पालघर : दहावीची परीक्षा सुरू होत असताना तारापूर एज्युकेशन सोसायटी संचालित न्यूक्लियर फ्रेंड्स इंग्लिश स्कूलने शैक्षणिक शुल्क न भरल्याचे कारण देत एका विद्यार्थिनीला परीक्षा प्रवेशपत्र देण्यास नकार दिला आहे. या प्रकारामुळे तारापूर गावातील या शाळेविरोधात संताप व्यक्त केला गेला.
अणुऊर्जा प्रकल्पाच्या अक्करपट्टी या विस्थापित गावातील पूर्णिता संजय कोरे या विद्यार्थिनीला दहावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र नाकारल्याने ती चिंतेत आहे. तिचे वडील संजय कोरे यांना रेल्वे अपघातामुळे अपंगत्व आले आहे. आर्थिक स्थिती बेताची असल्यामुळे ते शुल्क भरू शकत नव्हते. तसेच पूर्णिता हिचे शुल्क माफ करावे असे पत्रही शाळेला अणुऊर्जा व्यवस्थापनाने पाठवल्याचे समजते. मात्र तरीही व्यवस्थापनातील एका महिला सदस्याने प्रवेशपत्र नाकारले. अखेर कोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केल्यानंतर ही बाब उजेडात आली. कोरे व त्यांची मुलगी पूर्णिता हिला प्रवेशपत्रासाठी शाळेने पुन्हा बोलावले होते. परंतु, प्रवेशपत्र देण्यास नकार दिला. शैक्षणिक शुल्क भरले नाही तर परीक्षेला बसू दिले जाणार नाही, असे शिक्षकांनी मुलीला सतत सांगितले जात हाते. मात्र माझ्या मुलीबाबत शाळेने योग्य तो निर्णय घेऊन तिच्या भवितव्याचा विचार करावा असे पालक संजय कोरे यांनी म्हटले आहे. परीक्षा प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. शुल्काचा मुद्दा दुय्यम भाग आहे, असे संस्थेचे कार्यवाह उदयन सावे यांनी सांगितले.
आर्थिक दुर्बल विद्यार्थिनीकडे शैक्षणिक शुल्कासाठी तगादा लावणे हा तर मुजोरपणा आहे. पूर्णिता परीक्षेच्या प्रवेशापासून वंचित राहणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जाईल.
– कुंदन संखे, सदस्य, जिल्हा नियोजन समिती