कासा : रत्नागिरीजवळ समुद्रात बोट बुडून मृत्यू झालेल्या सख्ख्या भावांच्या मृतदेहावर तलासरीत येथे शोकाकूल वातावरणात गुरुवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्यातील मंगलोर बंदरावरील रत्नसगर बोट रत्नागिरीजवळ समुद्रात ३ जानेवारी रोजी बुडाली होती. त्या बोटीत एकूण सात खलाशी होते. ते तलासरीमधील पाटकर पाडय़ातील होते. चार खलाशांना वाचविण्यात यश आले आहे. तर एक जण अद्यापही बेपत्ता आहे.

सुरेश भिखार वळवी आणि लक्ष्मण भिखार वळवी यांचे मृतदेह पोलिसांनी नातेवाईकांना दिले या वेळी तलासरी पोलीस आणि तहसीलदार कार्यालयामार्फत पंचनामा करण्यात आला. तहसीलदार श्रीधर गालीपिल्ले, मंडळ अधिकारी कुमार कुंडारे, साहाय्य उपपोलीस निरीक्षक जयराम उमतो, पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बोटीचे इंजिन बंद करून २७० नोटिकल आत समुद्रात बोट उभी करून झोपले असताना अचानक रात्री वादळी वाऱ्यामुळे बोट उलटली आणि ही घटना घडली. बेपत्ता असलेला एक जण बोटीच्या केबिनमध्ये झोपला असल्याने त्याला जाग आली नसावी व बोटीच्या केबिनमध्येच त्याचा मृतदेह असावा असा अंदाज अंतोन भगत याने व्यक्त केला आहे. दुसऱ्या बोटीतील खलाशांनी दोरीच्या साहाय्याने चौघांना वाचविले.