रमेश पाटील

वाडा : महाराष्ट्रातील वाढत्या वीजदरांमुळे उत्पादन खर्च झेपेनासा झाल्याने वाडा तालुक्यातील १७ पोलाद कारखाने गेल्या पाच वर्षांत गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांत स्थलांतरित झाले आहेत. यापैकी सात कारखाने गेल्या दोन वर्षांत राज्याबाहेर गेले आहेत. रांज्यभरातही ३६ कारखान्यांना टाळे लागले असल्याचे समोर येत आहे.

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात गेल्या २० वर्षांपासून पोलाद कारखान्यांनी जम बसवला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत विजेच्या दरांत सातत्याने वाढ होत असल्याचा मोठा फटका या कारखान्यांना बसू लागला. पाणी, रस्ते, दळणवळणाची साधने आदींशी झगडत असलेल्या या कारखान्यांसाठी विजेचे दर हा कळीचा मुद्दा बनू लागला. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत १७ पोलाद कारखाने शेजारील राज्यांत स्थलांतरित झाले. काही कारखाने कायमस्वरूपी बंद करण्यात आल्याचेही समोर येत आहे. सध्या येथे २५ पोलाद कारखाने सुरू आहेत. मात्र, त्यांनीही उत्पादनात कपात केली आहे.

लोखंडाच्या कारखान्यात लोखंड वितळविण्याच्या भट्टय़ा ह्या विजेवरच चालत असल्याने मोठय़ा क्षमतेने व अधिक विजेची गरज भासत असते. महाराष्ट्रात विजेचे दर प्रति युनिट आठ ते नऊ रुपये इतके आहेत. या दराव्यतिरिक्त अधिभार अधिक भरावा लागत आहे. गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांच्या तुलनेत हे दर दीडपट अधिक असल्याचे पोलाद कारखानदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पोलाद कारखान्यांचा उत्पादन खर्च अधिक आहे. लोखंडासाठी मुंबईसारखी मोठी बाजारपेठ हाकेच्या अंतरावर असतानाही वाढत्या उत्पादन खर्चाचा मेळ घालून अन्य राज्यांतून येणाऱ्या मालाशी स्पर्धा करणे कठीण जात असल्याचे उद्योजकांनी सांगितले.

२००हून अधिक उद्योगांचा काढता पाय?

वाडा तालुका हा एके काळी उद्योगांसाठी अनुकूल परिसर मानला जात होता. ‘डी प्लस’मध्ये असल्याकारणाने सुरुवातीला येथे उद्योजकांना वेगवेगळय़ा सवलती दिल्या जात होत्या. मात्र, या सवलती गेल्या काही वर्षांत हटवण्यात आल्या. त्यातच या परिसरातील कारखान्यांना रस्ते, पाणी, दळणवळण साधने, इंटरनेट सुविधा या समस्यांनाही तोंड द्यावे लागत आहे. परिणामी गेल्या दहा वर्षांत येथून २०० छोटय़ा-मोठय़ा उद्योगांनी स्थलांतर केले आहे.

राज्यभरातील ३६ उद्योग बंद

वीज दरवाढीचा पोलाद उद्योगावर झालेला परिणाम वाडा तालुक्यापुरता नसून राज्यभर तो दिसत आहे. ‘द स्टील मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र’ने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यभरातील ३६ पोलाद कारखान्यांना सध्या टाळे लागले असून दहा कारखाने अन्य राज्यांत स्थलांतरित झाले आहेत. राज्य सरकारने २०१९ मध्ये मराठवाडा, विदर्भ, खानदेशमधील पोलाद कारखान्यांना पाच रुपये प्रति युनिट दराने वीजपुरवठा सुरू केला. मात्र, या वर्षी २३ जूनपासून ही सवलत बंद करण्यात आल्याचे संघटनेचे अध्यक्ष योगेश मानधनी यांनी म्हटले. ही सबसिडी पुन्हा सुरू करावी, अशी मागणीही संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

स्थलांतरित झालेले काही उद्योग

  • के. सी. फेरो अलॉईज वरले येथून सिल्वासा.
  • बाबा मुंगीया स्टील खुपरी येथून राजस्थान.
  • जय महालक्ष्मी वसुरी येथून गुजरातकडे.
  •   बलवीर स्टील वाडा येथून वापी (गुजरात)
  • युनायटेड इंजिनीअिरग वर्क्‍स वाडा येथून दादरा नगर हवेलीत.

अन्य राज्यात विजेचा दर कमी असल्याने त्या राज्यात तयार झालेल्या लोखंडाच्या कमी दराशी स्पर्धा मुंबई बाजारपेठ जवळ असतानाही आम्हाला करता येत नाही. 

– हरगोपाळ रजपूत, उद्योजक, वाडा.

महाराष्ट्रात विजेचे दर अन्य राज्यांपेक्षा जास्त आहेत, ही वस्तुस्थिती खरी आहे. या विजेच्या समस्येव्यतिरिक्त अनेक समस्यांना येथील उद्योजकांना सामोरे जावे लागत असल्याने येथील उद्योग अन्य राज्यात स्थलांतरित होऊ लागले आहेत. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

-मिलिंद वाडेकर, उपाध्यक्ष, वाडा इंडस्ट्रीज असोसिएशन, वाडा.