लोकसत्ता वार्ताहर

बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्राला जोडणार्‍या मुख्य रस्त्यांवरील अपघातप्रवण ठिकाणी लवकरच स्वयंचलित सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. स्वयंचलित सिग्नल यंत्रणेमुळे बेशिस्त वाहतुकीला शिस्त लागून वाहतूक कोंडी आणि अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे.

तारापुर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमध्ये मालाची ने- आण करणार्‍या जड वाहनांची संख्या प्रचंड वाढली असून दररोज २० हजार पेक्षा अधिक वाहनांची वर्दळ असते. जड वाहनांसोबतच खाजगी आणि प्रवासी वाहनांच्या संख्येत दिवसंदिवस वेगाने वाढ होत आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे औद्योगिक क्षेत्राला जोडणार्‍या चिल्हार ते बोईसर, नवापुर ते बोईसर या मुख्य रस्त्यांवरील खैरेपाडा बिरसा मुंडा चौक, बेटेगाव टाटा हाऊसिंग वसाहत, नवापुर नाका, मधुर नाका, टाकी नाका या ठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडी होऊन त्याचा वाहन चालकांसोबतच कामगार आणि प्रवाशांना वाहतूक कोंडीत अडकून नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

आणखी वाचा-पालघर : भ्रष्टाचार प्रकरणामधे जव्हारच्या तीन कार्यकारी अभियंत्यांसह एकूण सात अधिकाऱ्यांवर शासनाची कारवाई

वाहतूक कोंडीसोबतच बेशिस्त वाहन चालकांमुळे प्रमुख चौक आणि छेद रस्त्यांवर अपघात होऊन प्रसंगी वाहन चालकांमध्ये वादावादीचे प्रसंग घडत आहेत. बोईसर चिल्हार मार्गावरील बेटेगाव येथील टाटा हाउसिंग आणि रूपरजत पार्क या ठिकाणी रस्ता ओलांडताना नियमित अपघात होत आहेत. वाहतूक शाखेमार्फत प्रमुख चौकांमध्ये वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र सकाळ आणि संध्याकाळी गर्दीच्या सुमारास एकाच वेळी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यावर वाहतूक कर्मचार्‍यांना वाहतूक नियंत्रण करताना अडचणी निर्माण होत आहेत.

औद्योगिक परीसरातील नियमित वाहतूक कोंडी आणि अपघातप्रवण ठिकाणांचे जिल्हा वाहतूक शाखेमार्फत सर्वेक्षण करण्यात येऊन खैरापाडा बिरसा मुंडा चौक, बेटेगाव टाटा हाऊसिंग, नवापुर नाका, मधुर नाका, टाकी नाका या पाच ठिकाणी स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बसविण्याबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला अहवाल सादर करण्यात आला होता. त्यानुसार तारापूर एमआयडीसीकडून या पाच ठिकाणी सिग्नल यंत्रणा सुरू करण्याचे काम लवकरच सुरू केले जाणार असून यासाठी अंदाजे ४० लाख रूपयांचा खर्च येणार आहे. सिग्नल यंत्रणा सुरू झाल्यानंतर दोन वर्षे कंत्राटदारामार्फत देखभाल दुरूस्ती करण्यात येणार आहे.

आणखी वाचा-बोईसर : प्रदूषणकारी आरे ड्रग्स कारखान्यावर उत्पादन बंदीची कारवाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तारापूर एमआयडीसीला जोडणार्‍या मुख्य रस्त्यांवरील चौकांमध्ये बेशिस्त वाहनचालकांमुळे अनेक अपघाती घटना घडत आहेत. या ठिकाणी वाहतूक सुरळीत राहावी यासाठी स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बसविण्याची मागणी एमआयडीसी विभागाकडे केली होती. पाच ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसविण्याच्या कामाला मंजूरी मिळाली असून यासाठी एमआयडीसीचे संबंधित अधिकारी, जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि जिल्हा वाहतूक शाखा अधिकारी यांनी देखील उत्तम सहकार्य केले. सिग्नल यंत्रणा सुरू झाल्यानंतर वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. -जगदीश धोडी, सचिव, आधार प्रतिष्ठान

तारापुर-बोईसर मधील प्रमुख चौकांमध्ये लवकरच सिग्नल यंत्रणा सुरू होणार आहे. ही यंत्रणा सुरू झाल्यानंतर वाहन चालकांनी नियमांचे पालन करून वाहतूक विभागास सहकार्य करावे. -आसिफ बेग, प्रभारी अधिकारी, जिल्हा वाहतूक शाखा