वाडा : उन्हाचा कडाका वाढल्याने वाडा तालुक्यातील दुर्गम भागातील गांव- पाडयांमद्ये मोठे “पाणी संकट” उभे राहिल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.मागील २०२४ वर्षाच्या तुलनेने यावर्षी (२०२५) फेब्रुवारी पासुनच भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.दुर्गम भागांमधील विहिर, कुपनलिका यांच्या पाण्याची पातळी खाली गेल्याने त्या कोरड्या पडल्या आहेत, जल- जीवन मिशन, लघुनळ, ग्रामपंचायत नळ यांसारख्या पाणी योजना अनेक ठिकाणी अपूर्ण व नादुरुस्त आहेत. तर काही ठिकाणी अद्यापही कार्यान्वित नाहीत. त्यामुळे येथील नागरिकांची पाण्यासाठी मोठी भटकंती होतानाचे विदारक चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.

वाडा तालुक्यातील सध्यस्थितीत ओगदा, डाहे, तुसे या तीन ग्रामपंचायतीमद्ये “भीषण पाणी टंचाई” निर्माण झाली आहे. तर उज्जैनी – आखाडा, उमरोठे (नदीपाडा), वरसाळे, कुयलू (तोरणे) या गावांत देखील पाणी टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असुन हि प्रस्तावित गावे असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान टंचाईग्रस्त भागातील पाण्याची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाकडून ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांच्याकडील माहितीच्या आधारे गांव पाड्यांना ३ ते ५ हजार लिटर क्षमतेच्या टाक्या उपलब्ध करून देत टँकरद्वारे नियमित पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती वाडा पंचायत समिती गटविकास अधिकारी वैभव शिंदे यांनी दिली आहे.

ओगदा ग्रामपंचायतीची २८९० लोकसंख्या असुन येथे १० विहिरी, ९ कुपनलिका (हातपंप) गांव- पाड्यात आहेत. सागमाळ, दिवेपाडा, जांभूळपाडा, फणसगांव, टोकरेपाडा, मुहुमाळ, ताडमाळ, पाचघर या पाडयांमधील विहिरी, कुपनलिकांमधील ‘जलस्त्रोत कोरडे पडल्याने फेब्रुवारी महिन्यापासुनच भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असुन मागील १० वर्षांपासून या पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.दरम्यान हे गांव – पाडे अधिक उंच व डोंगराळ भागावर असल्याने अनेकदा बोअरवेल मारून देखील पाणी लागत नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी २ कि.मी तर पशुधनांना ४ किमी अंतरावर “वणवण” करण्याची वेळ ओढवत आहे.

डाहे- कुंभिस्ते या ग्रामपंचायतीमद्ये २७ पाडे आहेत, तर २ हजार लोकसंख्येपैकी गवळी पाडा व कातकरी पाडा मिळून २८५ लोकवस्ती आहे. या दोन्ही पाड्यात एकच विहीर व चार कुपनलिका (बोअरवेल)असुन त्यांचे पाणी दुषित झाल्याने पिण्यायोग्य नाही. येथे एकदिवसआड टँकरने पाणी पुरवठा होत आहे.तुसे या ग्रामपंचायतीमधील फणसपाडा, तरसेपाडा, दोडेपाडा येथे देखील भीषण पाणी टंचाई उद्भवली आहे. दरम्यान पाण्याची टंचाईग्रस्त गांव – पाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो.

वाडा तालुक्यामध्ये तीन गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. दोन टँकरच्या मदतीने प्रतिदिन सहा फेऱ्या केल्या जातात. ज्या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होते तेथे प्रशासनाकडून तात्काळ उपाययोजना करत तेथे टॅंकर मंजूर करून पाणीपुरवठा केला जातो.तसेच ज्या गावांमध्ये बोरवेलला पाणी उपलब्ध होऊ शकतात तिथे बोरवेल घेण्यात येतात.आतापर्यंत १२ ठिकाणी बोरवेल घेण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर ११ नवीन लघु नळ योजनांचे काम पूर्ण झालेले आहे. तर १३ लघुनळ योजनांचे काम प्रगतीपथावर आहे. वैभव शिंदे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, वाडा

ग्रामपंचायतीमधील लोकसंख्येच्या व मागणीनुसार शासनाचे असलेले दुष्काळाच्या निकषाप्रमाणे प्रती व्यक्ती २० लिटर पाणी याप्रमाणे दिले जात आहे.मात्र नागरिकांबरोबरच पशु – पक्षी यांची तहान भागविण्यासाठी व इतर कारणांसाठी लागणारी पाण्याची दैनंदिन गरज लक्षात घेता मिळणारे पाणी तुटपुंजे (अत्यंत अल्प) मिळत आहे.शासनाने या गोष्टींचा सारासार विचार करत दुष्काळाच्या निकषात बदल करून टंचाईग्रस्त गांव- पाड्यांना वाढीव पाण्या करीता कार्यवाही करणे गरजेचे आहे.निलेश सिताराम पाटील,वाडा तालुकाध्यक्ष शिवसेना (उद्धव ठाकरे)

यावर्षी फेब्रुवारी पासुनच तापमानात वाढ झाल्याने उन्हाचा कडाका प्रंचड वाढला आहे, याचा परिणाम मानव, पशु- पक्ष्यांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. वाडा तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमद्ये जवळपास ८० -१०० घरकुल योजनां अंतर्गत कामे सुरू असल्याने त्याकरिता पाणी मोठ्या प्रमाणावर लागत असल्याने ते विहिर, कुपनलिका किंवा लघु नळ योजनेतील घेतले जाते.त्याचबरोबर नदी, नाले, विहिरी, कुपनलिका देखील बहुतांशी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे दुर्गम भागात पाण्यासाठी मोठी वणवण व पायपीट करण्याची वेळ महिलांवर आली आहे. प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.