पालघर : संकलित मूल्यमापन चाचणीच्या वेळापत्रकात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे पालघर जिल्ह्यासाठी बदल करण्यात आला असून ८ ऑगस्ट रोजीची इंग्रजी विषयाची परीक्षा ११ ऑगस्ट रोजी घेण्याबाबत शिक्षण विभागाने गटशिक्षणाधिकारी यांना सूचना दिल्या आहेत. राज्यातील शिक्षण पद्धतीचे बळकटीकरण करण्यासाठी स्टार्स कार्यक्रमांतर्गत संकलित पायाभूत चाचणी (पॅट) घेण्यात येत असते.

६ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट या काळात दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषा, गणित आणि इंग्रजी विषयांची पायाभूत मूल्यमापन चाचणी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ६ ऑगस्ट रोजी मराठी, ७ ऑगस्ट रोजी गणित व ८ ऑगस्ट रोजी इंग्रजीचा पेपर होणार होता. मात्र नारळी पौर्णिमेनिमित्त ८ ऑगस्ट रोजी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली असून ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन व रक्षाबंधन निमित्त शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आले आहेत.

त्यामुळे ८ ऑगस्ट रोजी होणारी इंग्रजी विषयाची परीक्षा आता ११ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार असल्याचे जाहीर झाले आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट), पालघरचे प्राचार्य संभाजी भोजने यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे लक्ष वेधल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबतच्या सूचना पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी यांना ५ ऑगस्ट रोजी देण्यात आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शाळां शुक्रवार ते रविवार दरम्यान सुट्टीचा आनंद घेणार आहेत.

पायाभूत चाचणीचे महत्त्व

या पायाभूत चाचणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीचे मूल्यांकन केले जाते. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेण्यासाठी आणि त्यांच्या प्रगतीचा योग्य स्तर निश्चित करण्यासाठी ही चाचणी अत्यंत महत्त्वाची आहे. पालघर जिल्ह्यात २१२० जिल्हा परिषद शाळा व सुमारे १५० अनुदानित शाळांमधील तीन लाख पेक्षा अधिक विद्यार्थी या परीक्षेत सहभागी होणार आहेत.