कुणाल लाडे, लोकसत्ता वार्ताहर

डहाणू : पालघर जिल्ह्यातील जव्हार आणि मोखाडा तालुक्यातून सातारा जिल्ह्यात उसतोडीच्या कामासाठी गेलेल्या मजुराला कंपनीत सहा दिवस डांबून ठेवत जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या मजुरांच्या सोबत आलेले काही मजूर काम सोडून गेल्याचं राग मनात धरून ठेकेदाराने मजुराला बंद खोलीत कोंडून मारहाण केल्याचे आरोप केले जात असून याविषयी मजुरांनी एक चित्रफीत तयार करून प्रसार माध्यमांवर प्रसारित केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सामाजिक संघटनेने मजुरांची सुटका केली असून अत्याचार करणाऱ्यांविरोधात संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

जव्हार व मोखाडा तालुक्यातील १० कुटुंब ऊस तोडीच्या कामासाठी सातारा जिल्ह्यात कोरेगाव तालुक्यातील आंबेगाव येथे गेले होते. या कुटुंबांना ठेकेदाराने प्रत्येकी ३० हजार रुपये अनामत रक्कम देऊन कामावर नेले होते. यातील सहा कुटुंब बंडू खरात तर चार कुटुंब तेजस यादव या ठेकेदाराकडे काम करत असून यातील तेजस यादव यांच्याकडे काम करणारे चार कुटुंब काम सोडून गेल्यामुळे उर्वरित सहा कुटुंबातील म्होरक्या असलेली व्यक्ती कृष्णा लक्ष्मण नडगे याला तेजस यादव यांनी तब्बल सहा दिवस कंपनीत कोंडून ठेवत मारहाण केली असून पळून गेलेल्या कुटुंबांचे पैसे परत दिल्याशिवाय सोडणार नाही असा दम भरला. दरम्यान बंडू खरात या ठेकेदाराने मध्यस्ती करत पैसे मिळवून देण्याच्या बोलीवर कृष्णा नडगे यांना सोडवले आहे. मात्र कृष्णा याला सलग दोन दिवस लाकडी दांडक्याने जबर मारहाण केल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. याविषयी कृष्णा याने जव्हार येथील आपले नातेवाईक रामदास वाघ यांना माहिती दिल्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार कृष्णा नडगे यांनी एक चित्रफीत तयार करून ही चित्रफीत प्रसारमाध्यमांवर प्रसारित केल्यानंतर जिल्ह्यातील श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मजुरांना मदतीचा हात दिला आहे.

आणखी वाचा-पालघरची जागा मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची !

जव्हार आणि मोखाडा तालुक्यातील दुर्गम भागातून हजारो कामगार रोजगारासाठी स्थलांतर करतात. आठ महिने इतरत्र काम करून पावसाळ्यात ही कुटुंब आपल्या घरी येऊन शेतमजुरीची कामे करतात. यातील कृष्णा नडगे हे गेल्या तीन वर्षांपासून ऊस तोडीच्या कामावर जात आहेत. त्यांच्या सह त्यांच्या ओळखीतील इतर नऊ कुटुंब यावर्षी त्यांच्यासोबत उसतोडीच्या कामासाठी गेले होते. मागील वर्षी तेजस यादव यांच्याकडे काम करणारे कृष्णा या वर्षी बंडू खरात या ठेकेदाराकडे काम करत असून तेजस यादव यांच्याकडे त्यांच्यासोबत असलेली चार कुटुंब काम करत होती. ऊस तोडीच्या कामासाठी मजुरांना ३०० रुपये प्रति टन इतके मजुरी दिली जाते. अनामत रकमेतून मजुरी वजा करून मजुरांना आवश्यकतेनुसार खर्चासाठी पैसे दिले जातात. मात्र तेजस यादव यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांना दररोज १२ ते १३ तास काम करून देखील घर खर्चासाठी पैसे मिळत नसल्यामुळे चार कुटुंब काम सोडून निघून आले. याचा राग मनात धर तेजस यादव यांनी कृष्णा नडगे यांना दोशी ठरवत मारहाण केल्याचा आरोप कृष्णा नडगे यांनी केला आहे.

सध्या श्रमजीवी संघटनेच्या वतीने सीता घाटाळ, महिला जिल्हा उपप्रमुख पालघर, अजित गायकवाड, जिल्हा युवक सचिव पालघर, संतोष धिंडा, जव्हार तालुका सचिव, अंकुश वड, रविंद्र वाघ, ईश्वर बांबरे आदी. हे कार्यकर्ते मजुरांकडे पोहोचले असून त्यांच्या मार्फत संबंधित पोलिस ठाण्यात मजुरांवर झालेल्या अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिली.

कृष्णा लक्ष्मण नडगे यांच्यासह मुलगा संकेत नडगे, यदुनाथ भोये, गंगाराम वाघ, संतोष थापड, बंडू लाखन यांचे कुटुंब मिळून लहान मुलांसह २५ जणांचा समावेश आहे. सर्व मजूर कामगार हे जव्हार तालुक्यातील डबकपाडा आणि मोखाडा तालुक्यातील पळसपाडा येथील रहिवासी असून गेल्या ३ ते ४ महिन्यांपासून तुटपुंज्या पगारावर ऊसतोडीचे काम करत आहेत. ठेकेदारांनी जास्त पैशाचे आमिष दाखवून ३० हजार रुपये अनामत रक्कम देऊन मजुरांना कामावर नेले असून त्याठिकाणी गेल्यावर ठरल्यापेक्षा जास्त काम करवून घेणे, वेळेवर पगार न देणे, शिवीगाळ, मारहाण करणे, अश्या प्रकारे मजुरांना त्रास दिला जात असल्याची तक्रार मजुरांकडून करण्यात येत आहे.

आणखी वाचा-राज्यातील बेकायदेशीर वाहन घोटाळा प्रकरण, उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून वसईत ४ वाहने जप्त

कृष्णा नडगे यांच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत त्यांनी एक चित्रफीत तयार करून आपले नातेवाईक रामदास वाघ यांना पाठवल्यानंतर त्यांनी ही चित्रफीत प्रसारमाध्यमांवर प्रसारित करून मदत करण्याचे आवाहन केले. याविषयी माहिती मिळाल्यावर श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पीडित मजुरांना संपर्क करून त्यांना स्वगृही परत आणण्यासाठी पुढाकार घेऊन स्वतः वाहने घेऊन घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मजुरांची ठेकेदाराच्या जाचातून सुटका करून मजुरांना स्वगृही परत आणले आहे.

याविषयी प्रसारित चित्रफीत पाहिल्यावर माहिती मिळाली असून अधिक चौकशी साठी जव्हार पोलीस निरीक्षक यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. सध्या मजुरांना घरी आणण्यासाठी एका सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. मजूर घरी परतल्यावर त्यांची विचारपूस करून तक्रार असल्यास नोंदवली जाईल. -शैलेश काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी जव्हार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रमजीवी चे कार्यकर्ते सातारा येथे दाखल झाले असून सर्व बाधित ऊसतोड कामगारांना सोबत घेतले आहे. तहसीलदारांच्या समक्ष बाधित यांचे जबाब घेतले जात असून दोशीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्यातील स्थलांतरित झालेले मजूर सुरक्षित आहेत. -विवेक पंडित, अध्यक्ष श्रमजीवी संघटना तथा अध्यक्ष (मंत्री दर्जा) राज्य स्तरीय आदिवासी विकास आढावा समिती