बसविण्यात आलेले विद्युत पंप सतत खंडित होणाऱ्या वीज प्रवाहामुळे अकार्यक्षम ठेवण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोठे, पंचळी व इतर परिसरात असणाऱ्या भुयारी मार्गांमध्ये उद्भवणाऱ्या अडचणींचा आजार सोडवण्याऐवजी उपाय (औषध) भयान असल्याची भावना बाधितांमध्ये निर्माण झाली आहे.

वैतरणा ते घोलवड यादरम्यान रोठे पंचाळी वाणगाव व वाकी या चार ठिकाणी भुयारी मार्ग असून यापैकी बहुतांश मार्गांमध्ये गेल्या वर्षी पावसा च्या पाण्याची गळती होऊन असे पाणी साचल्याने भुयारी मार्गातील वाहतूक बंद पडली होती. त्यावर उपाययोजना म्हणून बिहारी मार्गात असणारी गळती बंद करण्यासाठी विशेष काम करण्यात आले तसेच शासनाने पाणी काढण्यासाठी डिझेल पंप बसवण्यात आले होते.

गेल्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसात रोठे (केळवे रोड) येथील भुयारी मार्गामध्ये एक ते दीड फूट पाणी साचल्याची तक्रार स्थानिकांनी जिल्हा प्रशासनाकडे केली. भुयारी मार्गातील साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे काही दुचाकी बंद पडल्या तर चार चाकी वाहनांच्या बॉनेट पर्यंत लाटांचा प्रभाव भेडसावत असल्याचे सांगण्यात आले. भुयारी मार्गातील रेल्वे लाईन (रुळाखाली) ७० ते ८० मीटर पट्ट्यामध्ये पाणी साचत असून त्यामुळे नागरिकांना पूर्व पश्चिम प्रवास करणे कठीण होत आहे.

रोठे येथील क्रमांक ४४ च्या पूर्वीच्या भागात करसोंडा, मोहाळे, रोठा, डोंगरी व देवीपाडा अशी गावापासून त्यांची लोकसंख्या ८००० च्या जवळपास आहे. रोठे येथील भुयारी मार्गात पाणी उपसण्यासाठी मोठ्या क्षमतेचा डिझेल पंप बसवण्यात आला असला तरीही या पंपाच्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या पंपांच्या सोबतीने रेल्वे प्रशासनाने विद्युत पंप उभारण्याचे काम हाती घेतले असून त्याला महावितरण कडून स्वतंत्र रोहित्र मधून जोडणी करण्यात आली आहे.

पहिल्याच पावसात सफाळे व केळवे परिसरातील अनेक भाग २४ तासांपेक्षा अधिक काळ अंधारात राहिल्याच्या घटना वारंवार घडत असताना वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत प्रवाहावर आधारित चालणारे पंप कितपत प्रभावी ठरतील याबद्दल प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित करण्यात येत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत भुयारी मार्गाच्या मध्ये साचणाऱ्या प्राण्याचे प्रमाण कमी असले तरीही मुसळधार पावसाच्या वेळी परिस्थिती बिकट होईल याकडे लक्ष वेधण्यासाठी रोठे व केळवे रोड येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना तक्रारीचे निवेदन दिले आहे. या संदर्भात पुढील आठवड्यात बैठकीचे आयोजन करण्यात येईल असे पुनर्वसन विभागाच्या उपजिल्हाधिकारी यांच्याकडून स्थानिकांना सांगण्यात आले.

प्रमुख मागण्या दुर्लक्षित

या परिसरात वर्षाला सरासरी २४०० ते २८०० मिलिमीटर पाऊस होत असून भुयारी मार्गाच्या उभारणीत वापरण्यात येणाऱ्या काँक्रीट मधून गळती होत असल्याने पाणी साचण्याचा प्रकार कायम राहणार आहे. पाणी उपसण्यासाठी पंप बसवले असले तरीही भुयारी मार्गामध्ये चिखल कायम राहत असल्याने पादशाहरना प्रवास करणे कठीण होत आहे. या अनुषंगाने केळवा रोड ते सफाळा दरम्यान रेल्वे लाईनच्या समांतर रस्त्याची उभारणी करण्यात यावी तसेच रेल्वेच्या विद्युत प्रवाहावरून भुयारी मार्गात साचणारे पाणी उपसण्यासाठी स्वयंचलित पंप बसवावेत अशी मागणी पुढे आली आहे

इतरही अडचणी

भुयारी मार्गाच्या आखणी दरम्यान दोन वाहन समोरासमोर आल्यास ती सहजपणे प्रवास करणे शक्य होत नाही. विशेष म्हणजे तीव्र वळणावर समोरून वाहन आल्यास उतरणाऱ्या वाहनाला पूर्ण अंतर मागे जाणे भाग पडत असते. या पार्श्वभूमीवर समोरून येणाऱ्या वाहनांची माहिती देण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण आरसे (कोन्क्लेव्ह ग्लास) बसवण्याची मागणी दुर्लक्षित राहिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डीएफसीसी ची भूमिका

पालघर जिल्ह्यात असणाऱ्या रेल्वे खालील भुयारी मार्गांवर पावसामध्ये साचणारे पाणी उपसून काढण्यासाठी मोठ्या क्षमतेचे डिझेल पंप बसवण्यात येत असून आवश्यकतेनुसार विद्युत प्रणालीवर आधारित पंप बसवण्याचे काम देखील सुरू असल्याचे सांगण्यात आले. चार ही भुयारी मार्गाचे ठिकाणी कर्मचारी (ऑपरेटर) तैनात ठेवण्यात आले असून त्यांच्यामार्फत पाणी साचण्याची प्रक्रिया सुरू झाल्यास तातडीने पाणी उपसून काढण्याचे काम सुरू करण्यात येईल असे सांगितले. आगामी पावसाळ्यात जिल्ह्यातील भुयारी मार्गांमध्ये पावसाचे पाणी साचणार नाही यासाठी सर्वतोपरी दक्षता व सज्जता ठेवण्यात आल्याची माहिती समर्पित मालवाहू रेल्वे मार्गाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर लोकसत्ताला सांगितले.