पालघर तालुक्यात १८ वर्षांवरील ५००  रिक्षा  

पालघर: राज्य परिवहन मंडळाने १८ वर्षांवरील  रिक्षांचे परवाने नूतनीकरण करण्याचे काम बंद केले आहे. असे असताना   किमान ५०० वाहने पालघर तालुक्यात सार्वजनिक वाहतुकीत अजूनही कार्यरत आहेत. त्यामुळे अशा वाहनांना अपघात झाल्यास बाधित नागरिकांना  त्याचा कोणताही लाभ मिळणार नसल्यामुळे अशा रिक्षांवर बंदी आणण्याची मागणी पालघर पोलिसांकडे करण्यात आली आहे. मंडळाने २४ सप्टेंबर २०२० रोजी झालेल्या बैठकीत मुंबई महानगर क्षेत्रात परिवहन  कार्यक्षेत्रातील पंधरा वर्षांच्या वयोमर्यादा असलेल्या ऑटोरिक्षा १ ऑगस्ट २०२१ पर्यंत वापरातून काढून टाकण्यात याव्यात असे सूचित केले आहे.  तर  मुंबई क्षेत्र परिवहन प्राधिकरण व्यतिरिक्त क्षेत्रांमधील वाहनांना काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे.  १ ऑगस्टपर्यंत १८ वषार्ंवरील वाहने वापरातून काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. प्रत्यक्ष परिवहन मंडळाने १८ वर्षांवरील सार्वजनिक क्षेत्रातील वाहनांना परवाना नूतनीकरणाची बंद केले असताना अशा वाहनांना विमा काढला जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीत पालघर शहरातील सुमारे शंभर ते दीडशे वाहनांसह तालुक्यात किमान पाचशेपेक्षा अधिक १८ ते २० वर्षांवरील वाहने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थित कार्यरत असलेल्या दिसून आले आहे.

अशा वाहनांचा अपघात झाल्यास त्या मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा विमा संरक्षण मिळत नसून त्याचप्रमाणे अशी वाहने धोकादायक असल्याने पोलिसांनी अशा वाहनांविरुद्ध मोहीम उघडावी, अशी मागणी रिक्षा युनियनच्या प्रतिनिधींनी पालघर पोलिसांकडे केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.