पालघर : शैक्षणिक सत्र 2025-26 साठी इयत्ता ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेची अंतिम फेरी ऑनलाईन पद्धतीने राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. राज्यातील २१ लाखांहून अधिक प्रवेश क्षमतेपैकी आतापर्यंत १३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित झाला आहे. उर्वरित जागांसाठी विद्यार्थ्यांना आणखी एकदा प्रवेश घेण्याची संधी मिळणार आहे.

राज्यातील एकूण प्रवेश क्षमता २१,५९,२३२ इतकी आहे. यावर्षी १४,८५,६८६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी 13,43,969 विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग-१ (नोंदणी) व भाग-२ (कनिष्ठ महाविद्यालयीन पसंती सूची) पूर्ण केला आहे. या विद्यार्थ्यांपैकी १३,३३,८९३ विद्यार्थ्यांचे कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश निश्चित झाले आहेत. तरीही काही कारणास्तव प्रवेश न घेणाऱ्या जागा रिक्त राहिल्यामुळे अंतिम फेरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सुरू होईल.२४ सप्टेंबर रोजी दुपारी ५ वाजेपर्यंत प्रक्रिया पार पडेल.अल्पसंख्याक, व्यवस्थापन व इतर राखीव कोट्यांतील प्रवेशही याच कालावधीत होतील.तसेच विद्यार्थी २५ सप्टेंबरपर्यंत थेट महाविद्यालयात जाऊनही प्रवेश घेऊ शकतील.

विद्यार्थ्यांनी व पालकांनी घ्यावयाची काळजी :

प्रवेश प्रक्रियेदरम्यान लॉग-इन करून स्वतःची माहिती तपासणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आणि निश्चित कनिष्ठ महाविद्यालयात वेळेत जाऊन प्रवेश घेणे आवश्यक आहे. कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच प्रवेश अंतिम समजला जाणार आहे. एकदा महाविद्यालयात प्रवेश घेतल्यास तो अंतिम राहील. वेळेत प्रवेश न घेतल्यास नंतर कोणतीही संधी उपलब्ध होणार नाही.तरी पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत प्रवेश घ्यावा असे आवाहन कार्यकारी अधिकारी मनोज रानडे आणि शिक्षणाधिकारी माध्यमिक अशोक पाटील आणि यांनी केले आहे.

शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांनी व पालकांनी वेळेत आवश्यक कागदपत्रांसह महाविद्यालयात जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा प्रवेशाची संधी गमवावी लागू शकते.”