scorecardresearch

जिल्ह्यातील सर्व जलाशयांची दुरुस्ती

केळवे झंझारोली धरणामधील गळतीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व जलाशयांची सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी त्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहे. 

जिल्हा नियोजन समिती निधी पुरविणार

पालघर:  केळवे झंझारोली धरणामधील गळतीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व जलाशयांची सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी त्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहे.  या सर्व कामांना जिल्हा नियोजन समितीमधून निधी पुरविला जाणार असल्याचे पालकमंत्री दादा  भुसे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सांगितले. जिल्हा नियोजन समितीची ऑनलाइन बैठक १७ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढाण, आमदार सुनील भुसारा, श्रीनिवास वनगा, राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ सहभागी होते.

जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांना  जागाही उपलब्ध झाल्या आहेत. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी यांनी एकत्रित येऊन काम केल्यास जिल्ह्याचा सर्वागीण विकास साधला जाईल.  विक्रमगड येथील दोन हेक्टर शासकीय जमीन जलसंपदा विभागाला तसेच तलासरी येथील नगर पंचायतीसाठी शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वाडा तालुक्यातील शासकीय कार्यालयासाठी जागेची उपलब्धता लवकरच करण्यात येईल असे पालकमंत्र्यांनी सांगितले. खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना बियाणांची कमतरता जाणवणार नाही, यासाठी कृषी विभागाने आतापासूनच बियाणांची उपलब्धता करून ठेवावी, अशी सूचना  कृषी विभागाला दिली.

तीन तास चाललेल्या या बैठकीत विकास कामांवर झालेल्या खर्चाचा तसेच अखर्चित निधीचा आढावा घेण्यात आला.  सुरू असलेली विकास कामे व उपलब्ध निधीचा विनियोग मार्चअखेर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पूरहानी,  रस्ते दुरुस्तीकरिता मंजूर निधी जिल्ह्यात सर्वत्र वितरित करण्यासाठी फेरबदल करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.  लोकप्रतिनिधीतर्फे जिल्हा परिषदेंतर्गत सुचविलेल्या कामांचा नियोजनांतर्गत समावेश करण्यात करण्यात यावा, अशी  सूचना पालकमंत्री यांनी केली. जिल्ह्यातील मच्छीमारांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत स्वतंत्र बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असे बैठकीत सांगण्यात आले.

आदेश देऊनही भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी समिती नाही

जिल्हा नियोजन समितीमध्ये शिवक्रांती संघटनेतर्फे वाडा तालुक्यातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशा मागणीचे निवेदन १५ नोव्हेंबर रोजी पालकमंत्री दादा भुसे व सर्व आमदारांना देण्यात आले होते. त्या वेळी आमदार दौलत दरोडा यांनी एकच वाडा तालुका कशाला? जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्वच कामांची चौकशी करा, अशी मागणी केली. त्यावर आमदार सुनील भुसारा यांनी ही मागणी लावून धरली. त्या वेळी पालकमंत्र्यांनी समिती नेमून चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पुढील नियोजन समितीची बैठकही झाली. मात्र अशी कुठलीही चौकशी समिती नेमण्यात आली नाही. जिल्हा नियोजन समितीमध्ये पालकमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाचे नेमके काय झाले ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Repair reservoirs district planning committee provide funds ysh

ताज्या बातम्या