पालघर :पालघर नगर परिषदेच्या अग्निशमन दलात जुन्या फायर इंजिनसह आता एक रेस्क्यू व्हॅन व दोन रेस्क्यू बाईक दाखल झाल्यामुळे पालघर नगरपरिषद क्षेत्रासह इतर ठिकाणी अग्निशमन गाड्या पोहोचणे जलद व सुलभ होणार आहे. अग्निशमन विभागाच्या गेल्या अनेक वर्षाची मागणी काही प्रमाणात पूर्ण झाल्यामुळे आपत्कालीन प्रसंगी सेवा देणे सोपे होणार आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने आगीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. मात्र याकरिता पालघर नगर परिषदेकडे २०१२ पासून ५००० लिटर क्षमता असलेले एकमेव फायर इंजिन कार्यरत होते. पालघर क्षेत्रात आगीची घटना घडल्यास बोईसर एमआयडीसी, वसई महानगरपालिका किंवा इतर आजूबाजूच्या ठिकाणाहून आग विझविण्याकरिता अग्निशमन यंत्रणा मागविण्यात येत असे. या दृष्टीने पालघर नगर परिषदेने अतिरिक्त वाहनांची मागणी केली होती. त्यादृष्टीने नुकतीच अग्निशमन विभागात दोन रेस्क्यू बाईक व एक रेस्क्यू व्हॅन दाखल झाली आहे.

अग्निशमन विभागाच्या रेस्क्यू व्हॅन मध्ये 300 लिटर पाणी व ५० लिटर फायर फायटिंग फोम (आग विझवण्याकरिता वापरण्यात येणारे रसायन) साठवून ठेवण्याची क्षमता आहे. यापूर्वी वॉटर टेंडर उपलब्ध असल्याने कोणत्याही आगीवर फक्त पाणी मारता येत होते. तसेच फोम तयार करून आगीवर मारत होतो. मात्र या मिनी रेस्क्यू व्हॅन मध्ये 50 लिटर फोम असल्याने लवकर फोम रसायनचा वापर करण्यात येईल तसेच हाय प्रेशर पंपाच्या सहाय्याने २० मिनिटं आगीशी लढा (फायर फायटिंग) देता येणार आहे.

अग्निशमन दलात दाखल झालेल्या दोन रेस्क्यू बाईक या विशेषतः गल्ल्या व दुर्गम ठिकाणी जिथे मोठे वाहन जाऊ शकत नाही अशा ठिकाणी आग विझवण्यासाठी वापरण्यात येणार आहे. यामध्ये नऊ लिटर पाणी, फोम आणि इतर आवश्यक उपकरणे आहेत. इतर वाहनांच्या तुलनेत जलद प्रतिसाद देण्यासाठी आणि बचाव कार्य करण्यासाठी या बाईकचा वापर करण्यात येणार आहे.

शासनाकडून प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची आवश्यकता

अग्निशमन वाहन चालवण्यासाठी व बचाव कार्यासाठी शासनाकडून अग्निशमन विभागाकरिता अद्याप प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची उपलब्धता झालेली नसल्यामुळे कंत्राटी पद्धतीने १८ मनुष्यबळ अग्निशमन विभागात कार्यरत आहे. नगरपरिषद अग्निशमन विभागात वर्षभरात जवळपास ६० ते ७० संपर्क (कॉल) येत असून त्या ठिकाणी नगरपरिषद मदत कार्य पाठवते.

शासनाच्या नियमाप्रमाणे पैशाची आकारणी

नगरपरिषदेतील औद्योगिक वसाहतींकडून याकरिता पैसे आकारले जातात. मात्र नगरपरिषद क्षेत्रातील इतर ठिकाणी ही वाहने विनामूल्य उपलब्ध करून दिली जातात. यासह जिल्ह्याच्या इतर ठिकाणाहून याकरिता मागणी आल्यानंतर त्वरित ही वाहने पाठविली जातात. मात्र याकरिता विशिष्ट पैसे शासनाने आकारून दिले आहेत त्याप्रमाणे मागणी करण्यात येते.

वाहनांमधल्या सुविधा

रेस्क्यू व्हॅनमध्ये आवश्यक बचाव उपकरणे, वैद्यकीय साहित्य, प्रकाश व्यवस्था, संवाद साधण्याची प्रणाली यासह फायर एक्स, हायड्रोलिक स्प्रेडर, इलेक्ट्रिक कटर, फोल्डेबल स्ट्रेचर, हॅमर, ब्रीदिंग ऑपरेटर्स व इतर आवश्यक सुविधा आहेत. एखादी इमारत कोसळली असेल तर रेस्क्यू व्हॅन वापरून लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढू शकतो. रेस्क्यू बाईकमध्ये पाण्याची टाकी, फोम टाकी, पोर्टेबल पंप आणि इतर उपकरणे आहे.

इमारतींमध्ये अग्निशमन प्रतिबंधक उपाययोजना

उंच इमारतींपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उंच सीडी किंवा क्रेन पालघर विभागात अद्याप उपलब्ध नाहीत. ज्या इमारतींना अग्निशमन उपाययोजना गरजेचे असते त्या इमारतींमध्ये बांधकाम परवानगी देताना अग्निशमन विभागाकडून प्रोव्हिजनल ना हरकत प्रमाणपत्र घेण्यास बंधनकारक असते. तसेच इमारत बांधकाम पूर्ण झाल्यास अंतिम अग्निशमन ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात येते. याचा अर्थ त्या इमारतीत अग्निशमन प्रतिबंधक उपाययोजना उपलब्ध असतात व अशा इमारतीत आग लागल्यास अग्निशमन जवान इमारतीत उपलब्ध असलेल्या अग्निशमन उपाययोजनाचे साह्याने आग विजू शकतात.

नगरपरिषदेला अग्निशमन वाहनांची खूप आवश्यकता होती. शासनाकडून ही वाहने नुकतीच उपलब्ध करून दिली असून जुन्या वाहनाची देखील देखभाल दुरुस्ती वेळोवेळी सुरू असते. उंच इमारतींपर्यंत क्रेनच्या सहाय्याने पोचू शकेल असे फायर इंजिन अद्याप उपलब्ध झालेले नाही. भविष्यात अशा फायर बंबाची देखील मागणी करण्यात येईल. मोठ्या स्वरूपाची आग असल्यास जवळच्या नगरपरिषद, बोईसर तसेच वसई विरार महानगरपालिका यांच्याकडून अधिकच्या गाड्या मागवण्यात येत होत्या. भविष्यात मोठ्या स्वरूपाची आग असल्यास जवळच्या अग्निशमन दलाचे सहाय्य घेतले जाईल.- प्यारचंद आदीवाल, नगरपरिषद अग्निशमन विभाग