कासा : ऐने गावाजवळ ‘संत गाडगेबाबा अनुदानित आश्रमशाळा’ आहे. या शाळेच्या जवळच्या महावितरणच्या वितरण पॅनलजवळची रोहित्रपेटी अर्थात फ्यूज बॉक्स उघडाच आहे. झाकण लागत नाही आणि उघडय़ा तारा लोंबत आहेत. शाळेच्या इतक्या जवळ ही रोहित्रपेटी असूनही महावितरण त्याकडे दुर्लक्ष करत आहे.
ऐने येथे ‘संत गाडगेबाबा अनुदानित आश्रमशाळा’ आहे. या आश्रमशाळेत पहिली ते दहावीचे सुमारे ४०० विद्यार्थी शिक्षण घेतात. निवासी आश्रमशाळा असल्याने हे विद्यार्थी राहायलाही इथेच असतात. शाळेच्या परिसरातच महावितरणचे वितरण पॅनल आहे. परंतु त्यातील रोहित्रपेटीची दुरवस्था झालेली आहे. वीज नियंत्रणासाठी बसवण्यात येणारी ही रोहित्रपेटी उघडी पडली असून त्यातील फ्यूज गायब आहेत. उघडय़ा तारा टाकण्यात आल्या आहेत. झाकण तर नादुरुस्त असल्याने उघडेच असते. शाळेतील विद्यार्थी इथे खेळायला येतात. पहिलीपासूनचे लहान विद्यार्थी त्यात असतात. खेळताना चुकून एखादा विद्यार्थी या रोहित्रपेटीजवळ आल्यास मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना विजेचा झटका बसून दुर्घटना घडू शकते. त्यामुळे महावितरणने शाळेजवळची ही रोहित्रपेटी तत्काळ दुरुस्त करावी, अशी मागणी होत आहे.
वारंवार महावितरणला सांगूनसुद्धा रोहित्रपेटीचे काम केले जात नाही. आसपास आश्रमशाळा आहे, हे लक्षात घेऊन महावितरणने हे काम लवकरात लवकर करणे, अपेक्षित आहे. परंतु तसे होत नाही. यापुढे कोणतीही दुर्दैवी घटना घडल्यास त्याला महावितरण जबाबदार राहील.-बी. आर. शिंदे, मुख्याध्यापक